शिकारी साखळी : २. शिकार सुरु होते
रात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.
.....खाली पडल्यावर क्षणभर हरी ची त्या कुत्र्याशी नजरानजर होते. कुत्रा पांढरा फटक असतो आणि करुणपणे रडत असतो. त्याचे लालजर्द डोळे प्रखरपणे चमकत असतात. पण हरी कडे बघितल्यावर तो हसतो आणि हरी चे डोळे कुत्र्याच्या डोळ्यांत काही क्षण बांधले जातात. तो विचित्र प्राणी कुत्र्याच्या मागे चालत असतो....
.....अचानक हरीला दूरवर बैलगाडी च्या मागच्या बाजूला दोन दिवे हालताना दिसतात. बहुदा एखादी कार असावी असे त्याला वाटते! तेवढ्यात तो काळा प्राणी पुन्हा बैलगाडीवर उडी मारतो.
हरी त्या प्राण्याला पुन्हा पकडायला जाणार तेवढ्यात बैलगाडी बरीच पुढे निघून जाते. तो जिवाच्या आकांताने बैलगाडी मागे धावायला लागतो आणि बंदूक काढून घेण्यात तो यशस्वी होतो. पण प्राणी बैलगाडीवरच राहतो. त्यानंतर मात्र बैलगाडी अचानक बैलांना पंख फुटल्यासारखी वेगात धावायला लागते. तो त्या प्राण्याच्या दिशेने गोळी मारतो पण त्या बैलगाडीचा वेग गोळीपेक्षा जास्त झाल्यासारखा त्याला वाटते.
"थांबव गाडी लेका! " हरी ओरडतो.
"मला जान प्यारी आहे. पैसा नाय!" नंदू म्हणतो.
"अरे पण त्यो प्राणी पुन्हा बैलगाडीवर आलाय. थांब माझ्यासाठी. एकट्यानेच पैसा खायचा विचार हाय का?" हरी ओरडतो.
नंदू आश्चर्याने मागे त्या प्राण्याकडे पाहतो....
पण बैलगाडी थांबण्याच्या पलीकडे गेलेली असते.
बैलांचे डोळे हिरवे झालेले असतात...
तो काळा प्राणी हरीच्या खांद्यावर जाऊन बसतो आणि विकट हास्य हसतो.
कुत्रा मात्र मागेच राहतो...
तो कुत्रा एका जागी थांबतो आणि हरीकडे चालू लागतो.
तो प्राणी नंदूच्या डोळ्यात बघून पुन्हा बैलगाडीखाली उतरतो आणि बैलांच्या खाली जाऊन धावू लागतो.
.....दूरवरच्या त्या कार मध्ये मागच्या सीटवर बसलेला मनुष्य सुनील हा बबन ड्रायव्हरला म्हणतो,
" अरे बाब्या, आपला बाॅस पण ना, किती काय काय करायला लावतो. आता पन्नास हजारासाठी हे डिक्की मधले प्रेत नदीत फेकाया लावतो ना तो." - सुनील
" गप बस रे. पैका पायजेल तर हे काम करायला पायजे का नाय?!" - बबन
"अरे पण, एखादा खून बीन केला असता ना मी! पण हे ओझं घेऊन जाऊन नीस्तं नादूत फेकून यायचं हे काम किती दिवस करायचं काही कळंना!"- सुनील
"बाकी हे मात्र झ्याक झालं की आपल्या बॉस ला त्याची शिकार लई लवकर गावली. एकाच पिस्तुलाच्या गोळीत तो माणूस मेला आणि आता आपल्या डिक्कीत आहे बघ!" - बबन
दरम्यान झाडांवरचे चार अभद्र काळे आत्मे त्या कारकडे झेपावतात. त्याना त्या डिक्की मधल्या प्रेताचा वास आलेला असतो....
"हा! खरं आहे ते. खूप अभद्र माणूस होता तो आणि आता आपल्याजवळ आहे. मेलेला. निश्चल! पण बबन मला कधी नाही ती आता जास्त भीती वाटते आहे . त्याचे डोळे किती भयानक आहेत रे. मेला तरी वाटत होतं आपल्याकडेच पाहतोय तो!" - सुनील
बबन म्हणतो, "गप बस सुनील. एक तर हा ईलाका लई डेंजर हाय. मैदान पार केलं की एक जंगल लागंल. मग एक पूल. त्या पुलावरून हे पोतं खाली फेकायचंय. आता या सैतानी इलाक्यातून लवकर पार व्हायचं. बास!"
दरम्यान काळे आत्मे वेगाने डिक्कीत शिरतात...
आधीच मृत्यू ची शिकार झालेल्या देहांची "शिकार" करून त्यांना आणखी शिकार करण्यास सज्ज करण्यासाठी जिवंत करायला ते काळे आत्मे हपापलेले असतात. नेहेमी. रोज. रात्री. तयार बसलेले असतात. झाडांवर!
"का रं? काय इशेष हाय या इलाक्यात?" सुनील विचारतो.
"आरं, आता नको ईचारू! रातच्याला सैतानाचं नाव घेतलं तर त्याला ताकद मिळते. या रस्त्यावर लई शिकारी सैतान असत्यात! गप बास! गप गुमान. शांती ठेव!"
"आरं, शांतीची कशाला याद दिली रे? कधी तिला भेटतो आसं झालंय! सकाळी चा पिऊन भेटतो तिला आणि रातच्याला दारू पिऊन ..."
समोर दूरवर एक अंधुक मनुष्य आणि त्यासोबत एक अंधुक कुत्रा बघून बबन करकचून ब्रेक दाबतो. दरम्यान सुनील च्या उजव्या खांद्यावर एक खरबडीत हात पडतो आणि तो दचकून मागे पाहतो तर काहीच दिसत नाही.
तेवढ्यात कुत्र्याच्या लाल डोळ्यांत बघून बबनचे डोळे थिजतात. तो अंधुक माणूस बबनला बंदुकीचा धाक दाखवून गाडीत बसू द्यायची "विनंती" करतो...
"चल त्या बैलगाडीचा पाठलाग कर. चल लवकर!" हरी म्हणतो.
बबन गाडी सुरू करतो आणि सुनीलला मदतीची विनंती करतो पण सुनील निश्चल पडून असतो. कारच्या मागच्या सीटवरचा तो सुनील त्या जिवंत झालेल्या प्रेताच्या हल्ल्यात मृत झाल्याचे बबनला माहीत नसते.
चंद्राच्या उजेडात त्या मैदानावर सुसाट वेगाने धावणारी बैलगाडी, त्या खाली धावणारा तो जिवंत झालेला विचित्र प्राणी, त्यामागे धावणारी कार आणि कारमागे सुसाट धावणारा पांढरा कुत्रा!
हा विचित्र पाठलाग अर्ध्या तासानंतर जंगलात शिरतो.
तो पाठलागाचा वेग आणि आवाज जंगलातील झाडांवर आरामात बसलेल्या घुबड आणि वटवाघुळे याना सहन होत नाही. ते एकमेकांकडे बघू लागतात, चिडतात आणि त्या बैलगाडी अन कार यावर झेपावतात. चंद्रप्रकाश जंगलातल्या झाडांमुळे क्षीण होत जातो.
जंगलातल्या रस्त्यातून वरून तो काळ्या पक्ष्यांचा फक्त थवा सरकताना दिसतो एवढे त्या बैलगाडी आणि कारला झाकले जाते.
पुढे अरुंद पुलावरून जाताना वेगामुळे बैलगाडी आणि नंदू पाण्यात खाली पडतात. तो विचित्र प्राणी पुलावरच राहतो.
नंतर त्यामागोमाग पक्ष्यांना घाबरलेला बबन, सुनील आणि हरी हे सर्व कारवरचे नियंत्रण सुटल्याने त्या कार सहित थंडगार पाण्यात पडतात.
ते जिवंत झालेले प्रेत मात्र पुलावरच राहते. तो विचित्र प्राणी पुलाच्या कठड्यावर चढतो आणि आनंदाने पाण्यात पडलेले माणसं पाहून हर्षभरित होतो.
दोन्ही बैल पाण्यातून निघून काठावर येतात आणि गावाकडे जायला लागतात.
ते प्रेत सुद्धा वाकून पाण्यात बघत हसते. तो प्राणी आणि प्रेत एकमेकांकडे पाहून हसतात आणि पुन्हा जंगलाकडे चालू लागतात. लवकरच पांढरा कुत्रा त्याना येवून मिळतो आणि ते सज्ज होतात पुढच्या शिकारीसाठी!!!
प्रेत, घुबड आणि वटवाघळे हसत हसत झाडांवर जाऊन बसतात. काळे आत्मे पुन्हा झाडांवर जाऊन बसतात. तो प्राणी आणि कुत्रा पुन्हा त्या चंद्रप्रकाशाताल्या मैदानात येतात! दुरून एक शववाहिनी येत असतांना त्याना दिसते. कुत्रा आणि तो प्राणी त्या शववाहिनीच्या समोर येवून थांबतात..!! काळ्या अभद्र आत्म्याचे काम ते दोघे निभावणार असतात. शववाहिनीच्या बाजूच्या रिकाम्या सीटवर ड्रायव्हरला अचानक कुणीतरी बसलेलं दिसतं...आणि ते दात विचकून हसत असतं. त्याचे हिरवे डोळे श्वास रोखून एकसारखे बघत असतात...कथा येथे संपते आहे. पण ही शिकारीची साखळी चालूच असणार आहे. कृपया त्या जंगलात जाऊ नका...त्या अखंडपणाची तहान असलेल्या त्या शिकारी साखळी मध्ये एक कडी बनू नका. तुम्हाला ही साखळी तोडायची आहे का? अनेकजण तोडायला गेले पण साखळीचा एक भाग बनून गेलेत! बघा प्रयत्न करायचा तर जाऊ शकता साखळी तोडायला!