अग्निपुत्र - Part 2 : भुकंप
अग्निपुत्र ही मराठीतील एक साय-फाय कादंबरी आहे. हा प्रकार इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत मराठीमध्ये खूपच कमी आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून सध्या ही कादंबरी वेगवेगळ्या भागांमध्ये दर शनिवारी ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार आहे. कादंबरीचे सर्व भाग ब्लॉगवर पूर्ण झाल्यावर ही कादंबरी ई-बुक स्वरुपात PDF Format मध्ये उपलब्ध केली जाणार आहे.
‘‘जॉर्डन, गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून फोन आलाय.’’ डॉ.मार्को म्हणतो.
‘‘गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून फोन?’’ जॉर्डन आश्चर्याने विचारतो.
‘‘हो. लगेच घे नाहितर कट होईल.’’ डॉ.मार्को जॉर्डनच्या हातात मोबाईल देतो.
‘‘हॅलो...’’ जॉर्डन म्हणतो.
‘‘आपण जॉर्डन बोलत आहात?’’ मोबाईलवर समोरुन दुसरी व्यक्ती बोलते.
‘‘हो...’’ जॉर्डन
‘‘मी गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून गुप्ता बोलतोय.’’
‘‘हो... ओळखलं मी... मोहिमेवर येत असताना माझं आपल्याशी एकदा बोलणं झालं होतं...’’
‘‘अगदी बरोबर ओळखलंत... कृपया आपण सांगू शकाल, आपण सध्या कुठे आहात आणि आपल्यासह आपले साथीदार सुखरुप असतील अशी आशा करतो.’’
‘‘आम्ही ८६ रोडजवळ आहोत आणि सर्वजण सुखरूप आहोत. काही झालं का?’’
‘‘हिमालयामध्ये ३.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली असून अनेक गावं जमिनीखाली गाडली गेली आहेत. मोकळ्याा मैदानामध्ये सुरक्षित ठिकाणी उभे रहा. लष्कराचे हेलिकॉप्टर आपल्याला घ्यायला येतच असेल.’’
‘‘३.४ रिश्टर स्केलचा भुकंप? पण आम्ही सर्वजण इथे सुखरुप आहोत.’’
‘‘नक्कीच ही आमच्यासाठी दिलासा देण्यासारखी गोष्ट आहे, पण आम्ही आपल्याबाबत कोणताही धोका पत्करु शकत नाही.’’
‘‘कळतंय मला, पण आम्ही मोहीम अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही. रेल्वे सुरु करण्याआधी या मार्गावर काही अडचणी आहेत त्याची आम्ही चाचपणी करत आहोत. भूकंप ही आमच्यासाठी सामान्य गोष्ट आहे.’’
‘‘आपल्याला सांगायला वाईट वाटत आहे, पण आता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रेल्वे सेवा सुरु होणार नाही. भुकंपाची माहिती मिळताच दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि रेल्वे मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्याला सुरक्षितपणे दिल्ली येथे आणलं जाईल. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे.’’ एवढं बोलून गुप्ता फोन ठेवतात.
‘‘हॅलो... हॅलो... गुप्ताजी...’’ जॉर्डन मोबाईलकडे बघतो. गुप्ताजींनी फोन ठेवला होता.
‘‘काय झालं? भुकंपाचं काय म्हणत होते ते?’’ अॅंजेलिना विचारते.
‘‘भारत आणि चीनदरम्यान रेल्वेसेवा सुरु होणार होती आणि ती रेल्वे या ठिकाणाहून जाणार होती. पण अचानक भुकंप झाल्याने आता या ठिकाणी कोणतीही रेल्वेसेवा सुरु न करण्याचं दोन्ही देशांच्या नेत्यांनी ठरवलं आहे आणि आपली मोहीम इथेच संपत आहे.’’ जॉर्डन सर्वांकडे बघत म्हणतो.
‘‘आपण आपली मोहीम अशीच कशी काय थांबवू शकतो? रेल्वेचा आणि आपला काही संबंध नव्हता. आपल्याला तर पुरातन काळातील अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी इथे पाठवलं होतं.’’ डॉ.मार्को म्हणतात.
‘‘हे आपल्याला माहित आहे, पण आपली सुरक्षितता हा त्यांच्यासाठी सध्या महत्त्वाचा भाग आहे. हिमालयात अनेक ठिकाणी भुकंपामूळे अनेक गावं जमिनीखाली गेली आहेत. लष्कराचं हेलिकॉप्टर आपल्याला घ्यायला येईलच.’’ जॉर्डन
‘‘सर हे तुम्ही बोलत आहात? आपल्याला काही अशा गोष्टी हाती लागल्या आहेत ज्यांच्यामुळे अनेक गोष्टींची सुत्र बदलतील. इथे माणूस अस्तित्वात होता याची प्रचिती आपल्याला आली आहे. तसेच अनेक रहस्य आता नव्याने समोर येणार आहेत. तुमचं बोलणं ऐकूण मला तुमच्या 35 वर्षांच्या अनुभवावर शंका येतेय. यासाठीच मी माझं कॉलेज सोडून नाही आलो.’’ इम्रान म्हणतो.
‘‘झालं बोलून? तुझं तोंड केवढं आणि तू बोलतोस किती? माझ्याशी असं बोलायची तुझी लायकी तरी आहे का? योग्य वेळी योग्य निर्णय घेत गेलो म्हणून 35 वर्ष जगलोय आणि टिकलोय मी, हा हिमालयातला छोटासा भुकंप मला माझी मोहिम पुर्ण करण्यापासून रोखू शकत नाही.’’ जॉर्डन ओरडून बोलतो.
‘‘सर मला तसं म्हणायचं नव्हतं.’’ इम्रान त्याची बाजू सावरत म्हणाला.
‘‘मग आता ही वस्तू मी इथेच फेकून देऊ का?’’ विषय बदलण्याच्या हेतूने डॉ.अभिजीत मध्येच बोलतो.
‘‘नाही. ते तू माझ्याकडे दे. लष्कराच्या हेलिकॉप्टरचा आवाज येतोय. तुम्ही सर्वांनी त्यामध्ये बसून निघून जा आणि मी कुठेतरी हरवलो आहे असं त्यांना सांगा. माझ्यामुळे तुमच्या जीवाला धोका नको.’’ जॉर्डन म्हणतो. जॉर्डनला खरं तर सर्वांची काळजी असते. डॉ.मार्को, डॉ.अभिजीत आणि डॉ.एरिक यांच्याबरोबर तो गेल्या १० वर्षांपासून काम करत होता. त्या चौघांच चांगलंच ट्युनिंग जमलं होतं. भूकंपामध्ये तिन्ही डॉक्टरांसह अॅंजेलिना आणि इम्रानच्या जीवाला धोका होता म्हणून तो सर्वांना माघारी जायला सांगतो आणि मोहीम एकट्याने पूर्ण कार्यासाठी थांबतो. जॉर्डनचे शब्द ऐकूण सर्वांच्या मनात त्याच्याविषयी आदर वाटू लागतो.
‘‘नाही जॉर्डन, मी तुला एकट्यााला इथे थांबू देणार नाही. मी सुध्दा इथे थांबणार आहे.’’ डॉ.अभिजीत जॉर्डनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो.
‘‘हो सर, आणि मी सुध्दा तुम्हाला सोडून कुठेही जात नाहीये.’’ इम्रान म्हणतो. जॉर्डन त्याच्याकडे बघून स्मितहास्य करतात व ते नंतर डॉ.एरिक, डॉ.मार्को आणि अॅंजेलिनाकडे बघतात. तिघेही आम्ही कुठेही जात नाही अशी मान हलवतात.
हेलिकॉप्टरचा आवाज आता आणखी स्पष्टपणे ऐकू येत होता. लष्कराच्या नजरेतून लपण्यासाठी ते सगळे आडोसा शोधत असतात. जॉर्डनला एका ठिकाणी खड्डा दिसतो. तो सर्वांना त्या खड्ड्यामध्ये जायला सांगतो. सगळे त्या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर जॉर्डनदेखील आतमध्ये जाऊन लपतो. सर्वजन आपापले मोबाईल बंद करुन ठेवतात. त्यांना शोधण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर निघून गेल्यानंतर सगळे त्या खड्ड्यातून बाहेर येतात.
‘‘अरे! ती आकृती कुठे गेली?’’ अभिजीत इकडेतिकडे शोधू लागतो. अभिजीतचं ऐकून इम्रान, जॉर्डन आणि डॉ.एरिक देखील ती आकृती शोधू लागतात.
‘‘डॉ.अभिजीत, तुमच्या हातावर काय आहे?’’ अॅंजेलिना अभिजीतकडे बघून म्हणते.
सर्वजन अभिजीतकडे बघतात तर त्याच्या हाताच्या दंडावर प्राचिन भाषेमध्ये काहीतरी गोंदल्यासारखं दिसतं.
‘‘हे माझ्या हातावर कोणी लिहिलं.’’ अभिजीत ते पुसण्याचा प्रयत्न करतो, पण ते निघत नाही.
‘‘कदाचित त्या आकृतीचा हा परिणाम असावा. ती आकृती नक्की आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण आपल्याला ते कळत नाहीये.’’ अॅंजेलिना म्हणते.
"पण या आकृत्या पाहून आपल्याला काय समजेल?" डॉ.एरिक म्हणतो.
"इम्रान, त्या आकृतीचा तुला अंदाज आला असेल, तू त्याचं स्केच काढू शकशील का?" इम्रान होकारार्थी मान हलवतो. "मला आतापासूनच याच्यावर अभ्यास सुरु करायचाय. काहीतरी मार्ग काढला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. डॉ.अभिजीत, मला तुमची मदत लागेल." अॅंजेलिना म्हणते.
अभिजीत होकारार्थी मान हलवतो.