डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
सौरभ वागळे Updated: 15 April 2021 07:30 IST

डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य : प्रकरण 1

स्वतःला डीटेक्टिव म्हणवणारा अल्फा आणि त्याचा पुस्तकी किडा मित्र प्रभव एक रहस्य कसे उलगडवतात

  प्रकरण 2

चोवीस जुलैची ती ढगाळ संध्याकाळ होती. सांगलीच्या विश्रामबाग चौकात दाटीवाटीने भरलेली आमची रिक्षा थांबली आणि सुटकेचा निश्वास टाकत मी खाली उतरलो. रिक्षावाल्याला पैसे देऊन चालता केला आणि मी माझी बोजड स्लायडर बॅग ओढत रस्त्याकडेने चालू लागलो. सात वाजायला आले होते. सूर्य कधीच अस्ताला गेला होता. चारच दिवसांपूर्वी मला येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अ‍ॅडमिशन मिळाले होते आणि तेव्हाच आम्ही जवळच्या परिसरातील एक रुम भाड्याने घेतली होती. मी मुळचा इचलकरंजीचा. शहरात नवीन असल्याने मला रस्ता आठवण्यास थोडे कष्ट पडले. कॉलेजच्या बाजुने थोडे अंतर चालून गेल्यानंतर मला माझी ओळखीची इमारत दिसली. - 'विश्रांती'.


खालूनच मी माझ्या पहिल्या मजल्यावरील  रुमकडे पाहिले. आतून प्रकाश दिसत होता. याचा अर्थ माझा रूममेट गावाहून परत आला होता. गेल्या आठवड्यात आम्ही रुम घ्यायला आलो तेव्हा तो बाहेरगावी गेला होता. त्यामुळे माझी आणि त्याची भेट होऊ शकली नाही. पण आमच्या बाबांचा आग्रह! 'ज्याच्याबरोबर रुम शेअर करायचीय त्याची सगळी माहिती आपल्याला असायला हवी!' त्यामुळे बाबांनी रूमच्या मालकाकडून त्या मुलाचा फोन नंबर घेतला आणि त्याला फोन करून त्याची सगळी कुंडली काढून घेतली. त्याचं बोलणं जरा विचित्रच होतं, पण एकुण तो मुलगा चांगला वाटला- अनिकेत महाजन.


कसा असेल हा मुलगा? मी विचार केला. एका अनोळखी व्यक्तीबरोबर रुम शेअर करायची म्हणजे मनाला थोडी हुरहुर लागतेच. मी तसा सुसंस्कृत आणि सभ्य लोकांच्या वर्गात मोडत असल्याने हा अनिकेत महाजन एक निर्व्यसनी आणि डोके ठिकाणावर असलेला माणूस निघावा अशी मी मनोमन प्रार्थना केली.


मी 'विश्रांती' इमारतीच्या पायऱ्या चढलो आणि माझ्या रूमचा-रुम नं 3 चा दरवाजा ठोठावला. एका तरतरीत, प्रसन्न चेहर्‍याच्या, उंचपुऱ्या, स्टायलिश केशरचना केलेल्या आणि अंगाने मजबूत दिसणाऱ्या मुलाने दार उघडले.


"प्रभव?" त्याने विचारले.


"अं.. होय. तू अनिकेत का?" मी विचारले.


"हो. ये. तुला भेटून खूप आनंद झाला." अनिकेतने मला बॅग आत आणून ठेवण्यास मदत केली. या भेटीत आनंद वाटण्यासारखे काय होते ते मला समजेना, "तसं मला 'अल्फा' म्हटलेलं जास्त आवडेल."


"अल्फा? ते का म्हणे?" मला जरा विचित्रच वाटले.


"माझे नाव 'अ' अक्षरावरून सुरू होते. 'अ'  म्हणजे मराठी भाषेतील पहिले अक्षर. तसेच इंग्रजीमध्ये माझ्या नावाचे स्पेलिंग 'A' वरुन सुरू होते, जे इंग्रजी बाराखडीतील पहिले अक्षर आहे. मग माझे टोपणनावसुद्धा कुठल्यातरी भाषेतील पहिल्या अक्षरावरून सुरू व्हायला हवे अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी हे नाव घेतले. माझ्याकडे असा चक्रावून पाहू नकोस, मला माहितीये, टोपणनाव घ्यायला ती काही बाजारातली भाजी नाहीये. पण मी माझ्या समाधानासाठी घेतले म्हण हवं तर. त्यामुळे मी स्वतःला 'अल्फा' म्हणवून घ्यायला सुरुवात केली - ग्रीक भाषेतील पहिले अक्षर! आहे ना मजेशीर? तसं फार कोणी मला अल्फा म्हणत नाही हा भाग वेगळा. ते नाव जरा विचित्रच आहे म्हणा. ग्रीक लोकांची विज्ञान आणि इतर क्षेत्रातील देणगी साऱ्या या जगाला ठाऊक आहे. अशा लोकांच्या पहिल्या अक्षराने माझ्यासारख्या बुद्दुला हाक मारली, तर ती भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल, नाही का?"


"हो, हो.. नक्कीच भाग्याची गोष्ट आहे! " मी जरा सटपटलोच. फोनवरदेखील याने अशाच लंब्याचौड्या गप्पा मारल्या होत्या आणि आमचा बॅलन्स संपवून टाकला होता. हा मुलगा जात्याच बडबड्या असावा असा मी अंदाज लावला.


" मी फ्रेश होतो. " त्याची बडबड सुरू राहू नये म्हणून मी म्हणालो. तसाही मला जाम थकवा जाणवत होता. मी तोंड धुतले, माझे सामान व्यवस्थित लावले, पाकिटातील नको असलेली तिकीटे, कागद कचऱ्याच्या डब्यात टाकले. माझी आवराआवर होईपर्यंत हा 'अल्फा' खुर्चीवर बसून शांतपणे माझ्याकडे पाहत होता. आमच्या फ्लॅटमध्ये दाटीवाटीच्या दोन रूम्स होत्या. त्यामुळे सामान व्यवस्थित लावणे हे एक दिव्यच होते. अखेर माझा रेनकोट मी टेबलावर ठेवला आणि खुर्चीत येऊन बसलो. अल्फा काही न बोलता वरती बघुन कसलातरी विचार करत होता. मी मघाशी त्याला असेच झटकल्यामुळे तो नाराज तर झाला नसेल ना अशी मला भिती वाटली. म्हणून मीच विषय काढला,


'तू बीएससीला आहेस तर मग? ' मला फोनवर बोललेले आठवले.


'ते बीएससी वगैरे असंच आहे. खरेतर मी एक डिटेक्टिव्ह आहे.' तो माझ्याकडे न बघताच म्हणाला. आता तर माझी जवळपास खात्रीच झाली की या मुलाचा स्क्रू जरा ढिलाच आहे. त्याच्या नकळत मी गालातल्या गालात हसलो.


'वा वा..' मी म्हणालो, 'बरं, मग डिटेक्टिव्ह म्हणजे नक्की काय करतोस तू?'


'मी पोलिसांना शोधकार्यात मदत करतो. ' तो म्हणाला. अजुनही तो तिसरीकडेच पाहत होता. मी आणखी काही विचारले असते तर मला हसूच आले असते. त्यामुळे मी थोडा वेळ शांत बसलो.


'तुला विश्रांतीची गरज आहे.' शेवटी अल्फाच माझ्याकडे बघून म्हणाला, 'तू थकलेला दिसतोयस.'


मी तेथून उठण्यासाठी कारणच शोधत होतो. ते अल्फाने आयतेच उपलब्ध करून दिल्यामुळे मी विश्रांती घेण्यासाठी उठून आत जायला निघालो. पण तेवढ्यात तो म्हणाला,


'आणि तू का थकणार नाहीस म्हणा. काल रात्रीचा पुण्याहून इचलकरंजीचा प्रवास, पुण्यातला जोरदार पाऊस, त्यातच तुझा रेनकोट हरवणं. सगळंच त्रासदायक होतं. शिवाय त्या बोजड बॅगेसोबत केलेला आजचा खडखडत्या बसमधला प्रवास. ड्रायव्हरने नेमकी आजच मेन रोड सोडून कच्च्या रस्त्यावरुन गाडी घातली. आणि त्याउप्पर रिक्षातून इथपर्यंत येताना जर उग्र वासाचा सेंट मारलेली स्त्री जवळ बसली असेल तर झालंच मग! असो. आता कॉलेजच्या निमित्ताने काहीतरी नवीन सुरू होतेय, ही तुझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. घर सोडण्याचे दुःख असेलच, पण त्याला काही इलाज नाही. आपण आयुष्यात पुढे जात रहायला हवं. तशी तुझी काही कटकटींपासून मुक्तता झाली आहेच की. जसे की तो वेडपट प्राणायामचा क्लास, ज्याला तुझ्या बाबांनी तुझ्या इच्छेविरुद्ध घातले होते. पण तुझ्या आधीच्या लाडक्या जिमसारखी जिम मात्र सांगलीत नाहीये हे मान्यच करायला हवे. पण माझ्या माहितीत इथल्या काही जिम्स आहेत. त्या तुला पसंत पडतात का बघ. तूर्त तरी तू विश्रांतीच घे. उद्या आपण बाहेर जाऊ. "


हे सगळे ऐकून मी चाटच पडलो. माझे 'आ'  वासलेले तोंड मिटेचना. पण लगेचच मला थोडा रागही आला.


" तू माझ्यावर पाळत ठेवून होतास की काय? " मी विचारले.


" नाही रे." अल्फा उत्तरला.


"मग तुला हे सगळं कसं काय ठाऊक?? "


" म्हणजे मी सगळं बरोबर सांगितलं??" त्याने उल्हासीत होऊन विचारले.


"अगदी..!! कुठेही चूक नाही. " मी थोडे गोंधळून म्हणालो.


" येस!!! याचा अर्थ मी प्रगती करतोय!! " अल्फाने खुष होऊन जवळपास उडीच मारली, " सावधान, गुन्हेगारी जगतातील लोकांनो, सांगलीमध्ये शेरलॉक होम्स पुन्हा जन्माला येतोय!! "


मी त्याचा उत्साह मावळण्याची वाट पाहू लागलो. मिनीटभराने जेव्हा अल्फाच्या लक्षात आले की मी अजुन गोंधळलेलोच आहे आणि त्याने हे सर्व कसे ओळखले हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, तेव्हा तो म्हणाला,


" अरे फारसे अवघड नव्हते हे. याला तर्कशास्त्र म्हणतात. तू इथे आल्यानंतर तुझे निरीक्षण करून मी हे सर्व अनुमान काढले. तू कचऱ्याच्या डब्यात जे कागदाचे चिटोरे टाकलेस, त्यात काल रात्रीचे पुणे ते इचलकरंजीचे तिकीट होते. म्हणजेच तू पुण्याला गेला होतास आणि काल रात्रीच परत आला आहेस. जागरणाने थोडे लाल झालेले तुझे डोळेही तेच सांगतायत. तू जो रेनकोट हातातून आणलास त्यावर पुण्यातील एका सुप्रसिद्ध दुकानाचे लेबल आहे आणि तो अजून न वापरल्यासारखा चकचकीत आहे. म्हणजेच तो परवाच घेतला असणार आणि पुण्यात घेतला असणार. मग तुला पुण्यात रेनकोट घेण्याची गरज का पडली? कारण एकतर तू रेनकोट जाताना बरोबर घेतलाच नसणार, किंवा तिकडे जाऊन तू हरवला असणार. सध्या पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जाताना रेनकोट बरोबर घेण्याएवढा शहाणा तू असशील असे मी गृहीत धरले आणि तसा तू निघालासही.


पुढे खडखडत्या बसबद्दल म्हणशील तर त्याला तर डोके लावण्याची गरजच नव्हती. कारण इचलकरंजी - सांगली मार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे कालपासून बंदच आहे आणि सगळ्या गाड्या दुसऱ्या कच्च्या मार्गावरूनच येतायत. याखेरीज तू आलास तेव्हा तुझ्या अंगाला लेडीज परफ्यूमचा वास येत होता. तो तू तर नक्कीच लावला नसणार. याचा अर्थ रिक्षामध्ये एखादी भरपूर परफ्यूम मारलेली बाई तुझ्या बाजूला बसलेली असावी. आहे ना सुसंगत सगळं? "


मी तर थक्कच झालो.


" अनबिलीव्हेबल! " मी म्हणालो, " हे सर्व ठिक आहे, पण तो प्राणायामचा क्लास आणि जिम? तो क्लास माझा नावडता होता आणि जिम आवडती होती हे तुला कसे काय कळाले? ते तर मी कुठे बोललोही नव्हतो! "


" तेही तू कचऱ्यात टाकून दिलेल्या कागदांवरुनच मला कळाले. " अल्फा हातात कागदाचे दोन चिटोरे नाचवत म्हणाला, "या दोन्ही ठिकाणच्या सोडचिठ्ठ्या आहेत. यातली प्राणायामचा क्लास सोडल्याची पावती तू पाकिटातून काढून लगेच टाकून दिलीस. पण जिमची पावती टाकण्याआधी तू थोडा विचार केलास आणि मग ती न टाकता तू व्यवस्थित बाजूला ठेवून दिलीस. यातून हेच स्पष्ट होत नाही का, की तुला तो प्राणायामचा क्लास नको होता, पण जिम हवी होती! "


" अफलातून!! " मी प्रभावित होऊन म्हणालो, " भन्नाटच दिसतोयस तू! "


" धन्यवाद धन्यवाद!! " अल्फा स्तुती स्वीकारत म्हणाला, " मी नेहमी असे तर्क करत असतो. पण ते इतके कधी बरोबर येत नाहीत. वा! आजचा दिवस डायरीत लिहून ठेवायलाच पाहिजे. "


" तू इतका हुशार आहेस तर कॉलेजचा टॉपरच असशील. " मी म्हणालो. (मी स्वतः माझ्या कॉलेजचा टॉपर होतो.)


" छे रे! उलट मी तर कॉलेजमधील सर्वात मठ्ठ मुलगा आहे. " अल्फा हसून म्हणाला, " माझा तर्क ढिग असेल चांगला. पण आपलं डोकं अभ्यासात काही चालत नाही बुवा. तुला खरं सांगू का मित्रा? मला अभ्यास करावा, परिक्षेत पहिला यावं असं कधीच वाटत नाही. माझं मन भिरभिरत असतं नेहमी. मला आयुष्यातील रहस्यांचा शोध घ्यावासा वाटतो-जी अभ्यासापेक्षा निश्चितच चित्तथरारक असतात... मनोवेधक... विचित्रच योगायोग आहे ना? तुझ्यासारखा टॉपर मुलगा आणि माझ्यासारखा विक्षिप्त आणि विचित्र मुलगा, दोघेही एकाच रुममध्ये यावेत? इथे तू राहिलास तर केवळ दोनच गोष्टी होऊ शकतात - एकतर तू महिन्याभरात कंटाळून रुम सोडशील, नाहीतर आपली मैत्री इतकी घनिष्ठ होईल, की आपल्याला एकमेकांशिवाय करमणार नाही."


मी उत्तरादाखल हसलो.


"असो." अल्फा म्हणाला, "उद्यापासून तुमचं कॉलेज सुरू होणार. लेक्चर्स, अभ्यास, परिक्षा.. सरळ साधे निरुपद्रवी जीवन. तसे पहायला गेले तर जीवन नेहमीच सरळमार्गी असते ; जर आपण सरळच मार्गाने गेलो तर. पण जीवनातले आडमार्ग खुपच भन्नाट असतात. कैक प्रकारची संकटे, धोके, रहस्ये आणि दुःखही भेटेल तुम्हाला. पण त्यावरून चालण्यात जी मजा आहे ती सरळ साधे जीवन जगण्यात नाही. कसे जगायचे, हे मात्र आपल्यावर अवलंबून आहे. मला तर बुवा 'आपण भलं, आपलं काम भलं' अशी विचारसरणी जमत नाही. दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसायची मला भारी सवय आहे. मी तुला निश्चितच असे अनुभव देऊ शकेन, जे याआधी तू कधीच अनुभवले नसशील.. अर्थात, जर तू तुझ्या अभ्यासातून वेळ काढलास तर! "


" मी नक्कीच प्रयत्न करेन. " मी म्हणालो, " बाय द वे, तू मुळचा आहेस कुठला? त्याबद्दल तू काहीच सांगितले नाहीयेस. "


" आता हा विषय निघाला की परत माझी बडबड सुरू होईल. त्यामुळे सध्या तरी हा प्रश्न तुझ्या मनातच ठेव. कारण आता जेवायची वेळ झालेली आहे. " खुर्चीवरून उठत अल्फा म्हणाला, " चल, आवर तुझं. निघायला हवं आपल्याला. "


त्याने हा विषय टाळल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. त्याचे म्हणणेही चूक नव्हते म्हणा. त्याने पुन्हा बडबडायला सुरुवात केली, की आणखी अर्धा - पाऊण तास फुकट गेला असता. त्यामुळे मीही काही न बोलता तयार झालो. अल्फाबद्दलचे माझे मत आता संदिग्ध झाले होते. तो खरोखरीच डिटेक्टिव्ह वगैरे होता का? की असेच हवेत गोळ्या मारणारा बोलबच्चन होता? त्याने मघाशीच केलेले तर्क - अनुमान त्याच्या बुद्धिमत्तेची झलक दाखवित होते खरे ; पण अंदाज कधी कधी बरोबर येऊ शकतातच की. माझ्या बाबांना जर कळाले असते की मी एका डिटेक्टिव्हगिरी करणाऱ्या मुलासोबत राहतोय तर त्यांनी दोनच दिवसांत मला नवीन रुम शोधून दिली असती. (बाबांची इच्छा - माझ्यासोबत राहणारा मुलगादेखील टॉपरच असावा!) तरीही मी तेथेच राहण्याचे ठरवले. अल्फा जरी विचित्र असला तरीही तो विश्वास ठेवण्याजोगा वाटत होता. त्यामुळे थोडे दिवस थांबायला काय हरकत आहे, असा मी विचार केला. अल्फा म्हणाला त्याप्रमाणे शेवटी दोन्हीपैकी एक काहीतरी होणारच होते - एकतर घनिष्ठ मैत्री, नाहीतर दुसरी रुम! अखेर माझा निश्चय पक्का करीत मी अल्फासोबत जेवायला बाहेर पडलो.




. . .