भय इथले संपत नाही… : भाग १
भयकथा – काल्पनिक टीप - हि भयकथा पूणपणे काल्पनिक आहे केवळ मनोरंजन हाच उद्देश आहे.
"आणि हि आमच्या गावची नदी. लहानपणी तासंतास आम्ही इथे डुंबायचो. ते तिकडे दिसतंय ना ते शंभू महादेवाचं देऊळ. किती उंच डोंगरावर आहे पाहिलंस ? आमची धावत वर जायची स्पर्धा लागायची. एका दमात." तो लहान मुलाच्या उत्सुकतेने सांगत होता. ती ऐकत होती. लग्न झाल्यापासून कितीतरी वेळा त्यानी तिला या गोष्टी सांगितल्या होत्या. वर्से गावच्या. त्याचं लग्नही योगायोगानी झालं. अर्जुन पोलिसात होता. मुंबईत आणि ती पॅरानॉर्मल एक्स्पर्ट. मनस्वी तिच्या टीम बरोबर निरनिराळ्या पछाडलेल्या जागांवर जाऊन तिथे खरंच त्या ठिकाणी काही नरकारात्मक ऊर्जा आहे का ते बघायची. आपल्याला माहित नसलेल्या शक्ती या जगात असतात यावर तिचा पूर्ण विश्वास होता. तिला त्या जाणवतही असत. लहानपणापासून. तिच्या आजीमध्येही या शक्ती होत्या. जेंव्हा आजीला मनस्वीच्या या शक्तीची कल्पना आली तेंव्हा तिने तिला काही साधना सांगितल्या ज्यामुळे ती तिच्या शक्तींवर कंट्रोल ठेऊ शकेल. मग मोठेपणी तिने तिच्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि ती एक प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्ट होती. अशाच एका केसच्या निमित्ताने मनस्वी आणि तिची टीम एका कथाकथित पछाडलेल्या जागेवर गेली असताना त्यांच्या लक्षात आलं कि लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन तिथे अनेक बेकायदेशीर गोष्टी होत आहेत. मग मनस्वि नी पोलिसांची मदत घेऊन ते रॅकेट उघडकीस आणले. अशी तिची आणि अर्जुनची भेट झाली. मग भेटी वाढत गेल्या. ते दोघे कधी प्रेमात पडले हे त्यांनाही समजले नाही. लवकरच त्यांचे लग्नही झाले. लग्नच्या वेळी ती त्याच्या आई-वडिलांना भेटली होती. तिला ते खूपच आवडले. पण ती त्यांच्या गावी जाऊ शकली नाही. गावी त्यांची मोठी जमीन होती ते दोघेही कामात व्यस्त असायचे. लग्नानंतर सहा महिन्यांनी दोघेही वेळ काढून गावी आले होते. सकाळी सकाळी ते गावी येऊन पोहोचले. आल्या आल्या मनस्वीला जाणवली ती त्या गावची भयाण शांतता. साधारण गावातलं आयुष्य पहाटे पहाटेच चालू होतं . इकडे आठ वाजले तरी काहीच हालचाल दिसत नव्हती. समोरच गावाची वेस दिसत होती. अर्जुननी तिला गाव दुरून किती सुंदर दिसतो हे दाखवण्यासाठी अलीकडे गाडी थांबवली होती आणि आता ते गावात प्रवेश करणार होते. ते गाडीत बसले इतक्यात अर्जुनला भास्कर काका दिसले. भास्करकाका त्यांचे गाडी होते ते त्यांच्या शेतावर काम करत. अर्जुनने मोठ्याने त्यांना हाक मारली. ते एकदम दचकले. मग पाहू लागले," कोन धाकले धनी? इकडे कशापाई आलात?" आपल्याला पाहून ते खूष झाले नाहीत याचे अर्जुनला आश्यर्य वाटले. " अहो काका आई - बाबाना भेटायला आलोय. मुद्दामच कळवलं नाही. त्यांना सरप्राईझ द्यायचं होतं. चला बसा गाडीत एकत्रच जाऊ गावात." तो हसत बोलला. " गावात नको रे देवा! म्या नाय जाणार. शहाणे असाल तर तुम्हीबी जाऊ नका. तुम्हाला थोरल्या मालकांना भेटायचंय ना? ते गावात न्हाईत. चला म्या नेतो तुम्हास्नी तिकडं." असं बोलून ते गाडीत बसले .
अर्जुनला खूप वेगळे वाटले ते. तो लहानपानापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळला होता. मग ते सांगतील तिकडे त्यांनी गाडी वळवली. गावापासून खूप लांब दुसरे गाव वसले होते. त्या गावाभोवती मोठे खंदक होते त्यात लाकडे टाकली होती. मग भास्कर काकांनी जोरात हाक दिली तसे चार तरुण येऊन त्यांनी खंदकावर मजबूत फळी टाकली. अर्जुनला काकांनी खुणेनी आत बोलावले. त्यांची गाडी खंदक पार करताच. ती फळी परत काढून घेतली आणि ते तरुण चौबाजूनी पहारा देऊ लागले. अर्जुनला हा सगळा प्रकार जरा विचित्र वाटत होता. ते गाव म्हणजे त्यांना इनाम मिळालेली जागा होती. तिथे त्यांचे घर होते. आसपास जमीन होती. तिथे त्यांची आमराई होती. आई बाबा इकडे का आले हा प्रश्न राहून राहून त्याला सतावत होता.
इकडे जसजसे वर्से गाव जवळ येत होते तसतशी मनस्वी अस्वस्थ होतं होती.तिचा श्वास गुदमरत होता. एक खूप प्रभावी असे अमानवी वास्तव्य आसपास आहे असे तिला जाणवले होते. तरीही ती गप्प होती. तिला अर्जुनच्या उत्साहावर पाणी फिरवाचे नव्हते. जशी त्यांची गाडी वर्से गावापासून लांब गेली तसे तिला मोकळे वाटू लागले. शेवटी ते एका दुमजली टुमदार घरापुढे थांबले. घरातून अर्जुनचे वडील बाहेर आले. त्यांना पाहताच हे दोघे दचकले. लग्नात पाहिलेले उमदे बाबा आणि आताचे खचलेले बाबा यात जमीन-अस्मानाचा फरक होता. मग आई आली तिचीही अवस्था तीच होती. दोघे कितीतरी रात्री झोपलेले वाटत नव्हते. मग आई त्या दोघांना आत घेऊन गेली. चहा पाणी दिले. अर्जुनला राहवत नव्हते," बाबा हे काय आहे ? तुम्ही गाव सोडून इकडे का राहायला आलात? तुमच्या दोघांना काय झालंय? विकी कुठे आहे ? तो आफ्रिकेला जायच्या आधी माझ्याकडे येणार होता. आता त्याचा फोनही लागत नाहीए." "अरे बाळा दमून आला आहेस जरा आराम कर. मग बोलू ." आई म्हणाली. तिला हातानी थांबवत बाबा म्हणाले," सांगू दे त्याला मला आणि त्यालाही त्याशिवाय चैन पडणार नाही. बाळा तुला तर माहित आहेच ना कि तुझा धाकटा भाऊ विक्रम आफ्रिकेत असतो. तो तिकडे काय काम करतो हे आमच्या अडाण्यांच्या समाजापलीकडचे आहे. यावेळी तो तिकडून जहाजाने आला. जो प्रवास विमानाने सहज होतो तो इतके दिवस घालून जहाजानी का आला ? असे विचारताच त्यानी एक मोठी पेटी दाखवली. ती पेटी एख्याद्या मृत माणसाला ठेवतात तशी दिसत होती. त्यावर भयावह असे चित्र कोरले होते. त्याच्या सोबत निग्रो सारखे दिसणारे दोघे आले होते. ते कोणत्यातरी विचित्र भाषेत बोलत होते. मग ते तिघे त्या पेटीला घेऊन आपला गावाच्या टोकाला जंगलाच्या बाजूला असणारा वाडा आहे तिकडे घेऊन गेले. तेंव्हा आमच्या मनात हा स्मगलिंग वगैरे करत तर नाही ना ? अशी शंका आली. विक्रम पहिल्यापासूनच महत्वाकांक्षी आहे. जे सगळे लोक करतात हे त्याला करायला आवडत नाही. तुला तर माहीतच आहे. मग ते तिघेही काही दिवस घराकडे फिरकलेच नाहीत. त्या वाड्यावर काय करत होते देवास ठाऊक. खरं सांगू मलाही त्या तिघांची खरंतर भीतीच वाटायला लागली होती.एक दिवस मारुती सांगत आला कि ते तिघे ती पेटी घेऊन जंगलात गेले आणि ती पेटी तिकडेच कुठेतरी ठेवली. मग रोज ते तिकडे जाऊन काहीतरी वेगळ्या भाषेत जोरजोरात बोलत असतात. जंगलाच्या मध्ये ती पछाडलेली गढी आहे ना ? तिकडे ते जातात. हे एकल्यावरच मला काहीतरी वेगळे वाटायला लागले. मी त्यांच्यावर पाळत ठेवायचे ठरवले. मग गावातल्या दोन तरुणांना घेऊन त्यांच्या मागे गेलो. ती रात्र आमवास्येची होती. ते सहज चालले होते. आम्ही मात्र धडपडत होतो. गावातले लोक या भागात येत नाहीत. त्या गढीला पाद्र्याची गढी म्हणतात. फार पूर्वी ख्रिश्चन पाद्री इथे राहत असत. इथे कोणतेही चर्च नव्हते मग ते तिथे राहून काय करत माहित नाही. गावातला कोणी त्या बाजूला गेला तर परत यायचा नाही. लोक असे म्हणायचे कि ते त्याला पकडून त्यांच्यातला एक करायचे. किंवा त्याला गढीमागे असलेल्या मातीत पुरून ठेवायचे रात्री सैतान येऊन त्या माणसांना खायचा ज्याची ते सेवा करायचे. हळू हळू ते पाद्री नामशेष झाले. पण त्या भागात गेलेली माणसे अजूनही जिवंत परत येत नाहीत. आम्ही त्यांच्या मागे गेलो ते पडक्या गढीत शिरले. ती जरी बाहेरून पडकी दिसत असली तरी आतून नीट होती. चांगल्या अवस्थेत. आत घुमटाकार मोठी खोली होती समोर एक चौथरा होता. कदाचित त्या चौथऱ्यावर ते त्यांचा देव ठेवत असतील. त्यावर या तिघांनी मेणबत्त्या लावल्या. त्यामुळे तिथे थोडा उजेड झाला. त्यानी तिथे मेणबत्त्या लावताच त्या दालनात आपोआप सगळीकडे मेणबत्त्या लागल्याप्रमाणे उजेड पसरला. त्या जागी अंग शहारण्याइतकी इतकी थंडी होती . आसपास अनेक दारे होती. त्या पाद्र्यांच्या राहण्याच्या खोल्या असतील. हि मंडळी त्यातल्याच एका दारातून गेले. आम्ही हळूच ते दार ढकलले.त्यातून बाहेर पहिले. ते दार गढीच्या मागे उघडत होते. तिथे समाधीसारखे चौथरे होते. आणि त्या सगळ्या चौथऱ्यांवर उलटा क्रॉस होता. तिकडची माती ओली आणि भुसभुशीत वाटत होती. तिथे एका चौथऱ्यावर ती शवपेटी ठेवली होती. हे तिघेजण त्यापुढे गुडघे टेकून बसले होते. इतक्यात अंग गोठवेल असा गारवा पसरला आणि त्या पेटीचे झाकण हळूहळू उघडायला लागले . इकडे सर्व चौथऱ्यांवरची झाकणेही बाजूला झाली. त्यातून ते पाद्री बाहेर पडले. पुढचे पाहायला आम्ही थांबलोच नाही. धावत बाहेर गेलो. ते त्यांच्या साधनेत होते म्हणून आम्ही तिथून निघू शकलो. माझ्या मूर्ख पोरानी हे काय संकट आणलं होतं देवास ठाऊक. आम्ही सगळ्या गावात जाऊन लोकांना गोळा केले आणि जंगलात पाहिलेली हकीगत सांगितली. सगळ्यांनी मालच दोष दिला कारण विक्रम माझा मुलगा होता.
इतक्यात जंगलाकडून कानठळ्या बसवणारा आवाज आला. एक ७ फुटांहून उंच ख्रिश्चन दिसणारा माणूस त्याच्यामागे विक्रम आणि दोघे आफ्रिकन, आणि मागे ते पाद्री गावात आले. तो माणूस बहुतेक त्या पेटीतून बाहेर आलेला माणूस होता. तो पांढरा फटफटीत दिसत होता. आल्या आल्या तो जवळच्या माणसांवर तुटून पडला आणि त्यांचे रक्त पिऊ लागला. ती माणसे तात्काळ मरून पडली. मग काही वेळाने उठून तीही त्यांच्यात सामील झाली. आणि इतर माणसांना मारू लागली विक्रम आणि त्याचे साथीदार नुसते बघत राहिले. ते एखाद्या गुंगीत असल्यासारखे वाटत होते. शेवटी गावातल्या तरुण मुलांनी आग पेटवली. मग काठ्यांना कापड गुंडाळून मशाली बनवल्या. आग पाहिल्यावर ते मागे हटू लागले. मग सगळ्यांनी शंभू महादेवाच्या देवळाचा आसरा घेतला. ती मुलेही आमच्याबरोबर देवळात आली. त्यांच्यातल्या दोघांना त्यानी ओढून नेले. माझ्या नालायक मुलामुळे गावावर फार मोठे संकट आले होते. दिवस झाला ते निघून गेले. एका मुलानी त्यांना व्हॅम्पायर म्हणतात असे सांगितले. ते फक्त रात्री येतात आणि दिवसा पेट्यांमध्ये झोपून राहतात असे त्यानी सांगितले. त्यांच्या छातीत जर क्रॉस ठोकले तर ते कायमचे मरतात. असेही तो बोलला. पण त्यांना शोधून हे असे काहीतरी करण्याची आमची हिंमत नव्हती. म्हणून आम्ही इकडे राहायला आलो. गावाभोवती खंदक खोदून त्यात लाकडे भरतो आणि त्यांची चाहूल लागताच ते पेटवतो. आमची शेती तिकडे आहे फक्त दिवसा जाऊन काम करतो. तिन्हीसांजा होण्याच्या आत इकडे गावात येतो. आज ना उद्या जर त्यानी दिवसाही बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढला तर गावावरच नाही या जगावर मोठे संकट येईल. "अर्जुनच्या वडिलांनी बोलणे संपवले. अर्जुन डोळे विस्फारून ऐकत होता. मनस्वी म्हणाली, " तरीच गावाजवळ जाताच मला याची जाणीव झाली होती." अर्जुनाची आई हात जोडून म्हणाली," पोरी यावर आता तूच मार्ग सांग. तुझ्यात चांगली शक्ती आहे मला माहित आहे." मनस्वी म्हणाली," आई , या शक्ती खूप प्रभावी आहेत त्यांना हरवायला तशीच व्यक्ती हवी जी मला माहित आहे." तिच्या डोळ्यापुढे फादर विल्यम्स उभे राहिले. ती त्यांना भेटायला गेली होती. ते आपल्या शक्तींनी लोकांची मदत करतात असे तिने ऐकले होते. पहिल्याच भेटीत त्यांच्यात पिता-पुत्रीचे नाते निर्माण झाले होते. तिने त्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला. दुपार झाली होती. सर्वाना काळजी घेण्यास सांगून ते तडक माघारी निघाले. पहाटे ३च्या सुमारास मुंबईत पोहोचले. अर्जुन दिवसभरच्या गाडी चालवण्यामुळे खूप दमला होता. त्यानी आराम केला. सकाळी १०च्या सुमारास ती निघाली. वर्सोवाला सेंट मेरी चर्च होते त्याच्यात ते राहात होते. ती आल्यावर त्यांनी तिला आत बोलावले. मग ते म्हणाले ," माय चाईल्ड मला माहित होते तू येणार. खूप मोठे संकट आहे. मला मदत लागेल. इतक्यात पाच फादर आले. हे माझ्यासारखे आहेत. विक्रम नि जे आणलंय ते खूप पुरातन आहे त्यावर इलाज तसाच केला पाहिजे. चला निघूया. "मग अर्जुन मनस्वी आणि ते पाच जण निघाले.
"तुम्ही काय करणार फादर ? काही विचार केला आहे ?" मनस्विनी विचारले. विल्यम्स हसून म्हणले," हि शक्ती भारतात आल्यापासून मला जाणीव होत होती. कि काहीतरी वाईट आपल्या इथे आलंय. नीट समजत नव्हतं कुठे ते . मग मी जुने ग्रंथ काढले. त्यात त्याचा उल्लेख व्हॅम्पायर असा आहे. प्रत्येक देशात त्याला वेगवेगळी नावे आहेत. ज्या संस्कृतीत मनुष्य देवाघरी गेल्यावर पुरण्याची पद्धत आहे. त्यांच्यात हे व्हॅम्पायर आढळत आले आहेत. ते माणसांचे रक्त पिऊन आपल्या जातीचा प्रसार करतात. हा जो तुमच्या गावात विक्रमने आणला आहे तो इन्फेकशन झालेला नाहीए. म्हणजेच दुसऱ्या एखाद्या व्हॅम्पायरनी रक्त पिऊन हा निर्माण झाला नाही. हा मूळ आहे. याच्यापासून या जमातीची सुरवात झाली आहे. जगात असे फारच थोडे असतील. ते माणसांना भुलवून पैसे, खजिना किंवा काही इतर गोष्टींची प्रलोभने दाखवून आपल्या आधीन करतात व निरनिरळ्या ठिकाणी त्या माणसांना न्यायला लावतात. जेणेकरून सगळीकडे त्यांच्यासारखे निर्माण होतील. हे अतिशय शक्तिशाली असतात. त्यांना दिवसाचा उजेड सहन होत नाही. परंतु अंधाऱ्या जागी जसे जंगल, एखादे खोल जमिनीतले तळघर अशा ठिकाणी ते दिवसाही शक्तिशाली असतात. ते कोणत्याही माणसाचे, प्राण्याचे, पक्षाचे रूप घेऊ शकतात. ते आगीला घाबरतात. आकाश, पाणी यात ते सहज संचार करू शकतात. माझ्या बरोबर असलेले हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणचे फादर आहेत. माझ्याप्रमाणेच किंवा माझ्यापेक्षा शक्तिशाली आहेत. यातले एक आंधळे आहेत गॉडनी त्यांना दिसण्याची शक्ती दिली नाही, पण ते वाईट शक्तींना पाहू शकतात. त्यामुळे आपली नजरचूक होणार नाही. योग्य अशाच व्हॅम्पायरला आपण मारू शकू. दुसरे फादर आहेत ते ऐकू शकत नाहीत, पण वातावरणातील नकारात्मक ऊर्जा त्यांना जाणवते, तिसरे फादर बोलू शकत नाहीत. परंतु नकारात्मक शक्तींची भाषा त्यांना समजते. बाकीचे दोघे क्रॉस मंत्रून देणार आहेत जेणेकरून ते आपण व्हॅम्पायरच्या छातीत ठोकू शकतो. माय चाईल्ड! यावेळी पहिल्यांदाच मला शंका येते कि मी यशस्वी होईन कि नाही ?" मग ते लोक राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले. मनस्वीने सगळ्यांना एकत्र जमायला सांगितले. मग फादर विल्यम्स बोलले," लोकहो ! आता आम्ही आलो आहोत. आता सकाळचे आठ वाजले आहेत. तुम्ही सर्वांनी आम्हाला लाकडाच्या पट्ट्या कापून द्या जेणेकरून आपल्याला क्रॉस बनावट येतील. आमच्याबरोबर जंगलात फक्त काही ठराविक लोक येतील. त्यांनी काही जणांना निवडले. त्यात अर्जुनचे वडील होते. गे गावातल्या सर्व लोकांना ओळखत होते. म्हणून त्यांना फादरनी निवडले होते. मनस्वी तू इथेच राहून गावाचे रक्षण करणार आहेस. मग त्यांनी तिला गावाभोवती असलेल्या खंदकात मंतरलेले पाणी शिंपडण्यास सांगितले व ते करताना कोणता मंत्र बोलायचा तेही सांगितले. काहीही झालं तरी कोणालाही त्या रिंगणाबाहेर जाऊ न देण्याची जबाबदारी त्यांनी मनस्वी आणि अर्जुनवर सोपवली. काही वाईट आसपास आलं कि मनस्वीला नक्की जाणवेल हि त्यांना खात्री होती. फक्त तीच या ठिकाणचे रक्षण करू शकत होती. मग फादर आणि गावातल्या लोकांनी मिळून लाकडी क्रॉस तयार केले. जे फादर आले होते त्यांच्यापैकी दोघांनी मंत्र म्हणून ते सिद्ध केले. फादर विल्यम्स बरोबर जाणाऱ्या लोकांना गळ्यात संरक्षक क्रॉस घातले. संध्याकाळी ते निघाले. तोपर्यंत मनस्वीने मंत्राचे रिंगण गावाभोवती पुरे केले होते. फादरनी त्याची पाहणी करून ते योग्य असल्याचे सांगितले. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अर्जुनच्या आईनी विक्रमला सुखरूप परत आणा अशी विनवणी केली. मग ते निघाले. वर्से गावात आले. इतक्या सुंदर गावाची दुरावस्था झाली होती. अर्जुनचे वडील जंगलाच्या रस्त्यानी नेत होते. सगळ्यात पुढे ते आंधळे फादर होते. ते न अडखळता चालत होते. गढी जवळ आली तसे ते आंधळे फादर तिकडे न जाता गढीला वळसा घालून मागे निघाले. अर्जुनचे वडील गढीकडे जाऊ असे बोलत होते पण फादर विल्यम्सनी त्यांना मागे येण्यास सांगितले. ते गढी ओलांडून खोल जंगलात शिरले इथे गावातले लोकही आले नव्हते अजून सूर्य मावळला नव्हता तरी इथे गुडूप अंधार होता. खूप आत गेल्यावर तिथे एक गोलाकार चौथरा होता.त्याच्या आसपास झाडे वाढली होती. ते एखाद्या खूप प्रचंड भग्न वास्तूचे अवशेष असावेत. ते फादर झुडपे बाजूला करून थांबले आणि बोटानी खाली दाखवू लागले.गावातले लोक पुढे गेले. तिकडे एक दार होते. तळघराचे. सर्वानी खूप जोर करून ते उघडले. फादरनी सर्वांच्या हातात मेणबत्त्या दिल्या. एक ऐकू न येणारे फादर आणि तिघेजण वर थांबले. त्यांनी आसपासची लाकडे गोळा करू लागले. फादर विल्यम्सनी आत उतरणाऱ्या लोकांच्या हातात मेणबत्त्या दिल्या. आत मोठे दालन होते. त्यातून अनेक रस्ते जात होते. आत एक धाणेरडा कुबट वास भरून राहिला होता. हीच होती पाद्र्यांची मुख्य जागा. जिथे ते गावातल्या माणसांना मारत होते. तिथे अनेक पेट्या होत्या ज्यांची झाकणे उघडी होती. गावातले ओळखीचे लोक . अर्जुनच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. मग फादरनी मंत्रोच्चारण सुरु केले. मंत्र म्हणून ते एकेकाच्या छातीत क्रॉस ठोकू लागले. ती प्रेते भयावह रीतीने किंचाळू लागली. क्रॉस ठोकताच शांत झाली. मग एक एक प्रेत दोघेजण बाहेर देऊ लागले. बाहेरचे लोक ते जाळून टाकू लागले. परत त्याचा गैरवापर व्हायला नको. असे अनेक ओळखीचे अनोळखी लोक तिथे होते. पण विक्रम आणि निग्रो आणि तो परदेशी व्हॅम्पायर दिसत नव्हते. तिथे अनेक बोळ होते . सगळेजण तिकडे निघाले.