कुलकर्णी कुटुंब सगळ्या विसापूरमध्ये प्रसिद्द होते. कुटुंबप्रमुख राजाराम कुलकर्णी ह्यांना तर सर्व गावात देवासारखा मान. त्यांचा शब्द कधी पडला असे झाले नाही. गावातले सर्वच लोक त्यांच्यावर जीव टाकायचे. राजाराम होतेही तसेच. जीवाला जीव देणारे, शिस्तीचे. नजरेचा दरारा तर असा कि त्यांना काहीच बोलायची वेळ येत नसे. सतेज कांती, तालीमबाज शरीर , भरघोस मिशा, घारे डोळे जे समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेत. खोट्याची आणि खोटे बोलणाऱ्यांची त्यांना चीड होती. कोणीही त्यांच्यापुढे खोटे बोलूच शकायचा नाही. असे हे राजाराम. दानशूर कर्णाचे दुसरे नाव म्हणजे राजाराम. त्यांच्या दारी आलेला याचक कधीही रिकाम्या हाताने गेला नाही अशी त्यांची ख्याती.     त्यांच्या पत्नी सीताबाई म्हणजे साक्षात सीतामाईच. आपल्या पतीला साजेशा आणि त्यांच्या सर्व गोष्टीत सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या. राजाराम सकाळी रामप्रहराला उठून तालीम करायचे. तर सीताबाई त्यांच्याही आधी उठून त्यांची सगळी तयारी करून ठेवायच्या. तालीम झाल्यावर राजाराम गोठ्यात जाऊन त्यांच्या लाडक्या गाईचे कपिलेचे धारोष्ण दूध घ्यायचे. तीही त्यांची वाट पाहत असायची. सीताबाई आणि राजारामरावांशिवाय ती कोणालाही हात लावून द्यायची नाही. मग राजारामराव अंघोळ करून देवपूजा करीत. प्रभू श्रीराम हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांच्या देव्हाऱ्यात एक सोन्याची श्रीरामांची मूर्ती होती, जी त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या सेवेवर खुश होऊन स्वतः भगवान हनुमंताने दिली होते असे म्हणत. न्याहारी झाल्यावर राजारामराव शेतावर जात आणि मजुरांबरोबर स्वतःही शेतात राबत. सीताबाई स्वतःच्या हाताने आपल्या पतीचा आणि सर्व मजुरांचा स्वयंपाक बनवून आणत. संध्याकाळी राजारामराव लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवत असत.    राजाराम यांना जसा गावात मान होता तसाच घरातही मान होता त्यांना ५ धाकटे भाऊ होते. सर्वांचे विवाह झाले होते. ते सर्वजण त्यांच्या मोठ्या वाड्यात राहत असत. त्या वाड्यापुढे एखादा राजमहल फिका पडावा इतका तो वाडा दिमाखदार होता. त्याच्यावर पुण्याईचे तेज झळकत होते. राजारामांचे सर्व भाऊ  आणि त्यांच्या पत्नी राजाराम आणि सीताबाईंना आई वडिलांप्रमाणे मानत असत. सर्वजण सुखासमाधानाने राहत होते. फक्त दुःख इतकेच होते कि राजाराम आणि सीताबाई यांच्या पोटी आपत्य नव्हते. त्यामुळे सीताबाई दुःखी असत. परंतु त्या आपले दुःख दाखवत नसत. एकांतात राजारामांना त्यांचे दुःख जाणवत असे. "अग काय झालं आल्याला आपत्य नाही तर? माझ्या पाचही भावांना तू मुलांचं प्रेम दिलंस. तेही तुला आई मानतात. अग आता तीच आपली मुलं आहेत." राजाराम आपल्या पत्नीला समजावत. त्याही डोळ्यातले पाणी पुसून पतीकडे पाहून हसत. पण शेवटी स्त्रीचं काळीज पुरुषाला काय समजणार?               

राजाराम रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात करत असत. रामनवमीच्या आधी आठ दिवस आणि रामनवमीच्या दिवशी गावात कोणाच्याही घरात चूल पेटणार नाही असे त्यांचे आदेश असत. वाड्यावर दिवसरात्र जेवणाच्या पंगती उठत. गरिबांना अन्न, वस्त्राचे दान होई. सर्वचजण भरल्या झोळीने भरभरून आशीर्वाद देऊन जात. इतरवेळीही त्यांच्या दारी येणाऱ्या याचकांसाठी घंटा ठेवली होती. ती वाजवून याचक राजारामरावांना बोलावू शकत असे.

 अशाच एका रामनवमी उत्सवाचा शेवटचा दिवस होता रात्री सर्व लोक जेऊन गेले. घरातल्या स्त्रिया आवराआवर करत होत्या. वाड्याचे दरवाजे बंद झाले. इतक्यात याचकांसाठी ठेवलेल्या घंटेचा आवाज होऊ लागला. "इतक्या रात्री कोण आलंय?" असे म्हणत हर्षवर्धन राजारामांच्या पाठीवरचा भाऊ दार उघडण्यास गेला. बाहेर एक अंगावरच्या कपड्यांची लक्तरे झालेले कुटुंब उभे होते. पती, पत्नी आणि दोन मुले. काळोखात हर्षवर्धनला इतकेच दिसले. त्यानी त्यांना तिथेच थांबायला सांगितले. इतक्यात राजारामही तिथे आले. त्यांनी कंदिलाच्या उजेडात त्या स्त्रीचा चेहरा बघताच त्यांच्या चेहरा संतापाने लाल झाला.     "आल्या पाऊली चालती हो ! तुझी माझ्या दारात यायची हिम्मत कशी झाली? कुळबुडवे ! आत्ताच्या आता तुझं काळं तोंड घेऊन निघून जा ! " राजारामांचा चढलेला आवाज ऐकून घरातले सगळे धावत आले आणि त्या स्त्रीचा चेहरा बघताच सीताबाई, हर्षवर्धन आणि सगळेच भाऊ दचकले. ती पार्वती होती. पार्वती त्यांची सगळ्यात मोठी बहीण. जिने त्यांच्या आई-वडिलांच्या मनाविरुद्ध एका मांत्रिकाशी पळून जाऊन लग्न केले होते. त्या धक्क्याने त्यांचे त्यांच्या आई-वडिलांनी प्राण सोडले होते आणि आता तीच आपला नवरा आणि दोन मुलांना घेऊन हीनदीन अवस्थेत त्यांच्या दारात उभी होती.      राजाराम चिडलेले दिसताच ती हात जोडून म्हणाली, "मला माफ कर राजा! खरंच माफ कर ! आजच्या दिवशी मी याचक म्हणून तुझ्या दारात आली आहे. माझ्या पतीलाही त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप झाला आहे. आम्ही आता चांगल्या मार्गाने जायचे ठरवले आहे. आम्हाला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. आम्हाला आश्रय दे . मी वचन देते कि आमच्यामुळे तुला कोणताही त्रास होणार नाही. मी आणि माझ्या या मुलांनी कुठे जायचं? तू सगळ्या गावाचा आश्रयदाता आहेस आमच्यावर उपकार कर. आमचे अपराध पोटात घाल.  आम्ही आश्रितासारखे एका कोपऱ्यात पडून राहू." ," आम्हाला खरंच माफ करा. तुम्ही सांगाल ती कामं मी करायला तयार आहे. तुम्ही पायातली वहाण काढून मारा. पण आम्हाला माफ करा." पार्वतीचा नवरा महंत गयावया करत बोलला.           

राजाराम काहीच बोलत नाही हे पाहून त्यांचा तिसरा भाऊ राघव बोलला," दादा ! घे ना ठेऊन हिला. अरे ताईच्या दोन मुलांकडे बघ. त्यांना घेऊन ती कुठे जाईल? " राजाराम म्हणाले," राघवा अरे , तू भोळा आहेस. हिच्या अश्रूंना फसू नकोस. हि अवदसा घरात घेतली तर घराचा सत्यानाश करेल." मग सीताबाईच बोलल्या," अहो ! मी काय म्हणते , राहू दे काही दिवस, ताईंना मग पाहू काय करायचं ते .त्यांची अवस्था तर पहा. मला नाही वाटत त्या काही दुष्ट हेतू घेऊन घरात आल्या असतील." राजारामांनी अनिश्चितपणे हात झटकले आणि दारातून बाजूला झाले. पार्वतीने वाड्यात पाऊल टाकले आणि वाड्याचा विनाश वाड्यात आला.

सुरवातीला पार्वती खूपच दीनवाणेपणानी आश्रितासारखी वाड्यात वावरत असे. तिचा नवरा आणि मुले शेतावर राबत असत. नंतर मात्र हळू हळू पार्वतीने आपल्या लहान भावांच्या बायकांना सीताबाईंविरुद्ध  भडकवण्यास सुरवात केली. पार्वती दिसायला देखणी होती घारे डोळे मध्यम उंची आणि पायापर्यंत लांब केस. कपाळावरच्या मोठया कुंकवाने तिच्या सौंदर्यात भर पडत असे. त्यामुळे सर्वांवर तिचा प्रभाव पटकन पडत असे. तसाच तो तिच्या भावजयांवर पडला. सीताबाई काहीतरी करते ज्यामुळे कोणालाही मूल होत नाही. सीताबाईच्या चारही जावा त्यांनाही मूल होत नव्हते. हळू हळू त्यांना पार्वतीने ताब्यात घेतले. त्या तिचं ऐकू लागल्या. मग एक दिवस अचानक सीताबाईंना दिवस गेल्याचे सगळ्यांना समजले. राजारामरावांच्या तर आनंदाला पारावर राहिला नाही. सर्व गावच आनंदला. या गोष्टीचा फायदा पार्वती आणि तिच्या पतीने घेतला. राजारामच्या पाचही भावांना आता तुम्हला कोणी विचारणार नाही. वाड्याला वारस आल्यावर तुम्हाला लाथ मारून बाहेर काढणार असे त्यांच्या मनात भरवायला सुरवात केली.   सर्व भाऊ पूर्णपणे महंतांच्या कह्यात गेले होते. मग हळू हळू महंताने राजारामांच्या खाण्यात त्यांच्या न कळत एक भस्म घालायला सुरवात केली ज्यांनी इकडे राजारामांची तब्बेत ढासळू लागली. शारीरिक दुखण्यापेक्षा त्यांना आपले भाऊ दुरावले हे दुःख जास्त होते. त्यात त्यांची लाडकी कपिला गाय एक दिवस अचानक मृत्युमुखी पडली. राजाराम खचले. 

मग एक दिवस ते देव्हाऱ्यात बसले. समोर श्रीरामाची देखणी मूर्ती होती त्याला हात जोडून म्हणाले," देवा आजपर्यंत तुम्ही माझे मुलाप्रमाणे पालन केलेत. मग आता हे संकट का पाठवलेत ? मला मृत्यूचे भय नाही. परंतु ज्यांना माझ्या मुलांप्रमाणे वाढवले ते माझे भाऊ  वाईट मार्गाला जात आहेत. फक्त आपत्य आणि मालमत्तेसाठी? देवा! माझ्या मागे तुझीही पूजा होईल असे वाटत नाही. महंतचे आणि पार्वतीचे पापी हात तुझ्यापर्यंत पोहोचू नयेत असे वाटते. माझ्या घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या मौल्यवान वस्तू, दागिने हे त्यांच्या हाती लागू नयेत. त्यांचे मोल आजघडीला जास्त आहे म्हणून नाही तर त्या माझ्या पूर्वजांच्या पुण्याईच्या खुणा आहेत. मी त्या काही झालं तरी त्यांना मिळून देणार नाही. देवा मार्ग दाखव. " राजाराम शांतपणे डोळे मिटून बसले होते. इतक्यात एक आवाज त्यांच्या मनात घुमला," पुत्रा ! जे दारात आलंय ते तू टाळू शकणार नाहीस. महंत खूप शक्तिशाली होऊन आला आहे . त्याला भूत, पिशाच्च , खविस, वेताळ सगळे वश आहेत. त्याला हा वाडा त्याच्या वाईट कर्मांसाठी हवा आहे. कारण हा वाडा वास्तुशास्त्रानुसार बांधला गेला आहे. जर यात पुण्यकर्म झाली तर यासारखी शुभ जागा नाही. याउलट या जागी जर वाईट शक्तीची आराधना केली तर त्याला त्याही प्रसन्न होतील. त्यासाठी या वड्यासारखी चांगली जागा नाही. म्हणून तो इथे आला आहे. त्यानी त्याच्या मंत्रांनी माझ्या शक्ती या देवघरापुरत्या बांधून ठेवल्या आहेत. माझी इच्छा असूनही मी तुझी मदत करू शकत नाही. तुझ्या होणाऱ्या वारसाला वाचव. इथून दूर पाठवून दे. माझ्या वाड्याभोवती रामरक्षेचं रिंगण बनव. म्हणजे या वाईट शक्ती मोकाट सुटून गावकऱ्यांचा जीव घेणार नाहीत. माझ्या या मूर्तीने मातीत रिंगण काढ आणि मग माझी मूर्ती सर्व मौल्यवान वस्तूंबरोबर मी सांगतो त्या जागी लपव तुझ्याच वंशातील एक तरुण एक दिवस येईल आणि या वाड्याला शापमुक्त करेल.

त्याच दिवशी राजारामांनी सीताबाईंना घेऊन त्यांच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाणार असे जाहीर केले. या अवस्थेत त्यांना नेणे योग्य नाही हे पार्वतीने परोपरीने समजावले. परंतु राजाराम कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानी पार्वतीलाही बरोबर यायला सांगितले. त्यांना माहित होते कि ती देवळात पाऊल टाकणार नाही. मग त्यानी पार्वतीची देखभाल करणारी सुषमा आणि रमा या दोघीना बरोबर घेतले. सुभान गड्याला बैलगाडी जुंपायला सांगितली. रामाची मूर्ती सोबत घेऊन ते निघाले. त्यानी सीताबाईंना एका गुप्त जागी पाठवले. त्यांनी रात्री परत येऊन रामरक्षेचे रिंगण घराभोवती काढले.  गुप्त दरवाजाने आत येऊन सर्व मौल्यवान गोष्टी आणि श्रीरामाची मूर्ती त्यांनी आदेश झालेल्या जागी लपवली. मग दुसऱ्या दिवशी ते वाड्यात आले. तोपर्यंत महंतला काय झाले याचा अंदाज आला होता. त्यानी राजारामांना सीताबाईंचा ठावठिकाणा विचारण्याचा खूप प्रयत्न केला. कारण येणारा वारस त्याचा सर्वनाश करू शकत होता. तसेच देव्हाऱ्यातली श्रीरामाची मूर्तीही दिसत नव्हती. महंत खूप चिडला. त्यानी राजारामांचे खूप हाल हाल केले तरीही त्यांच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही. त्यांचे भाऊ हादरून त्यांना हाल हाल होऊन मरताना पाहत होते. आता ते काहीही करू शकत नव्हते. शेवटी राजारामांनी प्राण सोडला. एक एक करत पाचही भाऊ मारले गेले. त्याच्या बायकांचे बळी दिले गेले. एकीच्याही प्रेताचे दाह- संस्कार झाले नाही. मरणानंतर त्यांच्या आत्म्यांना महंतने गुलाम बनवून ठेवले. आपल्या सर्व शक्ती वापरूनही तो त्या जवाहिराचा आणि रामाच्या मूर्तीचा ठावठिकाणा शोधू शकला नाही. सीताबाई जणू हवेत विरून गेल्यासारख्या नाहीशा झाल्या. त्या वाड्यात रामाची मूर्ती कुठे आहे ? तो वाडा कसा शापमुक्त होईल ? हे सर्व रहस्य राजारामांनी लिहून सीताबाईंबरोबर दिले होते. जर त्यांनी मुलाला जन्म दिला असेल तर एक ना एक दिवस येऊन आमच्या पिढीतले कोणीतरी या वाड्याला त्या भयानक शापातून मुक्त करेल.

सुमनताईंपुढे बसलेले कुलकर्णी मान खाली घालून सांगत होते. सुमनताई मंगलला वाचवायला पुढे जात असताना अचानक मागून कुलकर्णी आले होते. त्यांनी आरशापुढे बसलेल्या पर्वतीवर रामाचा अंगारा टाकला होता. पार्वती किंचाळून नाहीशी झाली. सुमनताई मंगलला उचलून घरी घेऊन आल्या. त्यांच्याबरोबर कुल्कर्णीही आले आणि त्यांनी सर्व कथा सुमनताई आणि शशिकांत रावांना सांगितली होती 

त्यांनी तातडीने कुटुंब महाडमध्ये हलवले. शशिकांतरावांचे मित्र राहत असलेल्या चाळीत जागा रिकामी झाली होती भाडेही कमी होते. मग शशिकांराव आणि सुमनताई राहिलेले भाडे द्यायला कुलकर्णींकडे आले. दारातच थांबले त्यांना वाड्यात जायचीही इच्छा नव्हती. तिकडेच त्यांनी मालकांना हाक मरून बोलावले.  तेंव्हा त्यांनी विचारले," जर तुम्ही म्हणता कि तुमच्या कुळातले सर्वचजण मरून गेले. सीताबाई आणि त्यांच्या मुलाचा पत्ता लागला नाही. हो ना ? मग तुम्ही कोण आहात? आणि या वाड्यात तांबे, दामले हि कुटुंबे कशी राहतात?" तुम्हाला अजून कळलं  नाही ? या वाड्यातील एकही माणूस जिवंत नाही. पार्वती आणि महंत स्वतःला त्या वाड्याचे मालक समजतात म्हणून ते इथे कोणालाही टिकून देत नाहीत.  मी राघव. राजारामांचा भाऊ. मलाही त्या महंतने मारले. माझा आत्मा या वाड्यातच भटकत आहे. महंतने एक अघोरी यज्ञ आरंभला. त्यात चूक झाल्यामुळे त्याचे सर्व कुटुंब त्याला बळी गेले आणि या वाड्यात आमच्याबरोबर कैद होऊन पडले. आमच्यात फक्त राजाराम दादाला मुक्ती मिळाली. मंगलसाठी वापरलेला अंगारही मला देव्हाऱ्यात सापडला ज्यामुळे मी महंत आणि पार्वतीच्या आत्म्याला दूर ठेऊ शकतो.  तांबे आणि दामले कुटुंब एके काळी या वाड्यात राहत होते. त्यांनाही पार्वतीने मारले. फक्त तुम्ही श्रीरामाची पूजा करून रामरक्षा म्हणत होता त्यामुळे तुम्हाला कोणीच काही करू शकले नाही. जेंव्हा या वाड्याचा वारस येऊन प्रभू श्रीरामांची मूर्ती तिच्या जागेवर ठेवेल आणि तिची पूजा करेल तेंव्हा आम्ही सर्व या बंधनातून मुक्त होऊ आणि आम्हाला मुक्ती मिळेल." सुमनताईंच्या अंगावर सरसरून काटा आला. त्यांना आपल्या नवऱ्यामागे दिसणारी १२ फुटी आकृती आठवली. तो नक्कीच महंत असणार. ज्या रस्त्यावर सुमनताईंना महंत दिसला तोही एकेकाळी वाद्याचाच भाग होता. देवाच्या कृपने आपण या संकटातून सुटलो. असं बोलत ते दोघं आपल्या नवीन जागेत निघून गेले. 

आणि तो वाडा राहिला तसाच आपल्या वारसाची वाट पाहत ...........................

 क्रमशः 

त्या वाड्याचा वारस येईल का ? सीताबाई वाचल्या का ? काय झालं पुढे ? वाडा शापमुक्त होईल का ? वाचा पुढील भागात            .                                                     

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to एक वाडा झपाटलेला


नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

स्वानुभव आधारित भुतांच्या कथा

काही वाचकांनी आपले अनुभव आम्हाला पाठवले आहेत. आम्ही नावे,स्थळे इत्यादी बदलून त्याचे शब्दांत वर्णन केले आहे.

भुतांचे स्वानुभव (Horror Experiences)

भुतांचे स्वानुभव. Real horror experiences in marathi that were sent to us by our readers.

एक वाडा झपाटलेला

झपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इतिहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.

अकल्पित

ही एक भयकथा आहे. या कथेमध्ये निशा, रीमा, रजत, जयराम सरपोतदार, गुरुजी अशी पात्रे आहेत. ही कथा रीमा आणि निशा ह्या मैत्रिणींकडून सुरु होते. रीमाला एका अमानवी शक्तीने झपाटलेले असते. तिला ह्या संकटातून तिची मैत्रीण निशा कशी सोडवते व या कार्यामध्ये तिला रजत आणि गुरुजी कसे मदत करतात ? हे ही कथा वाचल्यावर नक्की कळेल. मी लिहिलेल्या इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:- https://preetisawantdalvi.blogspot.com/