१९५६-५७ चा सुमार असेल. शशिकांत प्रधान आणि सुमन प्रधान हे जोडपं आपल्या ५ मुलांसोबत निजामपूरला राहत होतं. त्यावेळी आजच्या मनानी खूपच स्वस्ताई होती.तरीही  घरातल्या इतक्या माणसांची पोटं भरणं खूप कठीण जात होतं. एक तर ST  मधली तुटपुंज्या पगाराची नोकरी. त्यात घरात खाणारी ते स्वतः धरून ७ माणसं. तशी सुमन  गुणी आणि कष्टाळू होती.  ती मुलांना सांभाळून चार घरच्या स्वयंपाकाचं काम करत होती. घरातली कामही रेटत होती. घर सांभाळून इतकंच ती करू शकत होती. शशिकांतच्या मनात यायचं निदान रोह्यात बदली झाली तर बरं होईल. आपल्या गावात राहू तसंच मुलांच्या शाळेचीही चांगली सोय होईल. त्यांच्या अनेक ठिकाणी बदल्या होत असत. मग एकदा त्यांची बदली विसापूर या कोकणातल्या खेड्यात झाली. तिथे नुकतीच बस सेवा सुरु झाली होती. जवळच महाड गाव होते. महाड बऱ्यापैकी मोठे शहर होते. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय होणार होती. मग ते विसापूरला आले. त्यांची राहायची सोय एका मोठ्या पडक्या वाड्यात केली होती. वाड्याचा जो भाग चांगला होता. तिथे ३ कुटुंबे राहत होती. त्यातले एक सोडून गेले, त्यांच्याजागी प्रधान कुटुंबीय राहायला  आले. त्यांना बदल्यांची सवय असल्यामुळे ,त्यांना काही फरक पडला नाही एका दिवसात सामान लावूनसुद्धा झाले. 

मुलांना शाळेत दाखल केले. छोटा विजू मात्र अजून छोटाच होता. त्याला शाळेत दाखल करायला वेळ होता. आल्या-आल्या सुमनताईंनी बनवलेले पापड, कुरडया, मसाले विकायचे ठरवले. वाड्याच्या मालकांच्या परवानगीने तसा फलक दाराबाहेर लावला. तो भाग फार वर्दळीचा नसला, तरी जे लोक घेऊन जातील ते जाहिरात करणार होते. सुमनताईंच्या हाताला चव होती. तसेच महाड मध्ये शिक्षणासाठी बाहेरून मुले येऊन रहात. शहरात जागा परवडत नाही म्हणून विसापूर मध्ये रहात होती. मग अशा मुलांना डबे द्यायची कल्पना त्यांना आली. त्यांनी नवऱ्याजवळ विषय काढला. त्यांनीही हसत परवानगी दिली. मग सुमनताईंनी वाड्याच्या आवारात भाजी लावायला सुरवात केली. एक एक करत  चांगली पाच मुले मिळाली, जी रोज त्यांच्याकडून डबा घेऊन जायची. या सर्व गडबडीत उरलेल्या तीन कुटुंबांशी बोलायला त्यांना वेळच मिळत नसे. एक तांबे आजी आजोबा त्यांच्या शेजारीच रहात होते. दुसरे दामले आणि तिसरे स्वतः मालक कुलकर्णी. आल्या आल्या सुमनताईंना तांबे आजीनी खूप मदत केली.   तांबे आजी स्वभावाने खूप प्रेमळ होत्या. सगळ्या मुलांना त्यांचा खूपच लळा लागला. त्यात छोट्या विजूला तर त्या खूपच आवडल्या. तो दिवसभर त्यांच्याकडेच असायचा.  मालक मात्र सगळ्यातून अलिप्त असायचे ते कोणाशीही बोलायचे नाहीत. त्या वाड्यातच राहून ते या कुटुंबापासून दूर असायचे. शशिकांत कामावर गेले कि त्यांचा यायचा भरवसा नसायचा. कधी कधी दोन दोन दिवसही येत नसत. सुमन ताई आपल्या मुलांच्या आधारावर दिवस काढत असत. त्या जेंव्हा गावात जायच्या तेंव्हा सहज चौकशीत त्या कुठे राहतात असं विचारल्यावर कुलकर्णी यांचा वाडा ऐकताच अनेकांचे डोळे विस्फारत. काय झाले हे विचारताच ते काहीच बोलत नसत. "तुम्ही बाहेरून आला होय ना ? अहो ! ते बाहेरच्यांनाच त्या खोल्या देणार. " असे उद्गार लोकांच्या तोंडून येत. पण त्या व्यतिरिक्त काही नाही. अर्धा गाव कुलकर्णी यांच्या मालकीचा होता. सगळे त्यांचे मिंधे कोण बोलणार ? मग ताईंनी तांबे आजींना विचारलं असता त्या म्हणाल्या," अगं पोरी ! जाऊ दे लोकांकडे कशाला लक्ष देतेस ? ते काहीही बोलतात. आपण दुर्लक्ष करावं." पण दुर्लक्ष कारण्याइतक्या गोष्टी साध्या नव्हत्या. ताईंनाही घरात कोणीतरी वावरत असल्याचे भास होत होते.     त्यांच्या वाड्यामागे एक ओसाड जमीन होती. गावातले लोक जवळचा रास्ता म्हणून त्याचा वापर करत असत. शशिकांतरावसुद्धा त्याच रस्त्यानी येत,जात  असत.  ताई राहत असलेल्या बाजूच्या खिडकीतून तो रस्ता दिसत असे.  रात्रपाळीला जाताना छोट्या विजूला घेऊन त्या खिडकीत उभ्या राहायच्या. पहिल्याच रात्री त्या विजूला बाबा कामावर जाताना दाखवत होत्या तेंव्हा त्यांना शशिकांतरावांच्या मागे एक उंचच उंच माणूस साधारण १२ फुटाचा जाताना दिसला. त्या दचकल्या," हा काय प्रकार ? देवा रे!" शशिकांतरावांनी मागे वळून हात केला. बहुतेक त्यांना काहीच दिसलं नाही. त्या रात्री ताईंच्या डोळ्याला डोळा लागला नाही. मग त्यांना घरातही असे प्रकार जाणवू लागले. पडल्या जागेवरून कंदिलाच्या उजेडात टोपलीतले कांदे-बटाटे रांगेत छपरावर चालताना दिसू लागले, घरात मोठाले कुत्र्याएवढे उंदीर दिसू लागले, तसंच कधी कधी आरशासमोर एक लांब केसवाली बाई पाठमोरी बसून केस विंचरताना दिसू लागली. या सर्व प्रकारांनी त्या पुरत्या घाबरल्या.  परंतु या गोष्टी त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणालाही जाणवत नसत. म्हणून आपल्याला भास होत आहेत असे समजून त्या गप्प होत्या. उगाच मुलांना घाबरवण्यात काहीच अर्थ नव्हता. तसंच त्यांना परिस्थितीची जाणीवही होती. आपण जरी इथे नाही राहायचं म्हटलं तरी कुठे जाणार? जास्तीचं भाडं त्यांना परवडणारच नव्हतं.  

ताईंची काळजी वाढली जेंव्हा त्यांच्या ३ नंबरच्या मुलीनी मंगलनी त्यांना सांगितलं कि तिला सकाळी  आरशासमोर केस विचारणारी बाई दिसली. तिचे केस पायापर्यंत लांब होते. तिनी कपाळावर मोठे कुंकू लावले होते. दोन दिवस मंगल तापाने फणफणत होती. ताईंनी तिला काढा करून दिला. ताई एकविरा आईच्या भक्त होत्या. त्यांची एकवीरेवर फार श्रद्धा होती. त्यांनी एकवीरेचं नाव घेऊन मंगल ला अंगारा लावला. तसेच रोज तिन्हीसांजेला रामरक्षा म्हणून त्यांनी दारात अंगाऱ्याची रेखा ओढायला सुरवात केली. हा उपाय त्यांना त्यांच्या आईनी सांगितलं होता. त्यामुळे थोडाफार फरक पडला. मंगल ला आराम पडला. मात्र तेंव्हापासून ती अचानक कुलकर्णी जे त्यांचे मालक होते त्यांची लाडकी झाली. तिचे त्यांच्याकडे येणे जाणे वाढले.    

मग उडत उडत सुमनताईंच्या कानावर आलं कि हा वाडा भुताटकीचा म्हणून सर्व गावात प्रसिद्ध आहे.  एक दिवस गिरणीत गेल्या असताना एक बाई भेटल्या. सुमनताई त्यांच्याकडे पाहून हसल्या.  बऱ्याच वेळा गिरणीत दोघी एकमेकींना पाहत असत. नाव माहित नव्हते तरी चेहेरा ओळखीचा झाला होता. त्या म्हणाल्या, "मी रमाबाई , मी तुम्हाला खूप वेळा बघते. तुम्ही त्या कुलकर्णींच्या वाड्यात राहायला आलात ना?" " हो ! सहा महिने झाले." सुमनताई म्हणाल्या." बापरे ! सहा महिने ? कशा राहिलात त्या पडक्या वाड्यात एकट्या. एक तर इतका मोठा वाडा आणि त्यात कोणी राहणार नाही. तुमचे यजमान ST  मध्ये आहेत ना ? रात्री - अपरात्रीच्या पाळ्या असणार. मग कशा हो राहता मुलांना घेऊन?" रमाबाई आश्चर्याने म्हणाल्या. " अहो एकटी कुठे शेजारी तांबे आजी - आजोबा आहेत ना ! त्यांची छान सोबत होते." सुमनताई हसत म्हणाल्या. बहुतेक तांबे कुटुंबाबद्दल रमाबाईंना माहित नसावं त्यांच्या मनात आलं. इतकं छोटं गाव आणि त्यातली माणसं एकमेकांना ओळखत नसतील असं कसं होईल? जाऊ दे आपल्याला काय करायचंय असा विचार करत त्या घरी आल्या. आल्या आल्या भूषण नि तक्रार केली कि मंगल परत मालकांकडे गेलीय. 

खूप वेळ झाला तरी आली नाही." इतकं काय वाढून ठेवलंय तिकडे?" असा विचार करत सुमनताई मालक राहत असलेल्या भागात आल्या. हा भाग मध्ये भिंत घालून इतर भाडेकऱ्यांपासून वेगळा केला होता. पलीकडचं काहीच दिसत नव्हतं. भिंतीला मध्ये एक दार होतं. त्यातून मालक येत  असत तेही महिन्यातून एकदा भाडं वसूल करायला. इतर वेळी ते दार त्यांच्या बाजूने बंद असायचं.   आज नेमकं ते लोटलेले होते. कदाचित मंगल गेली म्हणून असेल. सुमनताई पहिल्यांदाच त्या बाजूला जात होत्या. दारातून पलीकडे पाऊल टाकताच त्यांना काहीतरी वेगळेपणाची जाणीव झाली. वाड्याच्या आसपास मोठे वृक्ष असून त्यावर एकही पक्षाचा आवाज येत नव्हता. एखादी  जागा वर्षानुवर्षे बंद असल्यावर कशी जाणीव होते, तसे त्यांना वाटले. इकडे इतकं रमण्यासारखं काय आहे ? त्यांच्या मनात आलं. अजूनही एक भावना त्यांच्या मनात दाटत होती ती म्हणजे अनामिक भीतीची. त्यांच्या सर्व मुलांमध्ये मंगल भोळी होती. कोणाच्याही बोलण्याला ती फसत असे. मालकांबरोबर कोणी राहतं का ? असा प्रश्न त्यांनी तांबे आजींना केला असता. " बहुतेक त्यांची बहीण असते त्यांच्या बरोबर. नक्की माहित नाही.", असे त्या म्हणाल्या होत्या.   गावातून उडत उडत जे कानावर आलं तेही इतकं भयानक होतं कि ऐकून सुमनताईंच्या अंगाचा थरकाप होत होता. बरं नवऱ्याशी बोलायची सोय नाही. त्यांचा या ऐकीव गोष्टींवर कधीच विश्वास बसणार नाही हे त्या जाणून होत्या. त्यांच्याकडे डबा घ्यायला एक मुलगा यायचा सिद्धेश त्याचं नाव. तो नेहमी वाड्याच्या दारातून आवाज द्यायचा आणि डबा घेऊन जायचा. संध्याकाळी मुलांपैकी कोणालातरी बोलावून हातात द्यायचा. एक दिवस सुमनताई डबा द्यायला दारात गेल्या होत्या, त्यांनी विचारलं," अरे! तू आत का येत नाहीस? " तो आधी टाळत होता, मग म्हणाला," बाई ! या वाड्याबद्दल गावात अनेक गोष्टी सांगितल्या जातात. या वाड्यात राहणारे लोक जिवंतपणी हा वाडा सोडू शकत नाहीत.इथे भुताटकी आहे. इथे कितीतरी बायका मेलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची प्रेतं कोणालाही दिसली नाहीत. असं म्हणतात कि या वाड्यात गेलेल्या स्त्रीवर मृत्यूनंतरचे दाह संस्कार झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मा इकडेच भटकत राहिला आहे. अशा अनेक अफवा मी ऐकल्या आहेत." " अरे ! अफवा म्हणतोस ना ? मग त्यातच आलं सगळं. लोक काहीही बोलतात. त्यावर आपण विश्वास ठेऊ नये. मालकांकडे या गावातल्या लोकांच्या जमिनी गहाण आहेत म्हणून लोक त्यांचा राग करतात झालं." सुमनताई त्याला हसत बोलल्या. तरीही त्याची भीती कधी कमी  झालीच नाही.    

तो कधी वाड्याच्या आत आलाच नाही. हा सगळा विचार काही सेकंदात सुमनताईंच्या मनात चमकून गेला. एकीकडे त्या समोरच्या वाड्याच्या भागाचं निरीक्षण करत होत्या आणि एकीकडे मंगल ला हाक मारत होत्या. समोरचा भाग बघून तिथे कोणी राहत असेल असं वाटत नव्हतं. आवारात झाडांच्या पानांचा नुसता खच पडला होता.सुमनताई दारात आल्या. दार वाजवलं. कोणीच प्रत्यूत्तर दिलं नाही.आता मात्र त्या घाबरल्या. सगळे शिष्ठाचार सोडून त्या जोरजोरात मंगलच्या नावानी हाक मारू लागल्या.   त्यांनी दार जोरात ढकललं. दार मोठा आवाज करत आतल्या बाजूनी उघडलं. सुमनताईंनी आत पाय टाकला. त्यांच्या काय मनात आलं कोणास ठाऊक मग परत मागे जाऊन त्यांनी. काडी ओढून ठेवली. ना जाणो दार बंद केलंच तर ! ते कोण बंद करेल हि कल्पनाच त्यांना करवत नव्हती. मग त्यांनी घरात शोधायला सुरवात केली. एकेकाळी मालक खूप श्रीमंत असले पाहिजेत. घरातल्या उंची फर्निचर वरून त्याची कल्पना येत होती. परंतु त्याची नीट काळजी घेतली गेली नव्हती. त्या एका मोठ्या दिवाणखान्यात होत्या. समोरच स्वयंपाकघर दिसत होते. त्या तिकडे गेल्या. मागच्या दाराबाहेर विहीर होती आणि त्यापलीकडे तो रस्ता दिसत होता जो सुमनताईंच्या घरातून दिसत होता. इतक्यात त्यांना वरच्या मजल्यावरून एका बाईच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. त्या दचकल्याच. इतकं विचित्र हसणं ज्यानी त्यांच्या अंगावर  सरसरून काटा आला. आल्या पावली परत जावंस वाटत होतं. पण मंगल याच वाड्यात होती. तिला घेतल्याशिवाय जायचं नाही , हा त्यांनी निश्चय केला होतं. एकविरा आईचं नाव घेत त्या पायऱ्या चढू लागल्या. प्रत्येक पाऊल नेट देऊन रेटावं लागत होतं. वरच्या मजल्यावर कमी खोल्या होत्या. फक्त चार. त्यातल्या एका खोलीतून आवाज आला होता. मोठा धीर करून त्यांनी समोर दिसणारं दार ढकललं. ती मालकांची खोली दिसत होती. समोर एका खुंटीवर कोट लटकला होता. खाली चपला होत्या आणि ती खोली रिकामी होती. चार पैकी तीन खोल्या रिकाम्या होत्या. आता एकच खोली राहिली होती. त्या दाराला हात लावणार इतक्यात परत तो घाणेरडा हसल्याचा आवाज आला." याच खोलीत मंगल आहे", सुमनताईंनी मनाचा हिय्या करून दार ढकलल आणि समोर एका आरशासमोर एक बाई पाठमोरी केस विंचरत बसली होती. तिचे केस जमिनीपर्यंत लोळत होते , तिचं समोरच्या आरशात प्रतिबिंब बिलकुल दिसत नव्हतं आणि तिच्याकडे एकटक पाहत जवळच मंगल बसली होती.

 

                                                                                                                                    

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to एक वाडा झपाटलेला


नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

भुतांचे स्वानुभव (Horror Experiences)

भुतांचे स्वानुभव. Real horror experiences in marathi that were sent to us by our readers.

स्वानुभव आधारित भुतांच्या कथा

काही वाचकांनी आपले अनुभव आम्हाला पाठवले आहेत. आम्ही नावे,स्थळे इत्यादी बदलून त्याचे शब्दांत वर्णन केले आहे.

एक वाडा झपाटलेला

झपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इतिहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.

अकल्पित

ही एक भयकथा आहे. या कथेमध्ये निशा, रीमा, रजत, जयराम सरपोतदार, गुरुजी अशी पात्रे आहेत. ही कथा रीमा आणि निशा ह्या मैत्रिणींकडून सुरु होते. रीमाला एका अमानवी शक्तीने झपाटलेले असते. तिला ह्या संकटातून तिची मैत्रीण निशा कशी सोडवते व या कार्यामध्ये तिला रजत आणि गुरुजी कसे मदत करतात ? हे ही कथा वाचल्यावर नक्की कळेल. मी लिहिलेल्या इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:- https://preetisawantdalvi.blogspot.com/