दुसऱ्या दिवशीही अल्फा मोहिमेवर गेला. पण मी उठलो तेव्हा अल्फा आवरण्याच्या गडबडीत होता. त्यामुळे त्याच्या आजच्या कामगिरीबद्दल त्याने काही विशेष सांगितले नाही. फक्त 'समडोळीला जाऊन येतो' एवढेच बोलून तो बाहेर पडला. समडोळी हे सांगलीपासून दहा - बारा किलोमीटर अंतरावर असलेले एक खेडेगाव. आता तिथे या पठ्ठ्याचे काय काम निघाले कोणास ठाऊक? त्या दिवशी मात्र अल्फाला परतायला खुपच उशीर झाला. तो आला तेव्हा रात्रीचे दहा वाजायला आले होते. कालच्यासारखेच आल्या आल्या त्याने स्वतःला खुर्चीत झोकून दिले.

"अरे कुठे आहेस माणसा? दिवसभर मी वाट पाहतोय तुझी. सांगूनसुद्धा गेला नाहीस धड.. " मी म्हणालो.

" समडोळीला गेलो होतो. आज थोडं समाधानकारक काम झाल्यासारखं वाटतंय. " अल्फा घाम पुसत म्हणाला.

" ही समडोळीची वारी मधुनच कुठून उपटली?? "

" पाटीलचे गाव.. "अल्फा म्हणाला, " महादबा पाटील. वय वर्षे चव्वेचाळीस. मुलगा इंजिनिअरिंग शिकतोय आणि मुलगी नववी. वडील गावातले मोठे जमीनदार होते. ते दोन महिन्यांपूर्वीच वारले. त्याला एक सावत्र भाऊ आहे. पण त्या दोघांमध्ये कधी कुरबुर नसायची, असे गावातले लोक म्हणतात. पण मी जरा आणखी खोल जाऊन चौकशी केली. त्यांचे घरचे धुणे धुणाऱ्या माणसाला गाठले. त्याने मला सांगितले, की वडील वारल्यापासून या दोघा सावत्र भावांमध्ये थोडे गरम वातावरण निर्माण झाले होते- जमिनीच्या वाटणीवरून. महादबा या दोघांत मोठा होता. त्यामुळे त्याचे मत असे, की जमीन माझ्या हाताखाली यायला हवी. महादबा हा पहिल्या बायकोचा मुलगा होता. त्याचा सावत्र भाऊ अनिल हा धाकटा. महादबा जमिनीची वाटपच करायला तयार नव्हता. पण अनिलला जमीन हवी होती. हे प्रकरण त्यांनी घराच्या बाहेर जाऊ दिले नव्हते. त्यामुळे मला माहिती काढायला थोडे कष्ट पडले. महादबाची ही एक गोष्ट सोडली, तर बाकी कोणा गावकऱ्याशी कशा बाबतीत दुष्मनी नव्हती. या सर्वावरून तू काय निष्कर्ष काढशील? "

" साहजिकच संशयाचा रोख महादबाचा सावत्र भाऊ अनिल याच्याकडेच जातो. " मी विचार करत म्हणालो.

" आणि या सर्वांवरती कडी म्हणून, मी अनिल पाटलाबद्दल जेव्हा माहिती काढली, तेव्हा मला समजले, की तो धंद्याने मेस्त्री आहे! मेकॅनिक..!! " अल्फाने सांगितले.

मला धक्काच बसला.

" याचा अर्थ.. चेअरमनच्या केबिनमधील टेबलाला लागलेले ते अॉईलचे डाग... "

" त्याच्याच हाताचे असणार!! " अल्फा म्हणाला.

" मग तर हे सरळच आहे, की खुन आणि चोरी अनिल पाटलाने केले आहे. मग आता केसमध्ये शिल्लक तरी काय राहिलं? गुन्हेगार तर सापडला..! " मी उत्साहित होऊन म्हणालो.

" थांब थांब, अशी घाई करू नकोस मित्रा! " अल्फा म्हणाला, " हे सगळं इतकं सरळ असतं, तर मी आत्ता त्या अनिल पाटलाला पोलीस कोठडीत पोहोचवून नसतो का आलो? पण अजून मी तसे काही केलेले नाहीये. "

" का?? " मी बुचकळ्यातच पडलो.

" मी अनिल पाटलाचा फोटो मिळवला आणि आत्ता येताना संग्रहालयाच्या पहारेकऱ्याला - तुकाराम माळीला भेटून आलो. त्याला विचारले, की या माणसाला तू कधी पाहिले आहेस का. तर त्याने नकारार्थी उत्तर दिले. याशिवाय संग्रहालयाच्या इतर पहारेकऱ्यांना, शिवाय कामगारांनाही विचारले. पण कोणीच फोटोतल्या माणसाला ओळखत असल्याचे सांगितले नाही. याचा अर्थ अनिल पाटील संग्रहालयात कधी गेलाच नाही आणि गेला असेलच, तर केवळ एक - दोनदाच गेला असणार. मग चेअरमनच्या केबिनमधल्या कपाटातील चोरकप्प्यातील चाव्यांच्या जुडग्यातील बरोबर खंजिराच्या पेटीची चावी त्याला ठाऊक असण्याची सुमार शक्यतासुद्धा मला वाटत नाही, किंवा इतर कोणाकडून त्याने माहिती मिळविली, असेही सिद्ध होत नाही. दुसरी गोष्ट, जर त्याचे वैर त्याच्या सावत्र भावाशीच होते, तर त्याला ठार मारणे हे एकच त्याचे उद्दिष्ट असायला हवे. उगाच खंजिर चोरून नसत्या भानगडीत पडण्याची त्याला गरजच काय? आणि तिसरी गोष्ट, रत्नजडित खंजिरासारखी मौल्यवान वस्तू चोरी केल्यानंतर कोणी ती आपल्या घरी लपवून ठेवत नाही. तो कोण्या चोरबाजारातील हेराफेरी करणाऱ्या पैसेवाल्याला विकणार. त्याबद्दल माहिती मिळविण्यास मी वाघमारे सरांना सांगितले होते. त्यांचाही काही फोन नाही. या सर्व गोष्टी हेच दर्शवितात, की अनिलने गुन्हा केलेला नाहीये. आता बोल!! "

मी जरा डोके खाजविले, पण काहीच तर्कसंगती लागेना.

" पण हे अशक्य आहे.. " मी म्हणालो, " एकीकडे सिद्ध होतेय, की अनिल पाटील खुन झाल्याच्या रात्री संग्रहालयात गेला होता आणि त्यानेच खुन केला आहे, आणि दुसरीकडे तू दिलेल्या स्पष्टीकरणामुळे हीच गोष्ट फोल ठरते. हा नक्की काय विरोधाभास आहे?? "

" हेच कोडं आपल्याला सोडवायचं आहे. " अल्फा म्हणाला, " आत्ता मला दोन फोन येणे अपेक्षित आहे. पाहूया, त्यांमधून काही मदत होते का.. तोपर्यंत तू तुझा अभ्यास सुरू ठेव. "

" आणि तुझ्या जेवणाचं काय? मेस बंद होऊन आता कितीतरी वेळ झाला.. " मी म्हणालो.

" काळजी करू नकोस. मी येताना थोडं खाऊनच आलोय. तुला काय वाटलं, न खाता पिता मी उपाशीपोटी इतका शोध घेऊ शकेन? खरं तर जितकी उर्जा माझ्या या धावपळीवर खर्च झाली असेल, त्याच्या कैक पटींनी जास्त उर्जा माझ्या मेंदूने या केसचा विचार करण्यात आणि एक एक धागा जोडण्यात खाल्लेली आहे! असो. थोडा वेळ तू तुझे काम कर आणि माझ्या मनाला थोडा एकांत दे.. "

मी पुन्हा पहिल्यासारखे पुस्तक उघडून त्यात डोके घातले. साधारणतः पुढचा अर्धा तास आमच्या खोलीत नीरव शांतता होती. अल्फाने खुर्ची खिडकीजवळ ओढली होती आणि अर्धा तास तो खिडकीतून बाहेरच्या आकाशाकडे पहात विचार करण्यात गढून गेला होता. अकराच्या सुमारास अल्फाचा मोबाईल खणाणला आणि इतक्या वेळ टिकून राहिलेल्या शांततेचा भंग झाला.

"हां वाघमारे सर.. बोला. " अल्फा फोन उचलून म्हणाला. म्हणजे तो वाघमारेंचा फोन होता. पाच मिनिटे अल्फाचा फोन सुरूच राहिला. मी अल्फाच्या बोलण्यातून वाघमारे त्याला काय सांगत असावेत, हे ओळखण्याचा प्रयत्न केला, पण ते काही मला जमले नाही. महत्त्वाच्या फोन्सवर अल्फा  बोलायचाच असा, की त्याच्या आजुबाजुला असणाऱ्यांना त्याच्या बोलण्यातले काडीमात्रही न कळावे. त्यामुळे शेवटी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने फोन ठेवला आणि मघासारखाच तो खिडकीतून बाहेर पहात राहिला.

पाचच मिनीटांनी त्याचा फोन पुन्हा एकदा वाजला. यावेळी त्याने 'हां, बोल मित्रा..'  अशी सुरुवात केली. मला समजेचना, की हा कुठला नवीन 'मित्र' आणि इतक्या रात्री अल्फाला त्याच्या फोनकडून काय अपेक्षित असावे. हा फोन मात्र अल्फाने मिनीटभर बोलून ठेवून दिला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला दोन्ही फोन आले होते. त्यामुळे मी माझे पुस्तक बाजूला ठेवले आणि अल्फा त्या फोन्सची भानगड नक्की काय आहे ते सांगेल, या अपेक्षेने त्याच्याकडे पाहू लागलो. अल्फा मात्र समाधानी दिसण्याऐवजी जास्तच गोंधळात पडलेला दिसत होता.

"हो, हो, सांगतो तुला, मला आत्ता जे केलंय त्याबद्दल. " माझ्या उत्सुकतापूर्ण चेहऱ्याकडे  पहात अल्फा म्हणाला, " पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. या केसमध्ये काहीतरी प्रचंड मोठा घोटाळा आहे..!! "

" का रे? " मी विचारले.

" थांब. मी तुला सविस्तर सांगतो. " अल्फा खुर्ची वळवित म्हणाला, " आत्ता मला जो पहिला फोन आला, तो वाघमारे सरांचा होता. त्यांनी गुप्तपणे दोन दिवस चोरबाजार, गुंडांच्या वस्त्या, जुगाराचे अड्डे यांसारख्या ठिकाणी रत्नजडित खंजिराचा काही सुगावा लागतो का, याचा शोध घेतलाय. गुन्ह्यांची माहिती मिळविण्यासाठी यांसारखी उत्तम ठिकाणे नाहीत. थोडीशी खोलात जाऊन चौकशी केली, की अलिकडे घडलेल्या गुन्ह्यांच्या मागे कोणाचा हात असावा, किंवा चोरलेल्या मालाचा सौदा कुठे होतोय, याविषयी बरीच माहिती मिळते. अट फक्त इतकीच, की अशी चौकशी करताना तुमची खरी ओळख त्या लोकांना समजली नाही पाहिजे. नाहीतर तुमच्या जिवंत राहण्याची एक टक्का आशाही करायला नको. वाघमारे सरांनी सांगितले, की चोरबाजारात सध्या कोणत्याही प्रकारची तेजी नाहीये, किंवा नव्या किंमती वस्तूंच्या चोरीबाबत चर्चा नाहीये. कोणाला रत्नजडित खंजिर चोरीला गेलाय, हे ठाऊकच नाहीये. सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्यांनाही असेच वाटतेय, की रत्नजडित खंजिराच्या चोरीचा प्रयत्न फसलाय. थोडक्यात काय, तर ज्याने खंजिर चोरलाय, त्याने अजुनही तो स्वतःकडेच ठेवलाय आणि त्याचा कुणाशीही सौदा केलेला नाहीये.

दुसऱ्या फोनबद्द्ल सांगायचे झाले, तर तो समडोळीतून आला होता. अनिल पाटलाच्या धुणेवाल्या पोराचा. त्याला आता मी चांगलेच विश्वासात घेतले आहे. त्याला मी दोन कामे सांगितली होती - एक म्हणजे अनिल पाटलाच्या घराचा आतून वरवर शोध घेणे आणि रत्नजडित खंजिराचा कुठे वास येतोय का, ते पहाणे, आणि दुसरे म्हणजे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अनिल कुठे होता, याचा शोध घेणे. त्याने सांगितल्यानुसार मंगळवारी, ज्या रात्री गुन्हा घडला, त्या रात्री अनिल घरी नव्हता. घरीच काय, तो तेव्हा गावातच कुठे नव्हता!! अनिलच्या बायकोने सांगितले, की संध्याकाळी सातच्या सुमारास 'वर्कशॉपसाठी काही मेकॅनिकल पार्ट आणतो' असे सांगून तो सांगलीला गेला होता- गाडी घेऊन. त्यानंतर तो थेट रात्री बारा वाजता परतला, आणि तेही रिकाम्या हातांनी. पार्ट्स न आणताच.. तिने त्याला 'इतका वेळ कुठे होतात' म्हणून विचारले, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्या रात्री तो न जेवताच झोपला म्हणे. आता यातून काय निष्कर्ष निघतो? "

" असाच, की अनिल घरी खोटे सांगून संध्याकाळी सांगलीत आला. संग्रहालयाचा परिसर सामसूम होईपर्यंत त्याने इकडेतिकडे वेळ घालवला. दहाच्या सुमारास संग्रहालयात येऊन त्याच्या भावाचा खुन केला आणि खंजिर घेऊन पुन्हा रात्री उशिरा गावाकडे परतला. " मी सफाईदारपणे म्हणालो.

"हां.. हे फक्त तू दुसऱ्या फोनवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे बोललास. पण जेव्हा तू वाघमारे सरांनी दिलेल्या माहितीचासुद्धा विचार करतोस, तेव्हा तुला हेच शब्द मागे घ्यावे लागतात." अल्फा म्हणाला.

"हो, खरंय तुझं. " विचार करून शेवटी मी म्हणालो.

" या दोन फोन्समुळे हे कोडं सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचं झालेय. अनिल पाटलाबाबतचा विरोधाभास जास्तच गडद झालाय. रत्नजडित खंजिर जेव्हा चोरीला गेला, तेव्हा अनिल नक्कीच त्या संग्रहालयात होता - त्या अॉईलच्या डागांवरून हे सिद्ध होतं. पण त्याच्याजवळ खंजिर असल्याचा कोणताच मागमूस लागत नाही.. विचित्र... अति विचित्र!! "

" मग याचा अर्थ आपण नक्की काय घ्यायचा? अनिलने गुन्हा केलेला आहे की नाही? " मी विचारले.

" संदिग्ध प्रश्न आहे. मी इतक्यातच या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकणार. " चिंताग्रस्त चेहर्‍याने अल्फा म्हणाला, " आणि क्षणभरासाठी आपण असे समजूया, की या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ठाऊक आहे. तरीही शेवटी एक प्रश्न उरतोच - गुन्हेगार चेअरमनच्या टेबलामागे बसून काय करीत होता?? आणि तेही बऱ्याच वेळासाठी, जेव्हा त्याचे काम फक्त कपाटातील किल्ली मिळविणे इतकेच होते??"

"तू तर प्रश्नांवर प्रश्न उभे करत चाललायस अल्फा! मी तर बुवा हार मानली. जाम कन्फ्यूजिंग आहे ही केस. " मी म्हणालो, " पण या सर्वांत काहीतरी धागा असेलच ना? या सगळ्या घटनांना जोडणारा? "

" नक्कीच असणार.. " अल्फा उत्तरला, " पण तोच तर सापडत नाहीये ना. प्रत्येक घटनेला एक तर्कशुद्ध कारण असते. त्या कारणाशिवाय ती घटना घडत नाही. गुन्हेगार चेअरमनच्या टेबलाच्या मागे बसून राहिला, यालासुद्धा काहीतरी ठोस कारण असायलाच हवे. कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना ते काम लवकरात लवकर संपावे, या घाईत असतो. गुन्हा करताना आपण पाहिले जाऊ, अशी भीती त्याच्या मनात भरून राहिलेली असते. अशा वेळी त्याचे एका जागी बसून राहणे सुसंगत वाटत नाही. "

" मग? आता? " मी विचारले.

" आता काय! जोपर्यंत उत्तर मिळत नाही, तोपर्यंत विचार करणे हा एकच पर्याय. " अल्फाने आपली खुर्ची पुन्हा पहिल्यासारखी खिडकीच्या बाजूला ओढली. आपला मोबाईल घेतला आणि त्याला हेडफोन लावला. महाशयांचा हा एक भारी छंद होता. अल्फाच्या मोबाईलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी हजारभर तरी गाणी होती. त्यातली बहुतांश शास्त्रीय संगीताची होती (संगीतातील माझा अतिशय नावडता प्रकार!). बाकी मग काही ठराविक जुनी - नवी गाजलेली. काही काम नसेल किंवा काय करावे हे सुचत नसेल, तेव्हा लागलीच हेडफोन कानात घालायचा आणि शांतपणे पडून रहायचे. मला तर तीच तीच गाणी ऐकून बोअर झाले असते. पण अल्फा मात्र संगीतासाठी कधी थकायचा नाही.

"उद्या मला कॉलेजमध्येही एक चक्कर टाकावी लागणार आहे. " हेडफोन कानाला लावण्याआधी अल्फा म्हणाला.

" तू आणि कॉलेजला? " मला हसूच आले, " का रे बाबा? एवढी काय बिकट परिस्थिती निर्माण झाली? "

" मी ओळीने गेले पाच प्रॅक्टीकल्स चुकवले आहेत. आज मला त्या मास्तराचा फोनच आला शेवटी. उद्या जर नाही आलास तर परिक्षेलाही येऊ नकोस म्हणे! आता गोष्ट गळ्याशी आलीये म्हटल्यावर जायला तर हवेच. "

" मी पहिल्यापासूनच सांगत होतो, की विनाकारण कॉलेजला दांड्या मारू नकोस म्हणून. आता बस अटेंड करत." मी म्हणालो.

"दो घंटो की तो बात है! " अल्फा म्हणाला, " तोंड दाखवून येतो. सकाळ फुकट जाणार माझी, पण काही पर्याय नाही. माझ्या दृष्टीने आजची रात्र महत्त्वाची आहे. जर आज खंजिराचे कोडे नाही सुटले, तर मग आपण आशा सोडलेलीच बरी. चल, तुला शुभरात्री! मी आता एक एक धागा जोडण्यात माझी रात्र घालवणार आहे. तू सकाळी उठल्यानंतर तुला माझा चेहरा प्रसन्न आणि आनंदी दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त करूया. झोप तू. "

" गुडनाईट! " मी दिवा विझवला. अल्फाने हेडफोन घातला आणि तो खिडकीच्या दिशेने लांब पाय करून बसला.

रविवार जवळ येत होता...


 आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Rujuta

इतर अल्फा पुस्तके कुठे आहेत ?

Akshar

Great story. Loved it.

abhaysbapat

खूप छान गोष्ट. एकाच बैठकीत सर्व भाग वाचून काढले कथानकाचा वेग चांगला जपला गेला आहे उत्सुकता ताणून धरली गेली आहे गोष्ट वाचताना अनेकदा शेरलॉक होम्स किंवा अगाथा ख्रिस्ती च्या हर्क्युल पायरो या गुप्तहेराची आठवण येते

Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य


Khuni Kon ? World famous murders in Marathi
Detective alfa and dekhava.
Detective Alfa and a step into darkness.
Detective Alpha and the moonlight murder
Detective Alfa and the old house. Story by Saurabh Wagale.
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
Detective Alfa ani Haravleli Angathi
Unknown stories from mahabharat.