मारीआजी Mari Aaji
संपदा देशपांडे Updated: 15 April 2021 07:30 IST

मारीआजी Mari Aaji : मारीआजी

मारीआजी हि एक भयकथा आहे. मारी आजी हे नाव विचित्र वाटले तरी ह्याचा संबंध मारी बिस्कटशी आहे. प्रेमळ मारी आजीकडे मारी बिस्किटांचा मोठा साठा असायचा म्हणून लहान मुलांनी तिला हे नाव प्रेमाने दिले होते.

 

पेण-खोपोलीच्या मधलं शे-पन्नास घरांचं गाव 'आराव'. माझ्या मारीआजीचा गाव. आश्चर्य वाटलं ना आजीचं नाव ऐकून? म्हणत असाल हे कसलं विचित्र नाव ! खरंतर हे तिला आम्ही मुलांनी दिलेलं नाव. तिचं खरं नाव निर्मलाबाई. आरावमधले सगळे लोक शेतमजूर ,त्यातल्यात्यात शिकलेले माझे आजी-आजोबाच ,म्हणून गावात त्यांना फार मान. गावात सगळे आजीला बाई म्हणत. तिच्याकडे नेहमीच मारी बिस्किटांचा स्टॉक असायचा आम्हला ती खाऊ म्हणून तेच द्यायची म्हणून आम्ही तिचं नामकरण मरीआजी असं केलं होतं आणि तिनेही ते आनंदाने स्वीकारलं होतं. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतेच इतकाच काय लॅन्डलाईन फोनही दुर्मिळ होते पण तिच्याकडे फोन होता.  आम्हाला त्याचं फार अप्रूप वाटे. आम्ही चातकासारखी मे महिन्याची वाट वाट बघायचो. सुट्टी लागली रे लागली कि घरच्यांच्या पाठी लावून मरीआजीकडे सोडायला लावायचो. तिच्या घरी मनसोक्त धिंगाणा घालायला मिळायचा. आजी- आजोबा कधीही गोंगाट केला, पसारा केला म्हणून रागवायचे नाहीत. उलट आजी आईला म्हणायची," अगं तुम्हाला एक-दोन पोरांची मस्ती सहन होत नाही.  आम्ही  तुम्हला सहा जणांना कसा सांभाळलं असेल?" या प्रश्नाला आईकडे उत्तर नसायचं कारण त्या दोघांनी जन्मभर किती कष्ट घेतले हे तीनी पाहिलं होतं.

आजीचं घरही सुंदर होतं. कौलारू आणि खूप मोठ्ठ. खूप खोल्या आणि बाहेर जण्यासाठी खूप दरवाजे, भरपूर खिडक्या, छान शेणानी सरावलेली जमीन. मुंबईत घरातही चपला घालणारे आम्ही त्या जमिनीवर मस्त लोळायचो. गादीशिवायही छान झोप लागायची. घराच्या भोवती छान मोकळी जागा होती. त्यात आजी-आजोबानी छान बाग लावली होती त्यातल्या जाई-जुईचा मंद सुगंध संध्याकाळी दरवळत असायचा. आजोबानी खूप लांबून लांबून दुर्मिळ अशी रोपं आणून लावली होती. त्याचबरोबर भाज्याही , त्यांना कधी बाहेरून भाजी आणावी लागत नसे. असेच एकदा झाडांसाठी खड्डा खणात असताना जमीन खोल लागली म्हणून त्यांनी एक छोटंसं तळ बनवलं आणि त्यात कमळ लावली होती.   

सुट्टीत आई आणि मावशी माहेरपणाला यायच्या, मामाही यायचे मग काय धमालच. नदीत पोहायचे , कैऱ्या, करवंदे वेचत फिरायचे आणि घरी आल्यावर राधा मावशीच्या हातच्या चुलीवरच्या गरम-गरम भाकऱ्या आणि दारातली पालेभाजी , याच्याइतकं चविष्ट जेवण नसेल. घरी जेवायला नखरे करणाऱ्या मला   इतकी पटापट जेवताना पाहून आईला आश्यर्य वाटायचे." अगं ! गावाकडची हवा. इथे भूक जास्त लागते, नजर नको लावू माझ्या नातीला." मारीआजी केसातून हात फिरवत म्हणे. मग रात्री सामुदायिक दृष्ट काढण्याचा कार्यक्रम होत असे.   आजीकडे सतत असणारी राधा मावशी तिचीही एक कथा आहे. लहानपणापासून ती आजीकडे कामाला होती. सोळाव्या वर्षी तिचं लग्न झालं. तोही गावातलाच होता. दोघे मिळून संसारासाठी कष्ट करत असत. एकदा तो शेतावर रात्रीचा पहारा द्यायला गेला तो परत आलाच नाही. खूप शोध घेतला पण तो सापडला नाही. मग तेंव्हापासून राधा मावशी आजीजवळ राहत असे. 

आजीचं माहेरही जवळ होतं. आरावपासून ५ किलोमीटरवर. वासरे गाव. तिकडे मामा आजोबा राहायचे. मग कधी कधी आजी आम्हला घेऊन जायची. आम्ही चालताच निघायचो. वाटेत दोन डोंगर पार करावे लागत पण दमायला होत नसे उलट मजा वाटायची. तिकडे जाणारी बस होती तरीही  आम्ही चालत जायचा हट्ट करायचो. अशाच एका सुट्टीत गेलो होतो तेंव्हा डोंगरात वणवा लागला होता.  काही झाड जळाली होती. आजीच्या घरातून आम्ही डोंगरावरचा वणवा बघत होतो. दोन दिवसांनी आम्ही त्याच डोंगरावरच्या वाटेनी मामा आजोबांच्या गावाला जायला निघालो. वणवा जास्त पसरला नव्हता पण त्याच्या खुणा जागोजाग दिसत होत्या. इतक्यात माझं लक्ष एका जागी गेलं. तिकडे एक दुमजली घर होते. इतक्या वेळा आम्ही त्या रस्त्यानी गेलो तेंव्हा ते दिसले नव्हते. वणव्यामुळे त्याच्या आसपासची झाडे जळाली होती त्यामुळे ते दिसू लागले. मी थांबून ते बघत  होते. तर आजीनी मला ओढून घेतले आणि म्हणाली," अगं माझ्या लहानपणीपासून ते घर तिथे आहे. त्याआधी किती वर्ष आहे माहित नाही पण माझे बाबा सांगायचे कि ती खूप खराब जागा आहे. त्यात गेलेला माणूस परत येत नाही. राधेचा नवराही तिथेच नाहीसा झाला. त्याला त्या घरातल्या महागड्या वस्तूंचा मोह झाला. छोट्या-मोठ्या चोऱ्या करायला लागला होता वाईट संगतीने व्हायचं तेच झालं." मग आम्ही लगबगीने पुढे गेलो. येताना मात्र बसनी आलो. मग हळूहळू आराव ला जाणे कमी झाले. मी दहावीत असताना 

आजोबा गेले. सगळे जाऊन आलो. मामा आजीला बरोबर नेत होता पण तिनी नकार दिला. गावात जन्म गेलेला तिला शहरात कसं जमणार ? मग ती तिकडेच राहिली. तिचं घर गावाच्या जरा बाहेरच होतं. मग काही महिन्यांनी आई आणि मी गेलो तर तिच्या जवळ एक नवीन घर बांधलेलं दिसलं. नवरा-बायको आणि दोन मुलं असं कुटुंब राहत होतं. आम्ही खुश झालो चला आजीला सोबत तर झाली असं मनात आलं.                 मग १९८९ चा महापूर आला. आजीच्या घराजवळच नदी होती. आम्ही तिकडे जाऊ शकत नव्हतो कारण रस्त्याला पाणी होतं. काळजीने आईला वेड लागायची वेळ आली. नंतर दोन दिवसांनी आजीचा फोन आला ती सुखरूप होती.  पण तिच्या शेजारचं घर पूर्ण वाहून गेलं होतं. त्या घरात राहणारा माणूस पाण्याचा अंदाज आल्यावर पोहत पसार झाला होता त्याची बायको आणि दोन मुलं त्याला हाका मारत होती तरीही तो थांबला नाही. पाणी ओसरल्यावर बायको आणि दोन मुलांची प्रेतं एका झाडाखाली सापडली तिघांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवले होते. मरीआजीनी या सगळ्याचा खूप धक्का घेतला होता. मग काही दिवसांनी तिला रात्रीचे त्या मुलांचे आवाज ऐकू यायला लागले. मग काही दिवसांसाठी मामा तिला घेऊन गेला. मग ती आल्यावर तिला समजलं कि तो माणूस त्या डोंगरावरच्या घरात राहायला गेला होता. त्यांनी दुसरं लग्नही केलं.      

आरावमध्ये गावाच्या मधोमध एक पार होता. संध्याकाळी सगळे जमायचे तिकडे. आम्हीही लहानपणी जायचो. राधा मावशीचा भाऊ बबन मामा आम्हाला घेऊन जायचा. तिकडे एक म्हातारे आजोबा आराव बद्दल सांगायचे. ते  नेहमी सांगायचे कि आजी राहते ती जागा पूर्वी स्मशान होती. खूप वाईट आई रात्रीची तिकडे भुतं फिरतात. आम्हाला कधीही खरं वाटायचं नाही आणि असली भुतं  मारीआजी  पळवून लावेल आम्ही सांगायचो. मग असेच आम्ही गेलो असताना त्या डोंगरावरच्या घराचा विषय निघाला. ते कोणाचं आहे, कधीपासून आहे हे कोणालाच माहित नव्हतं. फक्त माहित होती ती एक दंतकथा. ते घर दर ५० वर्षांनी आपला मालक  निवडते. त्या माणसाची त्या घरात खूप भरभराट होते.  त्या घरात जायच्या आधी त्याला तीन बळी द्यावे लागतात. त्या घराला म्हणे सैतानाचा आशीर्वाद होता. लहानपणी त्या गोष्टींचं खूप अप्रूप वाटायचं. नंतर मात्र हसायला यायचं कि आपण या गोष्टीवर कसा विश्वास ठेवला? मारीआजी मात्र या गोष्टीला खरं समजायची. मग तिच्या शेजारचं ते कुटुंब पुरात वाहून गेल्यावर ती म्हणायची," बघ ! खरं झालं ना शेवटी ? तोच त्या घराचा वारस होता. मग एक गोष्ट समजली आणि धक्काच बसला. त्याआधीचे त्या घराचे वारस मरीआजीचे वडील होते. त्यांनी त्या घरासाठी स्वतःच्या बायकोचा आणि दोन मुलीचा बळी दिला होता.   शेवट शेवट आजी थकली मग तिला भास व्हायला लागले. तिला घराच्या आसपास माणसे दिसत. आई बोलायची तिला भास होतात. मग एक दिवस तिनी मला बोलावून घेतलं आणि बोलली," हे  बघ सोनू    काही झालं ना तरी रवीला आरावला येऊन देऊ नकोस. मला वाचन दे ." रवी माझ्या धाकट्या मामाचा मुलगा होता. खूप गोड आमच्या सगळ्यांपेक्षा खूप लहान, त्यामुळे आमचा सर्वांचा खूप जीव होता त्याच्यात. मी आजीला हो बोलले. आजी गेली. खूप आठवणी मागे ठेऊन.  तिचा मारिबिस्कीटांचा खाऊ, रात्री केसांना तेल लावून देणं , तिच्या घरासमोर असलेल्या ओट्यावरच्या गप्पा , तिच्याकडे असलेली कुत्र्यांची जोडी राजा-राणी. ती दोघं तिची मुलंच होती. ती त्यांच्या आधारानेच तर राहायची. किती वेळा त्यांनी तिचा जीव वाचवला. त्या जागेत विषारी साप खूप असायचे. राजा-राणी  साप असेल त्या जागी आजीला जाऊन द्याचेच नाहीत. तिला ढकलून घरत न्यायचे. आजीची मनी, काळू, बाळू बोके. ती त्यांच्याशी मनासारखं बोलायची. त्यांनाही तिची भाषा कळत असे. सगळं संपलं. मारीआजी आठवणीत आणि भिंतीवरच्या फोटोत राहिली. तिच्यामागे राधामावशी त्या घरी राहिली. देखभाल करायला.                आम्ही सगळ्यांनी ठरवलं होत कि वर्षातून एकदा तरी तिकडे जमायचं. आई, मामा, मावशी जायचे मला मात्र नाही जमायचं. रवीला आरावच्या घराचं खूप आकर्षण होतं. मी मामाला आजीनी रवीला तिकडे येऊन द्यायचं नाही हे सांगितलं होतं. मामानी हि गोष्ट इतक्या गंभीरपणे घेतली नव्हती. माझं लग्न झालं. मग मुलांमध्ये रमले. आरावला जायला वेळच मिळाला नाही. मग एक दिवस अचानक बातमी आली. मामा-मामी आणि रवीच्या पाठीवरची बहीण राधिका एका अपघातात गेले. खूप मोठा धक्का बसला. माझा लाडका राहुल मामा, मैत्रिणीसारखी गोड सुरेखा मामी, आणि ताई ताई करत मागे फिरणारी राधिका. कसं सावरू हे समजतच नव्हतं.रवीला भेटून आले खूप सावरला होता. त्याच्यातला बालिशपणा जाऊन प्रौढ वाटत होता. मग मी माझ्या व्यापात अडकले. एक दिवस समजले कि रवी त्या डोंगरावरच्या घरात राहायला गेला. अंगावर सरसरून काटा आला. त्या घराचा पुढचा वारस रवी होता हे मारीआजीला कसं समजलं होतं देवास ठाऊक. आई बोलायची आजीला भविष्य दिसतं, तिला पुढच्या संकटांची जाणीव होते. हेही तिला दिसलं होतं कि काय?

 

. . .