शिप ४४ : सीता
सीता शिप ४४ वर एकटीच का आहे ? शिप ४४ कुठे जात आहे ? हि एक स्पेस गूढकथा आहे.
त्या भव्य किचन हॉल मध्ये सीता मंदगतीने चालत होती. तिने कॉफी व्हेंडिंग मशीन वर कळ दाबली आणि एक प्लास्टिक चा गरम गरम कॉफीने भरलेला कप पुढे आला. दुसऱ्या मशीन मधून आर्टिफिशिअल चिकन सँडविच आणि चौथ्यातून टोमॅटो केचप आले. अनेक वेळा कळ दाबून त्या मशीन्स ची सर्व बटणे झिजून गेली होती. तरी सुद्धा सर्व काही व्यवस्थित चालू होते हेच आश्चर्य. हॉल ७ मधील टेबल ४४ वर सीता बसली. दररोर्ज त्याच एकाच टेबल वर बसून बसून टेबल खुर्ची झिजली होती. त्या अति प्रचंड स्पेस शिप मध्ये ती एकटीच होती.
कुठल्या तरी शतकांत मध्ये मानवाला स्पेस चा वेध लागला. सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध होते फक्त नव्हते ते प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे यान. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी माणूस कुठपर्यंत जाणार हे मानवाच्या आयुर्मर्यादेवर ठरत होते. पण डॉक्टर्स नि एक महत्वाचा शोध लावला जो वापरून मानवी DNA बदलून लक्षावधी वर्षे जगू शकणारे मानव बनवणे शक्य होणार होते. त्यासाठी एकूण ३०० पुरुष आणि स्त्री निवडले गेले आणि त्यांच्यापासून लहान मुले बनवली गेली, गर्भांत असतानाच त्यांचा DNA बदलला गेला. त्याच वेळी हे महाप्रचंड शिप बनवण्याचे काम मनुष्याने केले. एकूण ५०० मुले निर्माण केली गेली ज्यातून फक्त एक वाचले. सीता.
सीता अतिशय लहान असतानाच म्हणे हे स्पेसशिप ४४ म्हणे सोडण्यात आले. सीता जैविक दृष्ट्या अमर होती म्हणजे तिला वृद्धापकाळ कधी येणार नव्हता आणि ह्याचा एक साईड इफेक्त्त म्हणजे तिचे बालपण सुद्धा साधारण १०० वर्षाचे असणार होते. त्यामुळे तिच्या संगोपनासाठी एक शास्त्रज्ञाची पिढी चालणार नव्हती तर दोन पिढ्या लागणार होत्या. त्यामुळे जेंव्हा शिप ४४ सोडण्यात आले तेंव्हा त्यावरील सर्व लोक तरुण होते, त्यांनी काही मुले निर्माण केली आणि त्या मुलांना शिकवून त्यांनी सीताची देखभाल करायला सांगितले. शिप अत्यंत प्रचंड अश्या साठी बनवले होते कि ते वापरून एखाद्या दुसऱ्या ग्रहावर संपूर्ण मानवजातीचे पुन्हा निर्माण करणे शक्य होईल. क्रायो विभागांत कोट्यवधी जीव जंतू, जनावरे, झाडे इत्यादीची बीजे ठेवली होती. ४४ एकदा कुठल्या योग्य प्रकारच्या ग्रहावर पोचले कि सर्वप्रथम एक छोटा प्रोब पाठवून सीता ग्रहाच्या वातावरणाचा अंदाज घेईल. आणि ते योग्य वाटल्यास सीता क्रायो मधील काही डझन मानवी गर्भांना कृत्रिम गर्भांत प्लांट करून त्यापासून अर्भके निर्माण करेल,. रोबोट्स च्या मदतीने त्यांचे संगोपन करून १०-२० वर्षांत मोठे करेल. तो पर्यंत शिप ४४ त्या ग्रहाच्या सभोवताली फिरत राहून संपूर्ण ग्रहाचे आणि त्याच्या सौरमालिकेचे मॅपिंग करेल असा हा प्रकल्प होता.
सीतला वेळेचा सुद्धा विसर पडला होता. ती सोडून शेवटची जिवंत व्यक्ती म्हणजे कॅप्टन डॉक्टर पाब्लो होता. तो मरून कदाचित शेकडो किंवा हजारो वर्षे सुद्धा गेली असू शकत होती. तो पर्यंत अनेक लोकांनी तिला अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. गणित, खगोल शास्त्र, भूगर्भ शास्त्र, जैव विज्ञान, भाषा, संगणक इत्यादी. तिच्याकडे असंख्य वर्षे असल्याने तिने शिप वाले लक्षावधी तासांची रिकॉर्डिंग्स पहिली होती ह्यांत पृथ्वीवरील सर्व विद्वानांची व्याख्याने होती. तिने लक्षावधी पुस्तके वाचून काढली होती. किमान ४० भाषा तिला अवगत होत्या.
जितका वेळ तिने शिप वर घालवला त्यांतून तिला अनेक गोष्टी समजू लागल्या होत्या ज्या तिला मानवांनी शिकवल्या नव्हत्या. पहिली गोष्ट म्हणजे शिप वरील काही कंट्रोल्स, मॅन्युअल्स आणि अनेक गोष्टी ह्या नवाहो ह्या भाषेंतून लिहिल्या होत्या. पण हि भाषा शिकण्याची काहीही साधने त्या शिप वर उपलब्ध नव्हती त्यामुळे मुद्दाम तिने शिप चे सर्व कंट्रोल्स आणि मॅन्युअल्स वाचू नये म्हणून ते तसे केले असावे असे तिला वाटत आले होते. त्याशिवाय कालमापनाची विशेष साधने ४४ वर अजिबात नव्हती. त्यामुळे नक्की किती दिवस जात आहेत हे तिला समजत नव्हते. असे मुद्दाम केले होते कारण ४४ अवकाशांतून अनंत काळ फिरणार होते. कालमापन केल्याने कदाचित मनावर ताण पडेल त्यामुळे उगाच दिवस मोजण्यापेक्षा प्रत्येक दिवस आजचा म्हणून घालवावा आणि शिप वरील यंत्रणांना ग्रह शोधण्याचे काम करू द्यावे असे पाब्लो ने मरताना सीता ला सांगितले होते.
एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानवी इतिहास, संस्कृतीचे मर्म सीता कोळून पिली असली तरी ती स्वतःला मानव समाजात होती कि नाही हे तिलाच ठाऊक नव्हते. मानवी जीवन साधारण १०० वर्षांचे असते, तिच्यासाठी तितका काळ म्हणजे समुद्रांतील एकाद्या दवबिंदू प्रमाणे तुच्छ होता. जगणे, प्रेम, संबंध, सेक्स, प्रजनन, कला, संगीत, नृत्य आणि अनेक गोष्टी ज्या मानवी मनाला भुरळ घालत त्या तिच्या मनाला बेचव वाटत. ती गोबर्ट प्रमाणे पियानो आणि हरविरत सिंग प्रमाणे तबला वाजवू शकत होती. नृत्याचे सर्व प्रकार तिला ठाऊक होते. पण त्यांत मानवी मनाला इतके चांगले का वाटते हे तिला समजत नव्हते. पृथ्वीवरील जीवन अगदी बेचव वाटत होते.
खगोल शास्त्र तिचा आवडता विषय. तिला अंतराळ आणि तारे प्रत्यक्षांत पाहायचे होते पण हे स्पेस शिप ४४ पूर्णपणे बंद होते. ह्याला कॅमेरा, ग्लासीस वगैरे काहीही नव्हते. स्पेस मध्ये आपण नक्की कुठे आहोत ते सुद्धा दाखवणारे यंत्र इथे नव्हते. आणि तसे मुद्दाम केले होते म्हणजे शिप वरील कुणीही माणसाने त्या शिप ला दिशा देण्याचे काम करून नये आणि शिप च्या स्वयंचलित यंत्रणांनी सर्व काही सांभाळावे असा उद्धेश ह्यामागे होता. सीताने अनेक प्रयत्न करून सिस्टम्स हॅक करायचा प्रयत्न केला होता. तिने सर्व मृत क्रू च्या खाजगी डायऱ्या वगैरे गोळा करून तिच्या पासून लपवली गेलेली सर्व माहिती पुन्हा मिळवण्याचा प्रयन्त केला होता पण तिला त्यांत १००% यश आले नव्हते. पण तिच्यापासून खूप काही लपवून ठेवण्यात आले होते हे नक्की.
दिवस कुठला तो ठाऊक नव्हता पण आजचा हा दिवस वेगळा होता. फ्रेंच रोस्ट कोफी पिट असताना सिस्टम रेड अलर्ट चा आवाज आला. काही क्षण तिला ते स्वप्न वाटले पण नंतर तिच्या लक्षांत आले कि शेकडो वर्षे ती ज्या गोष्टीची वाट पाहत होती ती घडली आहे. तिने जेवण तसेच टाकून आपल्या खोलीकडे धूम ठोकली. तिथे एक डिजिटल चावी ठेवली होती. ती घेऊन ती मुख्य डेक कडे आली. तिथे ३d स्वरूपांत प्रथम कॅप्टन रो नाकामोटो होते. त्यांची रिकॉर्डिंग प्ले होत होती. तिला दिलेली डिजिटल कि फक्त रेड अलर्ट मध्ये कार्यान्वित होईल असे तिला सांगितले गेले होते. तिने अनेक वेळा मुख्य डेक मधील त्या पोर्ट मध्ये चावी लावून पहिले होते पण काहीही घडले नव्हते. आज मात्र दिवस वेगळा होता.
"प्रिय एजन्टस, मी कॅप्टन नाकामोटो. हा मेसेज तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जिवंत आहात ह्याचाच मला खूप मोठा आनंद आहे. संपूर्ण मानवी इतिहासातील तुम्ही सर्वाधिक महत्वाचे माणूस आहात. मी कदाचित मरून अनेक वर्षे झाली असतील. आणि रिकॉर्डिंग स्वरूपांत तुम्ही हे ऐकत असाल. रेड अलर्ट चा अर्थ असा आहे कि मानवी जीवनास योग्य असा एक ग्रह आमच्या ह्या यानाने शोधला आहे. अर्थांत ह्या यानाच्या यंत्रणा लक्षावधी किलोमीटर दूर असलेल्या ग्रहांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढतात. त्यामुळे अजून त्या ग्रहाकडे पोचण्यासाठी आम्हाला किमान ८ वर्षे आहेत आणि तो प्रवास होई पर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने तयारी करू शकता. "
सीता लक्षपूर्वक ऐकत होती. आता ती मुक्त होऊ शकत होती.
"पण, सर्वप्रथम जी माहिती तुमच्याकडून आम्ही लपवली होती ती तुम्हाला आता देणे आवश्यक आहे. आणखीन काहीही करण्यापूर्वी हे ज्ञान आपण आता कन्सोल ४ द्वारे मिळवू शकता. ह्या प्रकारचे शिप बनवणे किंवा तुमच्यावर वैज्ञानिक प्रयोग करणे ह्यांत अनेक प्रकारचे नैतिक प्रश्न उद्भवतात. संपूर्ण मानवजातीचे भवितव्य तुमच्या हातात असल्याने तुम्ही सर्वप्रथम हि माहिती पहिली पाहिजे."
सीताने कन्सोल ४ कडे धाव घेतली. तिने बटन दाबताच संपूर्ण माहिती आली.
पृथीवर माणसाने प्रचंड तंत्रज्ञानिक प्रगती केली पण त्यामुळे इतकी सुबत्ता आली कि सर्वच गोष्टी यंत्रे करू लागल्या आणि माणसांना काम असे उरले नाही. चिरतारुण्याचा शोध दृष्टीक्षेपांत आला आणि पृथ्वीच्या वाहेर सुद्धा आता जायला पाहिजे हि जाणीव माणसांना झाली. काही अत्यंत चतुर आणि दूरदृष्टी असलेल्या माणसांनी शिप १ चे निर्माण सुरु केले. पण ते त्यांच्या पसंतीस पडले नाही म्हणून शिप २ चे निर्माण झाले ... शेवटी शिप ४४ वर मात्र सर्वांचे समाधान झाले. त्याच वेळी सीता सारख्या चिरंजीवी मनुष्यांच्या जनुकांचा सुद्धा शोध लागला.
हे सर्व करत असताना काही मानवांनी मात्र एक विश्वयुद्ध आरंभले. त्यातून प्रचंड नरसंहार झाला. इतका मोठा कि शिप ४४ च्या निर्मात्यांना शिप लाँच करणे भाग पडले. शिप ४४ म्हणजे एक छोटासा देशच जणू. इतक्या महाप्रचंड शिप ला स्पेस मध्ये नेण्यासाठी तश्याच अति प्रचंड रॉकेट ची गरज होती जे नव्हते. तर शिप ४४ च्या निर्मात्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. तो इतका अभूतपूर्व आणि कल्पनातीत होता म्हणूनच तो निर्णय सीता पासून लपवलेला गेला होता.
शिप ४४ हे स्पेस शिप असले तरी ते पृथ्वी सोडून अंतराळात गेले नाही. उलट ते समुद्रांत बुडवण्यात आले. समुदाच्या खोलांत अनेक मोठी विवरे आहेत त्यातून ते काही ज्वालामुखीच्या तोंडातून आंत शिरून पृथीवच्या उदरांत नेले गेले. बांधकाम अत्यंत चांगले असल्याने लक्षावधी वर्षे लावा मध्ये राहून सुद्धा त्या शिप ला काहीही फरक पडणार नसता.
शिप ४४ हे अवकाशांत नसून पृथ्वीच्या उदरांत लपलेले आहे हे एक सत्य होते आणि ते लक्षांत येताच अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. संपुन यान इतके ऑटोमेटेड का आहे. इथे अवकाश पाहण्यासाठी काहीच साधने का नाहीत आणि हे सर्व सीता पासून का लपवले गेले होते हे स्पष्ट झाले. हे सत्य समजल्यानंतर सीताच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाले. पण सर्व सिस्टम्स तिच्या साठी आता खुल्या असल्याने तिला सर्व माहिती मिळवणे शक्य होते.
सूर्याच्या वातावरणातील बदलाने पृथ्वीवर प्रचंड उलथापालथ होणार होती हे लक्षांत येतंच पृथीववरील काही लोकांनी शिप ४४ ला समुद्रांत ढकलण्यासाठी बदलले. समुद्रांत खोलवर बोगदे खणून त्यातून हे यान आंत लपवून ठेवण्यात आले. पण विविध प्रोब्स पाठवून हे यां बाहेरील जगाची इत्यंभूत माहिती ठेवत होते.
ते सर्व पाहून सीता थक्क झाली. सूर्याच्या बदलांनी पृथ्वी अचानक थंड झाली आणि अनेक लोक मृत्युमुखी पडले. अवकाशांतून उल्कापात होऊन सर्व शहरे जमीनदोस्त झाली आणि पर्वत सुद्धा हलले. हळू हळू पृथ्वी गरम झाली आणि जे वाचले होते त्यांनी नवनिर्माणाची सुरुवात केली. काहीच गोष्टी वाचल्या होत्या. एक म्हणजे आताच्या इजिप्त पढील पिरॅमिड्स. जुनी संस्कृती नष्ट झाली असली तरी आश्चर्यकारक दृष्ट्या काही माहिती त्या जंगली वाटणाऱ्या मानवांनी सुद्धा आठवणीत ठेवली होती. म्हणजे शिप ४४ चे निर्माण, त्याला पाण्यात नेणे इत्यादी गोष्टी विविध धर्मांत मनू, नोआ चे आर्क इत्यादी पद्धतीने आठवणीत होते. हळू हळू मानवांनी प्रगती केली. शिप ४४ चे प्रोब्स सगळी कडे फिरत होतेच ज्याला काही लोकांनी UFO म्हट्ले. रोमन साम्राज्य निर्माण झाले, भारत आणि चीन ह्यांनी मानवी ज्ञानांत फार मोठी भर घातली, शेवटी विविध युद्धे होऊन अमेरिका सर्वांत बलाढ्य देश बनली. आणि त्यांनी सुद्धा मंगळ, चंद्र इत्यादी अवकाशातील ग्रहाकडे मोर्चाचे मिळवला .
माणसांनी प्रगती करावी अशीच शिप ४४ ची अपेक्षा होती. मानवी प्रगतीने पुन्हा एकदा पृथ्वी चांगला ग्रह बनला होता. कार्बन मुळे पृथ्वी चांगली उबदार बनली होती आणि त्यामुळे जंगले वेगाने वाढत होती. विविध घातूंचे खाणकाम करून ते धातू वर आणले गेले होते. ७ अब्ज लोकांच्या आरोग्याची माहिती उपलब्ध होती. शिप ४४ च्या कम्प्युटर नुसार आता पृथ्वी पुन्हा राहण्यायोग्य बनली होती.
पुढे काय ? सीताने प्रश्न विचारला.
"स्वच्छता ! " कम्प्युटर ने उत्तर दिले.
खाली काही बटणे होती. जी दाबून पृथ्वीवर आता, सुनामी, भूकंप वगैरे आणले जाऊ शकत होते. काही ठिकाणी प्राणवायूची कमतरता निर्माण केली जाऊ शकत होती. एका अर्थानी हा पेस्ट कंट्रोल होता. सध्याच्या संपूर्ण मानवजातीला मारून नवीन मानवाला तिथे स्थापित करायचे आहे असे शिप ४४ च्या काम्पुटर ने तिला सांगितले.
हि सर्व प्रक्रिया हळू हळू होणार होती. सर्वप्रथम सीताला क्रायो मधील काही गर्भ बाहेर काढायचे होते. शिप ४४ चे कम्प्युटर मग काही गुप्त प्रोब्स पाठवून हे गर्भ मानवी स्त्रियांत गुपचूप रोपण करणार होते. त्यांचे आयुष्य पाहून मग ग्रह खरोखरच आपल्यासाठी अनुकूल आहे हे सिद्ध होणार होते. हळू हळू सुनामी, ज्वालामुखी, पूर इत्यादी निर्माण करून सध्याच्या मानवांचे गुपचूप शिरकाण केले जाणार होते. हि सर्व प्रक्रिया सोपी करण्यासाठी शिप ४४ ने एक गेम बनवली होती. त्यामुळे सीता गेम खेळत खेळत पृथ्वीवर संहार घडवून अनु शकत होती. पृथ्वीवरील संगणक आणि मोबाईल एप्स हॅक केली गेली होती त्यातून एक गुप्त संदेश पाठवला तर त्या गेम्स ना बाली पडलेली मुले
आपणहून आत्महत्या करणार होती. शेवटी शिप ४४ बाहेर येऊन आपले वर्चस्व स्थापित करणार असा प्लॅन होता.
शिप ४४ चा संगणक इतका प्रभावी असेल ह्याची कल्पना सीताला सुद्धा नव्हती. पृथीवर सर्वत्र कॅमेरा होते. मच्छर हा वरून जीव वाटणारा कीटक शिप ४४ नेच निर्माण केला होता. त्यांच्या शरीरांत अति सूक्ष्म कॅमेरा होता आणि ते सर्व माहिती शिप ४४ ला पाठवत.
सीताने त्यांच्या मदतीने अनेक लोकांच्या आयुष्यावर नजर ठेवली. अचानक तिला लक्षांत आले पृथ्वीवरील अनेक टॅलेंटेड व्यक्ती खरे तर शिप ४४ मुळे निर्माण झाल्या होत्या. अनेक महत्वाचे शोध, अपघात वगैरे शिप ४४ नेच घडवले होते आणि मानवाच्या प्रगतीला वेगवान केले होते.
आता सुरु होती ती एन्ड गेम. सीताला फक्त एक बटन दाबून हा खेळ संपवण्याची सुरुवात करायची होती.
सीताला खरी कोफी प्यायची होती, समुद्राच्या लहरींत पाय बुडवायचा होता, पावसांत भिजायचे होते, गुलाबांचा वास घ्यायचा होता आणि एखाद्या कोकरू ला उचलून धरायचे होते. ह्या गोष्टींना करून माणसांना काय सुख मिळते ते पाहायचे होते. पण ते करण्यासाठी कोट्यवधी माणसांना मारायचे होते. सीताने बराच वेळ विचार केला. ज्या माणसांनी थोड्याच अवधीत इतकी प्रगती केली त्यांना आणखीन काही वर्षे दिली तर ते कुठे पोचतील ? कदाचित शिप ४४ पृथ्वीच्या गर्भांत आहेत हे ते शोधून काढतील.
आपल्या सुखासाठी इतक्या लोकांचा बळी खरोखरच योग्य आहे का ? पृथ्वीवरील माणसे झुरळा प्रमाणे क्षुद्र असली तरी त्यांना सुद्धा तिच्या प्रमाणेच भावना होत्या. त्या माणसांनी सुद्धा नवीन संगीत, नृत्य, अन्न निर्माण केले होते. पिरॅमिड्स पेक्षा नेत्रदीपक इमारती बांधल्या होत्या.
अचानक तिच्या डोक्यांत उजेड पडला. सीता इतकी वर्षे शिप ४४ ची गुलाम असल्या प्रमाणे वागत होती. तिचा जन्म सुद्धा प्रेमाने किंवा आपुलकीने झाला नव्हता तर गरज म्हणून तिला इंजिनियर केले होते. पृथ्वीवर लोकांना आपली मुले प्रचंड प्रिय असतात पण सीताला आपले पालक कोण होते हे ठाऊक सुद्धा नव्हते.
ज्या लोकांनी शिप ४४ निर्माण केले त्यांनी तिला आपले मानले नव्हते. तिच्याकडून गोष्टी लपवल्या गेल्या होत्या. मग त्यांच्या साठी तिने आणखी कुणाचा बळी तरी का बरे द्यावा ?
तिने कन्सोल ३ ला बंद केले. आणखीन ५०० वर्षांनी पाहू असा निर्देश तिने शिप ४४ ला दिला आणि ती पुन्हा किचन हॉल कडे चालू लागली. तिला ती कॉफि संपवायची होती.
कथा आवडल्यास प्रतिक्रिया जरूर द्यावी.