
अग्निपुत्र Part 1 : ४,००० वर्षांनंतर
अग्निपुत्र ही मराठीतील एक साय-फाय कादंबरी आहे. हा प्रकार इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत मराठीमध्ये खूपच कमी आहे. एक वेगळा प्रयोग म्हणून सध्या ही कादंबरी वेगवेगळ्या भागांमध्ये दर शनिवारी ब्लॉगवर प्रकाशित केली जाणार आहे. कादंबरीचे सर्व भाग ब्लॉगवर पूर्ण झाल्यावर ही कादंबरी ई-बुक स्वरुपात PDF Format मध्ये उपलब्ध केली जाणार आहे.
४,००० वर्षांनंतर :
पृथ्वीची रचना आणि सजीवांची संरचना यांत अभूतपूर्व बदल घडले होते. एकविसावे शतक सुरु झाले होते. मनुष्य प्राण्याने पृथ्वीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले होते. यंत्र आणि यंत्रमानवांचा शोध लागलेला असतो. रस्ते, इमारती, पायाभूत सुविधा विकसित झालेल्या असतात. मनुष्य प्राणी विमानाच्या सहाय्याने आकाशात उडू शकत होता, जहाजाच्या सहाय्याने पाण्यात, पाणबूडीच्या सहाय्याने पाण्याच्या आत तर अवकाशयानाच्या सहाय्याने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊ शकला. मात्र ज्या ठिकाणी रुद्रस्वामी आणि अग्निपुत्र जमिनीखाली गाडले गेले त्या सुप्त ज्वालामुखीपर्यंत तो पोहोचू शकला नाही, त्याला त्या सुप्त ज्वालामुखीमागील शांतता देखील माहित नव्हती.
मानवाच्या शरीराप्रमाणे मेंदू चांगल्या प्रकारे विकसित झाला होता. वैज्ञानिकांनी अनेक स्तरांवर क्रांती घडवून आणली होती. जन्म मृत्यूच्या प्रमाणात मानवी वैचारिक क्रांतीचा मोठा भरना होता. त्यांच्या रचना आणि संरचनांचे आविष्कार संपुर्ण जगाला ठाऊक होतो.
अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर भू-उत्खनन करणारे आणि भुगर्भशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या जॉर्डन आपल्या समुहासह हिमालय येथे उत्खननाचे कार्य सुरु करतात. त्यांच्या समुहामध्ये प्राचीन भाषांची अभ्यासिका अॅंजेलिना, भु-उत्खननमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवलेले डॉ.मार्को आणि डॉ.एरिक, भु-मापन शास्त्रज्ञ इम्रान आणि भारतीय वंशाचे भुगर्भशास्त्राचे उच्च पदवीधर डॉ.अभिजीत त्यांना हिमालयाच्या जवळपास मिळालेल्या काही अमानवी शारीरिक सांगड्याांच्या तपासासाठी तेथे आलेले असतात. सांगड्याांबरोबर मिळालेले प्राचीन काळातील काही चित्रविचित्र नमुन्यांचा तपास करण्यासाठी जॉर्डनला त्याच्या समुहासह गुप्त मोहिमेवर पाठविले असते.
"वैज्ञानिकांनी इतके शोध लावले, समुद्राच्या खोलवर आपण जाऊ शकलो. आणि इथे हिमालयामध्ये हा विचित्र सांगाडा कुणालाही दिसला कसा नाही?" इम्रान जॉर्डन यांना विचारतो.
"आपण अवकाशात अगदी मंगळ ग्रहापर्यंत पोहोचलो, पण पृथ्वीच्या फक्त २३ कि.मी. आत आपण पोहोचू शकलो. आपलं तंत्रज्ञान तेवढ विकसित नाही झालंय." जॉर्डन म्हणतात.
डॉ.अभिजित, डॉ.मार्को आणि डॉ.एरिक तिथे खोदकामात मिळालेल्या नमुन्यांच परीक्षण करत असतात. भारत आणि चीन यांच्या दरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार होती. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमताने हिमालयातून रेल्वे सेवा सुरु करण्याचे ठरवले होते. त्यासाठी भुयार खोद-काम सुरु असताना कामगारांना एक विचित्र सांगाडा सापडला. ही गोष्ट त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितली असता भारत सरकारने जॉर्डन आणि त्यांच्या समूहाला गुप्त मोहिमेवर पाठविले होते.
प्राचीन भाषांचा सखोल अभ्यास असलेली अॅंजेलिना तिथे कोरलेल्या चित्रांचं निरीक्षण करत होती. "डॉ.अभिजीत, जरा इकडे येता का?" डॉ.अभिजीत अॅंजेलिनाजवळ जातात, "काय झालं? काही सापडलं का?"
"हो. तुम्ही जरा बारकाईने पाहिलं तर तुम्हाला समजेल की, ४,००० वर्षांपूर्वी देखील त्यांची एक विशिष्ट भाषा होती. म्हणजे आपण म्हणतो, त्या वेळी हडप्पा, मोहोंजेदडोप्रमाणेच हिमालय मध्ये देखील मनुष्य वसाहत करून राहत होता. हे जर खरं असेल तर हा आतापर्यंतचा खूप मोठा शोध असेल." तोपर्यंत डॉ.मार्को आणि डॉ.एरिक तिथे पोहोचले असतात.
"हे पुरावे आतापर्यंत कुणाला दिसले कसे नाहीत?" डॉ.एरिक विचारतात.
"आतापर्यंत हिमालयात कधी खोदकाम केले नव्हते, म्हणून कदाचित आतापर्यंत कुणाला हे माहित नसेल." डॉ.मार्को म्हणतात.
"कदाचित असेही असू शकेल, हडप्पा मधील लोक इथे आले असतील." डॉ.अभिजीत म्हणतात.
"नाही सर, मी त्या भाषेचा अभ्यास केला आहे. ती भाषा आणि ही भाषा खूपच वेगळी आहे आणि त्या भाषेपेक्षा ही भाषा खूप प्रगत आहे. आणि मी डोळे बंद करून सुद्धा सांगू शकते की ही भाषा ४,००० वर्षांपूर्वीचीच आहे." अॅंजेलिना बोलत असताना इम्रान आणि जॉर्डन तिथे पोहोचतात.
"आपल्याला खोदकाम करण्यासाठी कामगारांची आवशक्यता आहे का?" जॉर्डन विचारतात.
"होय सर. पण ते प्रशिक्षित असायला हवे. खोदकाम करत असताना फावडा इकडचा तिकडे गेला तर नुकसान होण्याची शक्यता आहे आणि अभ्यासात देखील अडचण येईल." अॅंजेलिना
"हम्म... बरं, तुला किती माणसांची आवशकता आहे?" जॉर्डन
"२०-२२ कामगार लागतील खोदकाम करायला." अॅंजेलिना
"ठिक आहे, काम सुरु ठेवा. अॅंजेलिना बोलत असलेली गोष्ट खरी आहेच यात काही वाद नाही, पण जर आपल्याला त्याचे पुरावे मिळाले तर ही इतिहासातली खूप मोठी घटना मानली जाईल." जॉर्डन म्हणतात.
"हे... लवकर इकडे या..." इम्रान सर्वांना आवाज देतो. सार्वजन धावत तिथे जातात. त्यांना जे सापडतं ते खूप अद्भुत असतं. मानवी शरीरापेक्षा मोठ्या आकाराची मानवी कवटी त्यांना सापडते. जॉर्डन आणि डॉ.एरिक लगेच तिथे जातात आणि ती महाकाय कवटी बाहेर काढू लागतात.
"डॉ.अभिजीत, हे नक्की काय समजावं?" अॅंजेलिना डॉ.अभिजीतला विचारते.
"ही तर सुरुवात आहे. आता बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. मी तर आश्चर्यचकित होणं सोडून दिलंय." डॉ.अभिजीत अॅंजेलिनाला म्हणतात.