भूतकथा भाग ५
प्रभाकर पटवर्धन Updated: 15 April 2021 07:30 IST

भूतकथा भाग ५ : १ सिनेतारका १-२

भुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.

  २ सिनेतारका २-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. ) 

कालपर्यंत सिनेजगतात "रचना"नावाची कुणी अभिनेत्री  आहे हे कुणालाच माहीत नव्हते .तिचा "वासना" हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत ती भारतभर प्रसिद्ध झाली .सर्व थरातून तिचे कौतुक होऊ लागले . त्या सिनेमावर सर्व  नियतकालिकातून लेख लिहून आले .लेख किंवा परीक्षण लिहित असताना स्वाभाविकच रचनाबद्दल रकानेच्या रकाने भरून लिहिले जात होते.तिचे  कौतुक होत होते.

सिने नियतकालिकातून  तिचे फोटो  छापून येत होते .तिचे निरनिराळ्या पोज मधले फोटो मासिकात छापले जात होते .ती एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली .तिच्या निरनिराळया पोजमधील होर्डिंग्स नाक्यानाक्यावर लावली होती. कालपर्यंत ती मोकळेपणाने कुठेही हिंडत होती .मॉल, भाजीबाजार ,थिएटर, चौपाटी, रस्ता, कुठेही ती मनमोकळेपणाने फिरू शकत होती .आज ती कुठेही गेल्यावर लोकांचा घोळका तिला वेढून टाकीत होता .तिला तोंड लपवून फिरावे लागत होते .ती दिसते कशी?ती खाते काय? ती राहते कुठे? तिचे नातेवाईक कोण?तिने लग्न केले आहे की नाही ?ती कोणाबरोबर फिरते ?अश्या सर्व गोष्टींमध्ये लोक रस घेऊ लागले होते.

ज्या सिनेमामुळे तिला एवढी प्रसिद्धी मिळाली तो सिनेमा थिएटरमध्ये आठवडेच्या आठवडे चालत होता .रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरक महोत्सव, शतक महोत्सव,अशा एकेक पायऱ्या तो सिनेमा ओलांडीत होता .त्याबरोबरच रचनाचीही घोडदौड सुरू होती.

एके काळी ,फेसबुक पेजवर व इन्स्टाग्रामवर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच तिचे फॉलोअर्स होते .त्यांची संख्या दर दिवसागणिक वाढत होती .चार पाच महिन्यांमध्ये तिने फॉलोअर्सचा लाखाचा आकडा ओलांडला.तिला आता सेक्रेटरी नेमण्याची आवश्यकता वाटत होती .तिने एक सेक्रेटरी नेमला . "वसंत" अत्यंत कुशल सेक्रेटरी होता. तिची प्रसिद्धी कशी करावी, त्यासाठी कोणते तंत्र वापरावे, त्यासाठी कोणत्या ट्रीक्स योजाव्यात,यात तो अत्यंत कुशल होता .त्याच्यामुळे तिची बॉलिवूडबरोबरच टॉलिवूडमध्येही भरपूर प्रसिद्धी झाली.

थोड्याच महिन्यात तिने तिचा पूर्वीचा दोन खोल्यांचा ब्लॉक सोडून दिला.बांद्रयाला काही कोटींच्या ब्लॉकमध्ये ती राहण्यासाठी गेली.हा ब्लॉक तिला एका प्रसिद्ध उद्योगपतीने घेऊन दिला असे लोक बोलत असत .    

काम मिळण्यासाठी पूर्वी ती निर्मात्यांच्या दिग्दर्शकांच्या  घरी,ऑफिसमध्ये ,कुणाच्या ना कुणाच्या ओळखी काढून  दारोदार फिरत होती.आज निर्माते दिग्दर्शक तिने आपल्या सिनेमात काम करावे म्हणून तिच्या घरी पैसे घेवून खेपा मारू लागले होते .  

तिच्या फेसबुक व इन्स्ट्राग्रामवरच्या फोटोंनी तर कमाल केली होती . अत्यंत कमी कपड्यांपासून ते भरपूर कपडय़ांपर्यंत, समुद्र किनाऱ्यांवरील बिकिनीतील फोटोपासून , ते गिरीशिखरावरील  गिर्यारोहण वेषातील फोटोपर्यंत,तिचे फोटो  प्रसिद्ध होत होते. ती मधून मधून परदेशात जात होती .परदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळावर काढलेले, तिचे तंग कपड्यातील,कमी कपड्यातील फोटो,भारतात विविध प्रसिद्धी माध्यमातून  प्रसिद्ध होत होते .त्यांच्यावर ऐकू नये अशा कॉमेंट्स मारत मोठ्या चवीने ते फोटो लोक पाहत होते. 

तिच्या संरक्षणासाठी आता बाऊन्सर्स नेमलेले होते .ती कुठेही त्यांच्या संरक्षणाखाली हिंडत असे .कुणालाही आता तिला भेटणे शक्य नव्हते .तिचा सेक्रेटरी वसंत याला अगोदर गाठावे लागे.त्याने परवानगी दिली,त्याची खात्री पटली, तरच तिला भेटता येत असे.

ती जगात कुठे कुठे हिंडली ,कुणाकुणाबरोबर हिंडली, कोणत्या कोणत्या बीचवर ती गेली, हे सर्व समाजमाध्यमातून प्रसिद्ध होत असे .

तिचे नाव अनेक जणांशी जोडले जाऊ लागले.यातील सत्य किती व प्रसिद्धीचा भाग किती हे तो  सेक्रेटरी वसंता व ती रचनाच जाणे.

अशीच दोन तीन  वर्षे गेली .तिचे पाच सहा सिनेमा तोपर्यंत झळकले.त्यातील काही सिनेमांनी गोल्डन ज्युबिलीही पार केली.  

आणि एक दिवस ती बातमी सर्व वर्तमानपत्रातून झळकली .रचना कुणालाही कुठेही दिसत नव्हती .कुणालाही कुठेही सापडत नव्हती.जणू काही ती अदृश्य झाली होती .जणू काही ती हवेत विरून गेली होती .तिचा सेक्रेटरी वसंत यालाही तिच्या ठावठिकाणाबद्दल काहीही माहिती नव्हती .

ती असू शकेल अश्या सर्व  संभाव्य  ठिकाणी चौकशी करण्यात आली . ती कुठेही सापडत नव्हती.पोलिसांमध्ये वसंतने जाऊन मिसिंग कम्प्लेंट दिली.सेक्रेटरी वसंतला पोलिसांनी विचारलेल्या उलटसुलट अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली .वसंता,बाऊन्सर्स, सर्वांना चकमा देऊन ती नाहीशी झाली होती .

रचनाचे अपहरण, रचना कुठे गेली? रचना अदृश्य कां झाली? रचनांचा खून तर झाला नाहीना ?हा प्रसिद्धीचा स्टंट तर नाही ना ?अश्या प्रकारचे अनेक मथळे देऊन ही बातमी प्रसिद्ध केली गेली.ती कुठे गेली असावी, तिचे काय झाले असावे,याबद्दल तर्कवितर्कांना उत आला.  पोलिस तिचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडत होते .सेक्रेटरी वसंतने एका खासगी गुप्तहेराची तिच्या शोधासाठी नेमणूक केली.पोलिसांकडून तर शोध घेण्याचा प्रयत्न सुरूच होता .

ती नाहीशी झाली त्या दिवसापासून,तिचे फेसबुक व इन्स्टाग्रामवर फोटो येणे बंद झाले .प्रत्येक जण विशेषतः तिचे फॉलोअर्स तिचा फोटो येईल म्हणून आशेने फेसबुक व इन्स्टाग्राम दोन्हीही रोज पाहात असत .निराशेशिवाय त्यांच्या पदरी काहीही पडत नसे .

आणि एक दिवस तिचा खून झाला असावा अशी बातमी प्रसिद्ध झाली .

एका प्रतिष्ठित, मान्यवर, प्रचंड खपाच्या ,वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली होती.

त्या बातमीपुढे पुढील मजकूर छापला होता .

उगीचच सनसनाटी निर्माण करण्यासाठी आम्ही ही बातमी देत नाही .

आमच्याजवळ ठोस असा पुरावा उपलब्ध असल्यामुळे आम्ही ही बातमी देत आहोत .

बहुधा पोलीसही आमच्या बातमीला दुजोरा देतील .

फोटोसहित सविस्तर बातमीसाठी उद्यांची आमची आवृत्ती  पाहा .

*त्या प्रतिष्ठित,मान्यवर, प्रचंड खपाच्या, वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी  फोटो सहित पुढील बातमी छापून आली .*

* त्या फोटोमुळे व बातमीमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली.*

(क्रमशः)

५/३/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

. . .