Fantasy Editor
Updated: 15 April 2021 07:30 IST
पाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा : भाग १
वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगाने नेहमीच सामान्यांचे कुतुहूल जागृत केले आहे. हि एक अशी कथा आम्हाला तंत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. संपूर्ण कथा काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत त्या सर्वांचा आदर आम्ही करतो.
शुकाच्या मनात वादळ उठले होते. भय, आश्चर्य आणि हुरहूर अश्या भावनांचे विचित्र मिश्रण त्याच्या अंगात उद्भवले होते. काही काही क्षणांनी अंगावर काटे उठत होते. अमावास्येच्या रात्रीचे तापमान इतके कमी जरी नसले तरी शुकाच्या हाडांना थंडी वाजत होती. गुरुदेव रक्तसंभव झपाझप पुढे चालत होते. शुक मागे येत आहे कि नाही हे सुद्धा त्यांच्या ध्यानात नसावे असेच कुणाला वाटले असते पण अनेक महिन्यांच्या अथक सेवे नंतर आज ते स्वतः शुकाला घेऊन स्मशानात आले होते. अमावस्या म्हणजे महवराहच्या मंदिरात बसून मौनव्रताने साधना करण्याचा दिवस पण आपले कदाचित हे व्रत तोडून ते शुकाची इच्छा पूर्ती करणार होते. गुरु रक्तसंभवा विषयी अपार श्रद्धा भाव असला तरी आज जे काही होणार होते तो त्याचा हक्क होता.
. . .