त्या रात्री आठच्या सुमारास मी आणि अल्फा रूमवरून बाहेर पडलो आणि पंधरा मिनिटांतच श्री लिमयेंच्या घरापाशी पोहोचलो. आमच्या मागोमाग मिनीटभरातच वाघमारे सरही आले. त्यांच्या चेहर्‍यावर थोडे गोंधळल्याचे आणि तणावाचे भाव दिसत होते.


"अल्फा, तुला पूर्णपणे खात्री आहे ना रे बाबा, की या सगळ्या प्रकरणामागे लिमयेसाहेबांचाच हात आहे? " गाडीवरून उतरतच त्यांनी विचारले.


" होय सर. मला खात्री आहे. मी दुपारीच माझी तर्कसंगती तुम्हाला स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार परिस्थिती केवळ श्री लिमयेंकडेच बोट दाखविते. " अल्फा म्हणाला.


" ठिक आहे. तार्किकदृष्ट्या तुझा निष्कर्ष अगदी योग्य वाटतो म्हणा. पण हे थोडे धाडसाचे पाऊल वाटते. लिमयेसाहेब हे शहरातील एक बडे प्रस्थ आहे. त्यांचे आणि माझे बऱ्याच वर्षांपासूनचे घनिष्ठ संबंध आहेत. ते असे कृत्य का म्हणून करतील? "


" ते आता वरती गेल्यानंतर काही वेळात स्पष्ट होईलच. साडेआठ वाजले आहेत. आपण आतमध्ये जायला हरकत नाही. "अल्फा म्हणाला." बरं. चला. " वाघमारे म्हणाले, " तुझे लिमयेंवरचे आरोप सिद्ध झाले म्हणजे मिळवली. नाहीतर मी गोत्यात येईन!! "" काळजी करू नका. लिमये स्वतःहून आपल्याकडे खंजीर सुपूर्द करतील. "दार उघडून आम्ही आत शिरलो. लाकडी पायऱ्या चढून आम्ही लिमयेंच्या रूमपाशी गेलो. वाघमारे सरांनी दरवाजा ठोठावला." या आतमध्ये. दरवाजा उघडाच आहे. "आतून क्षीण आवाज आला. आम्ही तिघेही दार उघडून आत शिरलो. आतमध्ये लिमये आपल्या बेडवर पहुडले होते. वाघमारेंना पाहून त्यांना थोडे आश्चर्यच वाटले." ये अल्फा. वाघमारे साहेब, तुमचे कसे काय येणे झाले? अल्फा म्हणाला होता, की तो एकटाच येईल. "खोल आवाजात लिमये म्हणाले." एक अतिमहत्त्वाचे काम तमाम करायचे आहे आम्हाला. त्यासाठी वाघमारे सरांचे इथे असणे मला आवश्यक वाटले. म्हणून मीच त्यांना बोलावलेय. " अल्फा म्हणाला." ओह.. अच्छा.. कसले काम? " लिमयेंनी विचारले." रत्नजडित खंजीर मिळविण्याचे. " अल्फा म्हणाला, " लिमये सावध झाले. पण आपल्या मनातली भीती न दर्शविता ते म्हणाले,"तुमचे काम आणि खंजीर शोधण्याची धडपड यांचा मी आदर करतो, वाघमारेसाहेब. तुम्ही कोणालाही थांगपत्ता लागू न देता तपासात इतकी प्रगती केली आहे, ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. उद्या संग्रहालयाची तपासणी आहे. उद्यापर्यंत जर खंजीर मिळाला नाही, तर मी आणि आमची कमिटी, सर्वच बरबाद होऊ.. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की आजच्या रात्रीत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाका.. गुन्हेगाराला चांगली अद्दल घडू दे..! "" नक्कीच, श्री लिमये. काही वेळातच आम्ही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार आहोत." अल्फा म्हणाला."तुमच्या हाती लागलेय तरी काय? मला कळू द्या ना. कोण गुन्हेगार असेल, असे तुम्हाला वाटते? मला भेटल्यानंतर तुम्ही कोणाकडे जाणार आहात?? " त्यांनी चौकस डोळ्यांनी अल्फाकडे पहात विचारले. पण त्यांच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होते, की त्यांना या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यात मुळीच स्वारस्य नव्हते." कोठेही जाण्याची आवश्यकता नाहीये, लिमयेसाहेब!! आज, आत्ता याच खोलीत आपण सगळ्या गोष्टी स्पष्ट करणार आहोत. " अल्फा धारदारपणे म्हणाला. मघापासून लिमयेंनी दाबून ठेवलेली भीती क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरती पसरली." म्.. म्हणजे?? मी... मी... नाही.. समजलो... " थरथरत्या आवाजात लिमये बोलले."तुम्ही अभिनय उत्कृष्ट करता, लिमयेसाहेब. तुम्हाला तर अभिनेता असायला हवे होते!! अल्फा म्हणाला, " पण अभिनय हा शेवटी एक मुखवटाच असतो, प्रेक्षकांसमोर घालण्याचा. त्यामागचा चेहरा वेगळाच असतो. आणि तो चेहरा सर्वांसमोर येण्यास फार वेळ लागत नाही..""तुला म्हणायचं तरी काय आहे अल्फा?? खंजीर मी चोरलाय अशी शंका तरी कशी येऊ शकते तुम्हाला?? " लिमये संतापून म्हणाले. मघाच्या क्षीण आवाजाची जागा आता खणखणीत आवाजाने घेतली होती. पण त्या आवाजातली भीती मात्र लिमयेंना लपविता आली नाही." शंका नव्हे, आम्हाला पुरेपूर खात्रीच आहे, श्री लिमये. या गुन्ह्यामागे तुमचाच हात आहे!! हा आरोप तुम्हाला जितका अनपेक्षित होता, तितकाच आज सकाळपर्यंत आम्हालाही होता- आम्ही तुम्हाला भेटण्याच्या आधीपर्यंत. पण हेच सत्य आहे आणि आम्ही ते सिद्धही करू शकतो. वाघमारे सर, आपण या खोलीची झडती घेऊया. आपल्याला खंजीर मिळाला, की आपोआपच सगळे साफ होईल. यांना आणखी काही समजाविण्याची गरजच राहणार नाही. "" ठिक आहे. " वाघमारे सर उठलेच होते, पण तितक्यातच लिमये अचानक बिछान्यातून उठले आणि त्यांनी खिडकीकडे झेप घेतली. मला त्यांची ही कृती अतिशय अनपेक्षित होती. पण अल्फाने चपळाईने धावून त्यांचा हात पकडला आणि त्यांना मागे ओढून पुन्हा पलंगाकडे भिरकावले." तुम्ही पळून जात असाल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मी वरती येण्याआधी खिडकीलगतची शिडी काढून ठेवलेली आहे. आणि जर आत्महत्या वगैरे करणार असाल, तर तुम्ही खंजीर कुठे लपविलाय, हे सांगितल्याखेरीज आम्ही तुम्हाला तसे करूच देणार नाही. " अल्फा म्हणाला." खंजीर कुठे लपविलाय, ते बऱ्या बोलाने सांगा, श्री लिमये. तुमची झडती घ्यावी, अशी माझी मुळीच इच्छा नाहीये. पण तुम्ही बोलला नाहीत, तर माझा नाईलाज होईल. " वाघमारे म्हणाले." मी.. मी.. ना.. नाही... तुम्ही.. सिद्ध... क्.. करा... " लिमये असंबद्ध बडबडले. त्यांच्या अंगाला घाम सुटला होता आणि त्यांची स्थिती दयनीय झाली होती." हरकत नाही. वाघमारे सर, मी यांना घटनाक्रम व्यवस्थित समजावून सांगतो, म्हणजे यांचे समाधान होईल. आपल्याला काही गडबड नाही. " अल्फा म्हणाला. मग तो लिमयेंना म्हणाला, " तुमचे डोके थोडे थंड करा आधी. आणि कोणतीही चालाखी करण्याचा प्रयत्न तुम्हाला चांगलाच महागात पडेल, हे ध्यानात ठेवा. "लिमये अजुनही घाबरून खाली पहात होते. वरती नजर करण्याची त्यांची हिंमतच झाली नाही. अल्फाने बोलण्यास सुरूवात केली," तुमच्या डोक्यात रत्नजडित खंजिराबद्दल हाव कधी निर्माण झाली आणि तुम्ही तो चोरण्याचा दुष्ट डाव कधी रचला, हे काही मी सांगू शकत नाही. पण तुम्ही तो डाव अंमलात आणण्याची सुरुवात मात्र गुन्हा घडण्याच्या दोन दिवस आधीपासूनच केली होती. तुम्ही आजारी पडल्याचे सोंग केले. तुमची घरीच सलाईन आणि औषधपाणी करून घेण्याची कृतीच थोडी संशयास्पद होती; पण माझ्या ती उशीरा लक्षात आली. गुन्हा घडण्याच्या रात्री तुम्ही डॉ. शिंगारेंना घराला बाहेरून कुलूप घालून जाण्यास सांगितले. हे सर्व केल्यामुळे संशयाचा रोख तुमच्यापासून दूर हटला गेला. मग डॉ. शिंगारे निघून गेल्यानंतर तुम्ही आधीच खिडकीपाशी उभ्या केलेल्या शिडीवरून खाली उतरला. कोणाच्याही नजरेस पडणार नाही, याची मोठ्या शिताफीने काळजी घेत तुम्ही राजवाड्यामागील संग्रहालयाच्या मागील गेटपाशी आला. योगायोगाने तेथे रखवालदार उपस्थित नव्हता. त्यामुळे तुमचे आणखीनच फावले. तुम्ही गेटवरून चढून खिडकीतून आत शिरला. मौल्यवान वस्तू ज्या दालनात ठेवल्या आहेत, त्या दालनात आला. पण तेथे तुम्ही नक्कीच एक अनपेक्षित दृश्य पाहिले असणार - खंजिराच्या पेटीच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रखवालदाराचा मृतदेह!! "लिमयेंनी एकदम झटका बसल्यासारखे अल्फाकडे पाहिले." तुला... तुला हे कसे ठाऊक.. की तो आधीच मेला होता..?? " त्यांनी विचारले." मी घडलेल्या गुन्ह्याची खडान् खडा माहिती काढून इथपर्यंत आलोय, श्री लिमये. " अल्फा म्हणाला, " ते दृश्य पाहून तुम्ही थोडे गडबडून गेला असाल, घाबरला असाल. तो खुन तुमच्यासाठी नक्कीच धोकादायक होता, कारण त्यावेळी तुम्हाला कोणीही तेथे पाहिले असते, तर त्या खुनाचा आळ तुमच्यावर आला असता. त्यामुळे जराही विलंब न करता तुम्ही तुमच्या केबिनमध्ये शिरला. कपाट उघडून त्यातील चाव्यांचा जुडगा उचलला, पेटीतून खंजीर काढून चाव्या तशाच सोडून तुम्ही घरी पोहोचलासुद्धा!! कोणालाही कसली चाहूल नाही, कोणताही पुरावासुद्धा नाही. तसे पहायला गेले, तर तुमचा बेत सफल झाला होता. कोणाच्याही नकळत तुम्ही खंजीर हस्तगत केला होता.पण भिंतीलाही कान असतात, श्री लिमये. दैव हे असे असते, की ते आपल्या मनाविरुद्ध कधीच घडू देत नाही. तुम्ही जरी अत्यंत कौशल्याने खंजीर चोरलेला असला, तरीही तुम्हाला तो लाभावा, हे दैवाच्या मनातच नव्हते. एक गोष्ट अशी होती, की जिच्यापासून तुम्ही अनभिज्ञ होता आणि आजही आहात. तीच गोष्ट या प्रकरणाला कलाटणी देणारी ठरली. ती गोष्ट म्हणजे गुन्हा घडण्याच्या वेळी संग्रहालयात तुमच्या आणि मृत रखवालदार महादबा पाटलाच्या प्रेताखेरीज असलेली तिसऱ्या व्यक्तीची उपस्थिती!! त्या वेळी फक्त तुम्ही एकटेच गुन्हेगार नव्हता, लिमयेसाहेब. तुमच्यासोबत आणखीही एक गुन्हेगार तेथे लपून बसला होता आणि तोच तुम्ही केलेल्या गुन्ह्याचा साक्षीदार ठरला. "" क्.. काय?? त्यावेळी.. तेथे... आणखीही कोणी होते...?? पण.. क.. कोण..?? " लिमयेंनी अपादमस्तक थरथरत विचारले." तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रखवालदाराचा खुनी! " अल्फा म्हणाला, " तुमच्याआधी काही मिनिटेच तो तेथे आला होता. त्याने रखवालदाराला ठार केले आणि तितक्यातच त्याला तुमची चाहूल लागली. तो लगबगीने तुमच्याच केबिनमध्ये लपला. पण तुम्ही लवकरात लवकर खंजीर घेऊन तेथून निसटण्याच्या बेतात असल्यामुळे तुम्हाला तो दिसला नाही. पण त्याने मात्र पाहिले - खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे पडलेल्या तुमच्या सावलीला पाहिले!! आणि त्याने केलेल्या त्या सावलीच्या वर्णनात आणि तुमच्या देहयष्टीत काडीचाही फरक नाहीये!!याशिवाय खिडकीलगतची शिडी आणि तुमच्याच बेडरूममध्ये खिडकीखाली पडलेले बूटही हेच सांगून गेले, की तुम्ही आलिकडेच कधीतरी खिडकीतून खाली उतरलेला आहात. या सर्व गोष्टींवरून हे स्पष्टच होते, की खंजिराचे चोर तुम्हीच आहात आणि ज्याअर्थी तुमच्या या 'आजारपणा'मुळे तुम्ही घरातून बाहेर पडला नाही, त्याअर्थी खंजीर घरातच कोठेतरी असला पाहिजे, जो आम्ही काही वेळ झाडाझडती केल्यानंतर मिळेलच. आता त्या रखवालदाराच्या खुन्याच्या नावाखेरीज तुम्हाला काहीही विचारायचे असेल, ते विचारा. तुमच्या शंकांचे आम्ही निरसन करू..! "अल्फाचे स्पष्टीकरण ऐकून लिमयेंचे हातपाय गळाले. ते जवळपास रडकुंडीलाच आले त्यांनी दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला." माझी चूक झाली... भयानक चूक..!! लोभाला बळी पडून मी हे काय करून बसलो!!! माझ्या दिर्घ कारकिर्दीत मला कधी त्या खंजिराची हाव वाटली नव्हती ; पण आता... निवृत्त होण्याच्या वेळी... "" तुम्ही उर्वरित आयुष्य ऐषआरामात घालविण्याचा विचार केला असणार, हो ना? " वाघमारेंनी विचारले, " मला तुमच्याबद्दल खुप आदर होता, लिमयेसाहेब! पण तुम्ही असे कृत्य कराल, असे कधी वाटले नव्हते. तुमच्या या कृतीची मला घृणा वाटते. "" मला माफ करा, वाघमारे साहेब.. माझी चूक झाली. मला आता माझ्या लोभी मनाची भयंकर चीड येते आहे.. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे.. " गयावया करीत लिमये बोलले." पहिली गोष्ट म्हणजे तो खंजीर तुम्ही ताबडतोब आमच्या हवाली करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि हे शहर सोडून दूर कोठेतरी निघून जा. हे प्रकरण बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी आम्ही घेतोच आहे, पण भविष्यात कधी कोणाला याबद्दल कळाले, तर तुम्हाला मान खाली घालावी लागेल आणि त्याचा तुम्हालाच मनस्ताप होईल. श्री सावंतांना आम्ही वचन दिले आहे. या प्रकरणाचा तपास जितक्या गुप्तपणे सुरू झाला होता, तितक्याच गुप्तपणे संपवायचादेखील आहे. त्यामुळे खंजिराचा चोर कोण होता, ही गोष्ट आपल्या चौघांमध्येच राहिल, याची खात्री मी देतो. "अल्फाने आश्वासन दिले. लिमयेंच्या डोळ्यांत पाणी तरळले. त्यांच्या कृत्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता." धन्यवाद..! धन्यवाद अल्फा..!! तुम्हा सर्वांच्या मनाचा किती मोठेपणा!! किती आभार मानू मी तुमचे... मी तुम्हाला आश्वासन देतो. आज रात्रीच मी कोकणात जाईन.. तेथे माझी थोडी जमीन आणि छोटे घर आहे. तेथे कष्ट करून उदरनिर्वाह करेन.. आणि इथून पुढे कधीही सांगली शहरात येणार नाही! मला या कटू आठवणींपासून सुटका करून घ्यायची आहे... "मग लिमये उठले आणि त्यांनी पलंगाची गादी वरती केली. तेथे एक सहज न दिसणारा ड्रॉवर होता. तो त्यांनी सरकविला आणि त्यामधून एक वस्तू बाहेर काढली - रत्नजडित खंजीर!!!त्या खंजिराच्या तेजाने आम्हा तिघांचेही डोळे दिपून गेले. त्याच्या मुठीवर पुरातन काळातील अत्यंत मौल्यवान अशी चार माणके आणि तीन हिरे चमचमत होते. अतिशय सुंदर आणि किंमती वस्तू होती ती!! लिमयेंनी तो खंजीर अल्फाच्या हातात कोंबला."घेऊन जा.. घेऊन जा ती दूषित वस्तू!! माझ्या डोळ्यासमोरही नकोय तो खंजीर!! " लिमये अल्फापासून दूर सरकत म्हणाले." धन्यवाद, श्री लिमये. " अल्फा म्हणाला, " तुम्हाला तुमच्या दुष्कृत्याचा पश्चात्ताप झाला, हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. आता स्वतःला दोष न देता नवीन आयुष्य सुरू करा. घडलेल्या गोष्टी विसरून जा. माणूस चूका कधी आपणहून करीत नसतो. त्या त्याच्या हातून वाईट प्रवृत्ती करवून घेत असतात. मग कधी तो लोभ असेल, कधी संताप असेल, तर कधी मत्सर!! पण त्या प्रवृत्तींना मारून टाकणे आणि झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करणे ही मात्र आपली जबाबदारी असते. तेवढी काळजी घ्या. प्रत्येक माणसात एक चांगले मन दडलेले असते. लोभ काय, संताप काय किंवा मत्सर काय, तिनही मानवी मनासाठी वाईटच. ते आपल्या चांगल्या मनावर ताबा मिळवणार नाहीत, याची खबरदारी आपणच घ्यायला हवी. ठिकाय तर, आम्हाला हवी असलेली वस्तू आम्हाला मिळाली आहे. वाघमारे सर, आपण निघूया का आता? श्री सावंतांच्या तडफडणाऱ्या जीवाला एकदाची शांती दिलेली बरी. "" हो. चला. " वाघमारे सर म्हणाले, " येतो लिमयेसाहेब. आता पुन्हा आपण भेटणार नाही, अशी अपेक्षा करतो. "आम्ही दरवाजाकडे वळलोच होतो, तितक्यात लिमये म्हणाले," वाघमारे, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुमचा हा तरूण साथीदार आणि अनुयायी खुपच तल्लख आहे. त्याची बुद्धी आणि विचारशक्ती अचंबित करणारी आहे. तुला माझा सलाम आहे अल्फा! माझ्यासारख्या वाटेवरून भटकलेल्यांना अद्दल घडविण्याचे काम असेच तू यशस्वीपणे करत राहशील, अशी माझी अपेक्षा आहे.""तुमच्या अपेक्षेला मी नक्कीच खरे उतरेन, श्री लिमये. " अल्फा म्हणाला, " चला. निघतो आम्ही. "आम्ही खाली उतरून घराबाहेर पडलो आणि रस्त्यावर आलो. मी आणि अल्फाने वाघमारेंकडे पाहिले. ते काय प्रतिक्रिया देतात, याची आम्हाला जाम उत्सुकता होती. त्यांनी अल्फाकडे पाहिले आणि थोडे हसले." ठिक आहे, ठिक आहे. यावेळीही तूच केस सोडविलीस. " ते म्हणाले, " काही हरकत नाही. थोडा ट्विस्ट होता केसमध्ये, जो माझ्या लक्षात आला नाही. तरीही.. खरं.. पण.. "त्यांना काहीतरी बोलायचे होते, पण बोलवत नव्हते. अखेर त्यांनी कबूल केलेच, " उत्तम रहस्यभेद होता हा.. "" आभार, सर. " अल्फा गालातल्या गालात हसत म्हणाला." पण याचा अर्थ असा नाही, की मी मठ्ठ आहे. माझ्या नजरेतून काही गोष्टी अनावधानाने सुटतात आणि त्या तुला दिसतात. पण.. जाऊदे. खंजीर मिळाला, हे महत्त्वाचे, मग तो कोणी का शोधेना. "" शेवटी मी तुमचाच चेला आहे, सर. तुमच्याबरोबर काम केलं, तुमच्याच पावलांवर पाऊल ठेवत गेलो आणि यशस्वी झालो. ही तर फक्त सुरूवात आहे. यापुढेही मला अनेक रहस्ये उलगडायची आहेत आणि तेव्हा वेळोवेळी तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा मला फायदा होईल, असा मला विश्वास वाटतो.." अल्फा नम्रपणे म्हणाला."बरं बरं. " वाघमारेंच्या आवाजात जरा कणखरपणा आला, " आता एक शेवटचं काम कर. सावंतांना संग्रहालयात बोलावून घे आणि खंजीर त्यांच्या हवाली करून टाक. बिचारे शांतपणे झोप तरी घेऊ शकतील आज. "" ठिक आहे सर. "अल्फा म्हणाला आणि त्याने लगेच सावंतांना फोन लावला." हॅलो.. श्री सावंत, अल्फा बोलतोय... आत्ताच्या आत्ता संग्रहालयात या.. मी तिकडे खंजीर घेऊन येतोय.. होय, खंजीर मी मिळविलाय.. होय, मी खरेच बोलतोय... अहो थट्टा करण्याची गोष्ट आहे का ही?? मी खंजीर घेऊन येतोय... तेवढे फक्त विचारू नका, इतकी कृपा करा.. मी कोणालातरी वचन दिलेले आहे. त्यामुळे कसा शोधला, कुणाकडे होता या प्रश्नांची उत्तरे मी मुळीच देणार नाही. फक्त तुम्ही तो माझ्याकडून घ्या आणि होता त्या जागी ठेवून टाका, बस्स!! ... असू दे, असू दे. धन्यवादांची गरज नाही.. अहो उपकार कसले.. काहीतरीच काय... बरं ठेवतो. तुम्ही लगेच या. "अल्फा हसायला लागला." मला तर प्रथम वाटलं, की अत्यानंदाने बेशुद्ध होतायत की काय हे!! "" ही घे माझ्या गाडीची किल्ली. लगेच जाऊन ये संग्रहालयात. आणि ट्रॅफिक पोलिसाला सापडू नकोस. तुझ्याकडे परवाना नाहीये. माझी पंचाईत करशील!! आम्ही वाट पाहतोय इथेच. "वाघमारेंनी गाडीची किल्ली अल्फाच्या हवाली केली. अल्फाने खंजीर खिशात खोलवर सुरक्षित  ठेवला आणि तो निघून गेला. वाघमारे सर त्याच्याकडे पहातच राहिले." पोरात टॅलेंट आहे, हे नाकबूल करताच येणार नाही. " ते म्हणाले, " तू त्याचा नवीनच रूममेट ना? "" होय. " मी उत्तरलो." काय मग? कसा वाटला तुला हा तुझा 'रूम पार्टनर'? "" थोडासा वेडपट, बडबड्या, पण भन्नाट!! " मी प्रतिक्रिया दिली. मग अचानक मला आठवले, " सर, तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. तुम्ही अल्फाला कधीपासून ओळखता? "" त्याच्या जन्मापासून. " वाघमारे सर म्हणाले, " का रे? "" मला दोन गोष्टींबद्दल अजून नीटसे समजलेले नाहीये. एक म्हणजे अल्फाचे आई - वडील कोठे असतात आणि काय करतात? आणि दुसरी म्हणजे तो मुळचा कुठला आहे? त्याने स्वतःबद्दल काहीच सांगितलेले नाहीये. दरवेळी तो हा विषय टाळतो. "" खरे तर अल्फा हा मुळचा इथलाच आहे, सांगलीचा. " वाघमारे म्हणाले." काय?? " मला विचित्रच वाटले, " असे कसे असू शकते? जर तो सांगलीचाच आहे, तर तर माझ्यासोबत रूमवर कसा राहतो? आणि त्याचे आई - बाबा कोठे असतात? "" त्याने तुला स्वतःबद्दल अगदीच अंधारात ठेवलेले दिसतेय. " वाघमारे म्हणाले, " अल्फाचे आईवडील आता या जगात नाहीयेत. त्याचा जन्म झाल्यानंतर काही महिन्यांतच अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोणीतरी अल्फाला अनाथाश्रमात सोडले. त्याचे नातेवाईक आहेत की नाहीत, ते कोठे आहेत, काय करतात याबद्दल कोणालाच काहीच कल्पना नाही. पंधरा - वीस वर्षांपूर्वी, जेव्हा मी पोलीसखात्यात नवीनच होतो, तेव्हा इथे श्री प्रधान पोलीस अधीक्षक होते. खुपच कर्तृत्ववान माणूस. माझे गुरू. ते त्या अनाथाश्रमाचे देणगीदार होते. त्यांनी तिथे अल्फाला हेरले. त्याची कुशल बुद्धीमत्ता आणि संशोधनातील आवड ताडून त्यांनी त्याला हळूहळू आपल्या कामात समाविष्ट करून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा माझा अल्फाशी परिचय झाला. आता प्रधान सर निवृत्त झाले आहेत. पण अल्फा अजूनही आम्हाला मदत करतच असतो. खरे तर मला माझ्या कामात कोणी लुडबुड केलेली पसंत नाही. पण प्रधान सर म्हणतात, की पोरगा हुशार आहे. त्याला आवडतंय तर करू दे मदत. म्हणून मी त्याला काही केसेसमध्ये शोध घेण्याची परवानगी देत असतो. तो अनाथाश्रम अठरा वर्षांपुढील मुलांना ठेवून घेत नाही. म्हणून प्रधान सरांनीच त्याच्या रहाण्या-जेवणाची सोय करून दिली आहे. तो पोरगा म्हणजे माझ्यासाठी एक कटकट आहे खरी. पण त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. तो पुढे जाऊन मोठे नाव कमविणार, यात शंकाच नाही. ".मला अल्फाच्या उत्साही चेहऱ्यामागचे सत्य जाणून दुःख झाले आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचा आदर वाटला. मला एक चतुर, चपळ आणि अतिशय बुद्धिमान असा डिटेक्टिव्ह सोबतीला मिळाला होता. रत्नजडित खंजिराचे प्रकरण म्हणजे माझ्या आयुष्यातील एक न विसरता येण्यासारखा अनुभव होता. यासारख्या आणखी किती 'आडमार्गां' वरून अल्फा मला नेणार होता, कोण जाणे!! प्रत्येक मार्ग रहस्यमय, धोकादायक, पण आयुष्याचा अर्थ सांगून जाणारा असणार होता. वाघमारे सरांसोबत तेथे उभा असताना - 'घनिष्ठ मैत्री किंवा नवीन रूम' यांच्यातला एक पर्याय मी निवडून टाकला...!!*समाप्त *आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Rujuta

इतर अल्फा पुस्तके कुठे आहेत ?

Akshar

Great story. Loved it.

abhaysbapat

खूप छान गोष्ट. एकाच बैठकीत सर्व भाग वाचून काढले कथानकाचा वेग चांगला जपला गेला आहे उत्सुकता ताणून धरली गेली आहे गोष्ट वाचताना अनेकदा शेरलॉक होम्स किंवा अगाथा ख्रिस्ती च्या हर्क्युल पायरो या गुप्तहेराची आठवण येते

Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य


Khuni Kon ? World famous murders in Marathi
Detective alfa and dekhava.
Detective Alfa and a step into darkness.
Detective Alpha and the moonlight murder
Detective Alfa and the old house. Story by Saurabh Wagale.
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
Detective Alfa ani Haravleli Angathi
Unknown stories from mahabharat.