थोडे अद्भुत थोडे गूढ

थोडे अद्भुत थोडे गूढ - ७

Author:स्पार्टाकस

उत्तर अटलांटीक महासागरातील आणि युरोपातील सर्वात मोठं बेट म्हणजे ग्रेट ब्रिटन!

युनायटेड किंगडम या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश हा मूलत: इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या चार स्वतंत्र देशांचा बनलेला आहे. या चारही देशांनी एकत्रं येऊनही आपापल्या परंपरा आणि चालीरिती जाणिवपूर्वक वेगळ्या जपलेल्या आहेत. शासकीय दृष्ट्या लंडन ही राजधानी असली तरी स्कॉटलंडची राजधानी एडींबर्ग, वेल्सची राजधानी कार्डीफ आणि उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्ट यांनी आपली वैशीष्ट्यं आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेला वारसा जतन केलेला आहे.

ब्रिटनचा मुख्य भूभाग सोडला तर आसपासच्या प्रदेशात सुमारे हजारेक लहानमोठी बेटं पसरलेली आहेत. यातील बहुतेक सर्व बेटांचा ब्रिटनमध्ये समावेश होतो. अपवादच करायचा झाला तर आयर्लंडचा! इंग्लंडमध्ये सामील होण्यास ठाम नकार देणारा आणि आपलं स्वातंत्र्य जपणारा आयर्लंड हे ब्रिटनमध्ये समावेश नसणारं अटलांटीक मधील सर्वात मोठं बेट.

स्कॉटलंडच्या पश्चिमेला अनेक बेटांचा समुह आहे. या बेटांमधील सर्वात मोठं बेट म्हणजे लुईस अँड हॅरीस बेट. या बेटावरील बहुसंख्य वस्ती लुईस बेटाच्या सखल भागात आहे. लुईस बेटावरील स्टॉर्नोवे हे स्कॉटलंडमधील एक महत्वाचं बंदर आहे. स्कॉटलंडच्या मुख्य भूमीवर येण्यासाठी आजही केवळ फेरीबोटींची वाहतूक किंवा विमानप्रवास हेच मार्ग उपलब्धं आहेत!

लुईस बेटांच्या पश्चिमेला सुमारे २० मैलांवर सात लहानशा बेटांचा समुह आहे. ही बेटं सेव्हन हंटर्स किंवा फ्लॅनन बेटं म्हणून ओ़ळखली जातात. ७ व्या शतकातील आयरीश धर्मोपदेशक सेंट फ्लॅननवरुन या बेटांना हे नाव मिळालेलं आहे.

F

फ्लॅनन बेटं ही मुख्यतः तीन समुहात विभागलेली आहेत. उत्तरेकडील बिग आयलंड आणि हाऊस आयलंड ही सर्वात मोठी बेटं. दक्षिणेला असलेली दोन बेटं म्हणजे सोरे आणि गेर तोमेन आणि पश्चिमेला ब्लॅकस्मिथ आयलंड, सॅड संक रॉक आणि रॉईरेम! रॉईरेम बेटावर एक मोठी नैसर्गीक दगडी कमान (आर्च) आहे.

पुरातन कालात हा सर्व प्रदेश बर्फाच्छादीत होता. सुमारे २०००० वर्षांपूर्वी अटलांटीकवरील बर्फाचं हे आवरण वितळून ही बेटं वर आली असावीत असा कयास आहे. ही सर्व बेटं हा तत्कालीन बर्‍याच मोठ्या भूभागाचा भाग असावा, परंतु काळाच्या ओघात हा भूप्रदेश पाण्याखाली गेला असावा असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

फ्लॅनन बेटांचं भौगोलीक स्थान ध्यानात घेऊन स्कॉटलंडच्या नॉर्दन लाईटहाऊस बोर्डने इथे दीपस्तंभ उभारण्याची योजना आखली. स्कॉटलंडच्या उत्तरेकडे असलेल्या शेटलँड बेटांवरुन तसेच अटलांटीकमार्गे प्रवास करणार्‍या बोटींना दिशादर्शनासाठी या दीपस्तंभाचा उपयोग होणार होता. उत्तरेकडे असलेल्या बिग आयलंड(एलेन मोर्)वर हा दीपस्तंभ उभारण्याची योजना होती. डेव्हीड अ‍ॅलन स्टीव्हन्सनच्या डिझाईनप्रमाणे या दीपस्तंभाचं बांधकाम सुरु झालं.

एलेन मोरवर दीपस्तंभ उभारणं हे जिकीरीचं काम होतं. बेटावर बोटीचा धक्का नसल्यामुळे सुरवातीला सर्व बांधकाम साहित्य अटलांटीकच्या उसळणार्‍या लाटांशी सामना करत बोटीवरुन थेट ४५ मीटर उंचीच्या कड्यावर चढवावं लागत असे! दीपस्तंभाचा मुख्य टॉवर तसेच इतर लहानसहान इमारती, कर्मचार्‍यांना राहण्याची व्यवस्था इतकंच नव्हे तर बोटी उतरवण्यासाठीच्या धक्क्यापासून ते दीपस्तंभापर्यंत रेल्वेलाईनही बांधण्यात आली! त्याच्या जोडीला लुईस बेटावर ब्रेसलेट इथे या दीपस्तंभावर जा-ये करण्यासाठी लहानसं ठाणं उभारण्यात आलं.

या बेटावर रेल्वेलाईन उभारण्यामागे खास हेतू होता. बेटावरील दोन धक्क्यांपासून ते थेट लाईटहाऊसपर्यंत जरुर त्या सामानाची आणि दीपस्तंभावरील दिव्यासाठी आवश्यक पॅराफीन वाहून नेण्यासाठी रेल्वेची सोय करण्यात आली होती. शेवटच्या भागात तीव्र उताराच्या चढाईमुळे दोन रेल्वेच्या रुळामधे पुलीच्या सहायाने विशेष केबल बसवण्यात आलेली होती!

१८९९ मध्ये या दीपस्तंभाचं बांधकाम पूर्ण झालं. ७ डिसेंबर १८९९ या दिवशी दीपस्तंभातील दिवा सर्वात प्रथम उजळला!

LH

दीपस्तंभ कार्यरत झाल्यावर वर्षाभराने....

फ्लॅनन बेटावर एकूण तीन कर्मचारी कामाला असत. चौथा कर्मचारी लुईस बेटावर राहत असे. दर आठवड्याला तीनपैकी एका कर्मचार्‍याची फ्लॅनन बेटावरुन लुईस बेटावर बदली होत असे. 'हेस्पर्स' या नावाची बोट दर आठवड्याला आवश्यक ती सामग्री आणि बदली कर्मचारी घेऊन लुईस आणि फ्लॅनन बेटांच्या मध्ये फेर्‍या मारत असे.

१५ डिसेंबर १९०० ला थॉमस मार्शल, जेम्स डुकॅट आणि डोनाल्ड मॅकआर्थर हे तिघे कर्मचारी फ्लॅनन बेटांवर होते. त्यांचा चौथा सहकारी जोसेफ मूर लुईस बेटावर होता.

आर्क्टर हे जहाज अमेरीकेतील फिलाडेल्फीया इथून एडींबर्गच्या लीथ बंदराकडे निघालं होतं. हवामान अतिशय प्रतिकूल होतं. समुद्रही खवळलेला होता. अशा परिस्थितीत दीपस्तंभाच्या दिव्याचं मार्गदर्शन हे अमुल्यं ठरतं. परंतु दीपस्तंभावरील तो दिवाच उजळलेला नाही असं त्या जहाजाच्या कॅप्टनच्या ध्यानात आलं! जहाज त्यावेळी फ्लॅनन बेटांच्या पश्चिमेला सुमारे दोन मैलांवरुन जात होतं. नेमका काय प्रकार असावा हे कॅप्टनच्या ध्यानात येईना, परंतु खवळलेल्या समुद्रातून वाट काढण्यावरील मुख्य कामावर त्याने आपलं लक्षं केंद्रीत केलं.

लीथ इथे पोहोचल्यावर आर्क्टरच्या कॅप्टनने दीपस्तंभावरील विझलेल्या दिव्याचा सर्व वृत्तांत आपल्या रिपोर्टमध्ये सादर केला. परंतु इतक्या तातडीने हालचाल करण्याची आवश्यकता नसल्याचं सर्वांचं मत पडलं. वादळामुळे किंवा तेल संपल्यामुळे दिवा गेला असावा अशी सर्वांची धारणा झाली.

लुईस इथून फ्लॅनन बेटांवर दर आठवड्याला येणार्‍या बोटीची फेरी २० डिसेंबरला होणार होती, परंतु खराब हवामानामुळे लुईस बंदरातून बाहेर पडणं अशक्यं झालं होतं. अखेर २६ डिसेंबरला दुपारच्या सुमाराला हेस्पर्स बोट फ्लॅनन बेटाजवळ आली. परंतु बेटाजवळ आल्यावर आणि नीट निरीक्षण केल्यावर काहीतरी गडबड असावी अशी हेस्पर्सचा कॅप्टन जिम हार्वे याला शंका आली.

बेटाच्या धक्क्यावर असलेला ध्वजस्तंभ रिकामा होता! त्यावरील ध्वज गायब झाला होता!
साधन सामग्री भरुन घेण्यासाठी नेहमी धक्क्यावर ठेवले जाणारे रिकामे खोके कुठेही दिसून येत नव्हते!

काय भानगड असावी या विचाराने कॅप्टन हार्वेने आपल्या बोटीचा भोंगा दोन वेळा वाजवला. भोंग्याचा आवाज ऐकून मार्शल, डुकॅट आणि मॅकआर्थर यांच्यापैकी कोणीतरी खाली उतरुन येईल अशी त्याची अपेक्षा होती.

...परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही!

कॅप्टन हार्वेने एक लहानशी डिंघी पाण्यात सोडली. या डिंघीतून एकटा जोसेफ मूर बेटावर उतरला. दीपस्तंभाच्या आवाराचं फाटक आणि दीपस्तंभाचं मुख्य दार आतून बंद असल्याचं त्याच्या ध्यानात आलं. आपल्याजवळील किल्लीने दार उघडून मूर दीपस्तंभात शिरला. झोपण्याचे बिछाने पसरलेले होते. दीपस्तंभावरील घड्याळही बंद पडलं होतं!

मूरच्या तीन सहकार्‍यांपैकी एकाचाही पत्ता नव्हता!
मार्शल, डुकॅट आणि मॅकआर्थर हवेत विरुन जावे तसे अदृष्यं झाले होते!

मूर धक्क्यावर परतला आणि हेस्पर्सचा सेकंड मेट आणि एका खलाशासह दीपस्तंभात परतला. दीपस्तंभाच्या टोकाला जाऊन बारकाईने निरीक्षण केल्यावर दीपस्तंभावरील सर्व दिवे स्वच्छ पुसून त्यात तेल भरुन ठेवण्यात आलेलं होतं असं आढळलं. तीनपैकी एका कर्मचार्‍याचा ओव्हरकोट तिथेच आढळून आला! दीपस्तंभावरील सर्व सामान जागच्या जागी होतं! केवळ एक खुर्ची तेव्हढी आडवी पडलेली आढळली!

कॅप्टन हार्वे, मूर आणि इतरांनी सर्व बेटाचा कानाकोपरा तपासला, परंतु बेपत्ता मार्शल, डुकॅट आणि मॅकआर्थर यांची कोणतीही खूण आढळून आली नाही!

जोसेफ मूर आणि हार्वेचे तीन खलाशी फ्लॅनन बेटावर थांबले. लुईस बेटावर परतल्यावर कॅप्टन हार्वेने नॉर्दन लाईटहाऊस बोर्डाला तपशीलवार तार पाठवली. तिघा कर्मचार्‍यांना आठवड्याभरापूर्वीच अपघात झाला असावा असा त्याचा अंदाज होता. ते कर्मचारी वादळात दीपस्तंभावरुन कोसळून समुद्रात फेकले गेले असावेत असा संशयही त्याने व्यक्तं केला होता.

मूर आणि इतर तीन खलाशांनी बारकाईने तपास केला. बेटाच्या पश्चिम भागातील धक्क्याची वाताहात झाल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. सामग्री साठवण्याचा एक बॉक्स सुमारे ३३ मीटर उंच फेकला जाऊन त्याचे तुकडे झाले होते. लोखंडी कठडे मोडून पडलेले होते. त्या भागातील रेल्वेचे रूळही उखडले गेले होते. रूळांवर एक मोठी दरड कोसळली होती! कड्याच्या माथ्यावरील टोकापासून (समुद्रसपाटीपासून ६० मीटर) दगड इतस्ततः भिरकावले गेले होते.

१५ डिसेंबरच्या रात्री ९.०० वाजेपर्यंतच्या या सर्व घटनांची नोंद दीपस्तंभावरील लॉगबुकात करण्यात आलेलली होती! त्यामुळे वादळाच्या या थैमानानंतरही तिघंही दीपस्तंभात होते हे सिद्ध होत होतं.

....परंतु नंतर नेमकं काय झालं?

नॉर्दन लाईटहाऊस बोर्डचा अधिकारी रॉबर्ट म्युईर्हेड २९ डिसेंबरला फ्लॅनन बेटांवर पोहोचला. त्याने सर्व परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण केलं. मूर, कॅप्टन हार्वे आणि इतरांकडे त्याने तपशीलवार चौकशी केली. सर्व परिस्थितीचा विचार केल्यावर तो म्हणतो,

"१५ डिसेंबरच्या रात्री ९.०० वाजेपर्यंत मार्शल, डुकॅट आणि मॅकआर्थर आपल्या ड्युटीवर हजर होते. रात्रीचं भोजन आटपल्यावर सर्व भांडीही साफ करुन ठेवलेली आढळली. बेटावर बोटी बांधून ठेवण्याचे दोरखंड एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलेले होते. हा बॉक्स एका मोठ्या खडकाच्या कपारीत ठेवण्यात आला होता. या बॉक्सचं नुकसान झालेलं आढळल्यावर डुकॅट आणि मार्शल त्या बाजूला गेले. त्यांच्यापाठोपाठ आपला ओव्हरकोट न घेता मॅकआर्थरही त्यांच्या मदतीला गेला. दोरखंड ओढून घेत असतानाच आलेल्या मोठ्या वादळी लाटेने सर्वजण कपारीत फेकले गेले आणि त्यानंतर परत समुद्रात खोलवर ओढले गेले असावेत!"

मार्शल, डुकॅट आणि मॅकआर्थर यांच्या गायब होण्याबद्दल अनेक तर्क मांडण्यात आले.

यापैकी एक तर्क म्हणजे तिघांमध्ये काही कारणावरुन मारामारी झाली, आणि एकाने आपल्या दोन सहकार्‍यांची हत्या करुन त्यांची प्रेतं समुद्रात फेकून दिली! राग ओसरल्यावर त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि त्याने समुद्रात उडी टाकून आत्महत्या केली! अर्थात या तर्काला कोणताही आधार नव्हता. आडव्या पडलेल्या एका खुर्चीचा अपवाद वगळता संघर्षाची कोणतीही चिन्हं आढळून आली नव्हती.

दुसरा तर्क मांडण्यात आला तो म्हणजे दीपस्तंभावरील तिघा कर्मचार्‍यांना शत्रुच्या हेरांनी पकडून नेलं असावं! अर्थात या तर्काला पुष्टी देणारा कोणताही पुरावा आढळला नाही. तसंच दीपस्तंभावरील कर्मचार्‍यांकडून अशी कोणती माहीती मिळणार होती?

आणखीन एका तर्कानुसार तिघांपैकी एकजण समुद्राच्या लाटांमध्ये खेचला गेला आणि इतर दोघं त्याला वाचविण्यासाठी धावले, परंतु पाठोपाठ आलेल्या दुसर्‍या मोठ्या लाटेमध्ये ते देखील खेचले गेले! खोल समुद्रात खेचले गेल्याने त्यांच्या देहांचा माशांनी फन्ना उडवल्यामुळे कोणाचंही प्रेतही सापडलं नाही.

एलेन मोर बेटाच्या पश्चिम भागात लाटांच्या मार्‍यामुळे दगडाची झीज झाल्यामुळे अनेक चिंचोळ्या कपारी तयार झालेल्या आहेत. या कपारींचा शेवट बहुधा एखाद्या गुहेत झालेला असतो. दोरखंड ओढून घेण्याच्या कामगिरीवर मार्शल आणि डुकॅट गेलेले असताना दीपस्तंभावर असलेल्या मॅकआर्थरला बेटाकडे झेपावणार्‍या मोठ्या लाटा दृष्टीस पडल्या असाव्या. आपल्या सहकार्‍यांना सावध करण्यासाठी ओव्हरकोटची पर्वा न करता तो धावत सुटला. परंतु तिघेही लाटांच्या मार्‍यात सापडून एखाद्या गुहेत फेकले गेले असावेत. किनार्‍यावर आदळून परतणार्‍या लाटांच्या जोरदार प्रवाहांमुळे ते समुद्रात खेचले गेले असावेत. मॅकआर्थर घाईत धावत सुटल्याने आडव्या पडलेल्या खुर्चीचं त्याला भान राहीलं नाही.

मात्रं या सर्व तर्कांमधूनही फाटकाचं आणि दीपस्तंभाचं दार आतून बंद कसं राहीलं होतं याचा उलगडा होत नाही!

एका प्रचंड आकाराच्या समुद्री प्राण्याने किंवा पक्ष्याने तिघांना पकडून खाउन टाकलं असावं असाही एक भन्नाट तर्क लढवण्यात आला! त्याच्या जोडीला भुतांनी भारलेली एक बोट किनार्‍यावर आली आणि त्या बोटीतील भुतांनी तिघांना ओढून घेतलं असावं असं अफलातून प्रतिपादनही करण्यात आलं!

थॉमस मार्शल, जेम्स डुकॅट आणि डोनाल्ड मॅकआर्थर यांचं नेमकं काय झालं असावं?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to थोडे अद्भुत थोडे गूढ


दॅट्स ऑल युवर ऑनर

रहस्य कथा

ताजमहालाचे रहस्य

ताजमहाल हा भारतीय इतिहासाचा एक अद्वितीय हिस्सा आहे. प्रेमाच्या या निशाणीला विश्वभरात विशेष ख्याती प्राप्त आहे. परंतु ताजमहालाची निर्मिती आणि हेतू या बाबतीत बऱ्याच लोकांमध्ये आज देखील विवाद आढळतो. आज आम्ही तुम्हाला संगमरवरी प्रेमाच्या प्रतीकाच्या बाबतीत काही अशी रहस्य सांगणार आहोत जी कोणालाही माहिती नाहीत...

रहस्यमय प्रेते

अनेक शतके प्राचीन असलेली १० रहस्यमय प्रेते जी आजपर्यंत खराब झाली नाहीत

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे

मित्रांनो आणि आदरणीय वाचकांनो, आज आपण ओडीसा येथील जगप्रसिद्ध पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही आश्चर्यजनक गोष्टी पाहणार आहोत.

क्रॉनो नॉट अरुण

अरुण - काळ प्रवासी

कार्नेजी देवाची कहाणी

कहाणी

"आग्या वेताळ" - एक गूढकथा

आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात! ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते? एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे? या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!

शालिमार

CBI ऑफिसर कैलास आणि स्वरा ह्यांच्या साहसकथा. शालिमार हि कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होणार आहे. कादंबरी असली तरी प्रत्येक प्रकरण हे एक कथा म्हणून सुद्धा पहिले जाऊ शकते.

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.