शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

योगीराज संत सोहिरोबानाथ...

Author:संकलित

योगीराज संत सोहिरोबानाथ... नाथांचे मूळ आडनाव संझगिरी होय. तथापि कुठ्ठाळीहून स्थलांतरित झालेले हे कुटुंब जेव्हा सावंतवाडी संस्थानातील पेडणे महालातील पालये गावात स्थिरावले तेव्हा घराभोवतालच्या आम्रराजीमुळे त्यांना ‘आंबिये’ हे गोड उपनाव मिळाले. नाथांचा जन्म एका मंगळवारी इ. स. १७१४ मध्ये पालये गावात झाला. नाव अच्युत ठेवण्यात आले. पूर्वजन्मी योग पूर्ण न झाल्यास पुन्हा जन्म घ्यावा लागतो. व आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो. नाथांच्या बाबतीत तसेच घडले. योग्यांची साक्षात लक्षणे घेऊनच हे अलौकिक बालक जन्माला आले. प्राथमिक शाळेचे शिक्षण पूर्ण झाले. नजीकच्या केरी गावातील जिवबादादा बक्षी केरकर नाथांचे सहाध्यायी होते. वडीलांमागून पेडणे, साखळी, डिचोली या भागाचे कुलकर्णीपद उत्तम रीतीने सांभाळले. दोन मुलगे झाले – एक अनंत व दुसरा शंकर. नंतर सोहिरोबा बांदे येथे राहू लागले. नाथांचा बराच वेळ देवपूजा, धर्मग्रंथांचे वाचन व काही पदरचना यात जाऊ लागला. पूर्वजन्मीची योगसाधना, या जन्मीची भक्ती साधना यांच्या समागमाने हळूहळू असामान्याकडे त्यांची वाटचाल होऊ लागली. संतत्व उदयास येऊ लागले. काही सिद्धीही त्यांच्यापुढे सेवेस सिद्ध झाल्या. सावंतवाडी संस्थानच्या गादीवर त्यावेळी तीसरे खेमसावंत हे पराक्रमी व सात्विक राजे राज्य करीत होते. तथापि त्यांचे चुलते सोम सावंत ऊर्फ आबा सावंत यांचे प्रस्थ अधिक होते. ते मद्य पीत व छळकर्ते असल्याने सर्वांना त्रस्त करून सोडत. सोहिरोबांची कीर्ती त्यांच्या कानावर आली होती. त्यांनी नाथांना देत दाखवायला सांगितला. क्षणभर डोळे मिटून नाथांनी प्रार्थना केली. आत्मतेजाचा साक्षात्कार झाला. नाथ उत्तरले, ‘‘महाराज, तो पहा देव’’ वाड्याच्या भिंतीतून अग्निज्वाला प्रकट झाली व पुढे आबासाहेबांनी दारूच्या पिंपावर बसून आग लावून आत्महत्या केली. ऐन उन्हाळ्याचे दिवस होते. सोहिरोबा देवपूजेत मग्न होते. एवढ्यात सावंतवाडीहून राजेसाहेबांचे तातडीचे निमंत्रण घेऊन एक घोडेस्वार आला. मातेने दिलेला रसाळ फणस घेऊन नाथ सावंतवाडी संस्थानाकडे पायी निघाले. नाथ इन्सुली येथे आले असता त्यांनी वडाच्या झाडाखाली एक भला मोठा पाषाण पाहिला. नाथांनी फणस फोडला. परमेश्‍वराला हात जोडले. आता गरे खाणार एवढ्यात त्या वनातून स्पष्ट आवाज झाला. ‘बाबू हमको कुछ देता है?’ साक्षात गहिनीनाथ अवतरले. त्यांनी पाच गरे सोहिरोबांच्या हाती दिले. मस्तकावर हात ठेवून सांगितले, ‘‘मी गहिनीनाथ, गैबीनाथ. तुझे वैराग्य पाहून संतुष्ट झालो. तू यापुढे अच्युत आंबिये नव्हेस, तू सोहिरोबा सोऽहं मंत्राचा जप कर, अमर होशील.’’ आकृती अदृश्य झाली. हा गहिनानाथांचा साक्षात्कार नाथांच्या जीवनातील परिवर्तन बिंदु ठरला. आत्मानुभव प्राप्त झाला. राजीनाम्याच्या निश्‍चयाने नाथ पावले टाकू लागले. विरवत मनाने नाथ सावंतवाडीच्या दरबारी पोचले. कुलकर्णीपदाचा राजीनामा तसेच लेखणीलाही कायमची रजा दिली. नाथांच्या मुखातून जी वाणी बाहेर पडे ती छंदोबद्ध होऊन अंत:स्फूर्तीने अनेक पदे मुखावाटे निर्माण होऊ लागली. आज जी नाथांची शेकडो पदे आहेत ती नाथांच्या भगिनीने लिहून घेतलेली आहेत. आंबिये यांचे घर म्हणजे परमार्थाची उतारपेठ बनली. नाथांची पदे लिहून काढल्यामुळे या भगिनीचे महाराष्ट्र सारस्वतांवर अनंत उपकार आहेत. गुरुकृपेमुळे व शब्दज्ञान प्राविण्यामुळे आत्मप्रचीतीचे पारमार्थिक ग्रंथ नाथांनी लिहीले अर्थात लेखिका होती त्यांची भगिनी. १) सिद्धांतसंहिता २) महदनुभवेश्‍वरी ३) अद्वयानंद ४) पूर्णाक्षरी ५) अक्षयबोध. याशिवाय अनेक प्रकारची हिंदी पदरचना. नाथपंथी साधू गृहस्थाश्रमी असता तरी घरकुलात रमणार नाही. नाथांनी गृहत्याग करण्याचे ठरविले. सावंतवाडी संस्थानही हद्द मागे पडली. आंबोली घाटातून नाथ करवीर क्षेत्री आले. अंबामातेच्या सेवेमध्ये काही दिवस घालविले. पुढे पंढरपुरात तर साक्षात पांडुरंग त्यांच्या भेटीस वीट सोडून आला. ‘‘पांडुरंग मुकुटी जडला हिरा तेणे किरीट दिसे साजिरा’’ असे राजाराम प्रासादीचे उद्गार आहेत. यापुढे अक्कलकोट हे स्थान नाथांनी पवित्र केले. तेथे मठस्थापना करून काही शिष्यमंडळीस नाथपथांची दीक्षा दिली. तेथून मजल – दरमजल करीत नाथ सुरतेस पोचले. सुरत येथेही नाथांनी मठस्थापना केली. शिष्यवर्गाला आत्मस्वरूपाची ओळख करून दिली. नाथ आता सिद्धच बनले होते. एका मुक्कामी ते आत्मचिंतनात निमग्न असता एक पांथस्थ खट्याळपणे गुडगुडी ओढून नाथांच्या तोंडावर धुर सोडू लागला. शेवटी तो गृहस्थच शरण आला. ‘तुम अच्छा हुक्का पीना’ हे योगमार्गाचा उपदेश भरलेले पद म्हटले. पांथस्थाला तत्काळ योगमार्गाचे तंत्र अवगत झाले. नाथपंथी योग्यांना साधनेसाठी गिरनारपर्वत, अबूचा पहाड ही स्थाने अत्यंत अनुकूल. सोहिरोबानाथांनी तपस्येसाठी हेच स्थान पसंत केले. गैबीनाथ गुरुंनी दिलेल्या सोऽहंचा अखंड जप करीत बराच काळ या पहाडावर घालविल्यानंतर सर्व सिद्धी नाथांना प्राप्त झाल्या. पण या सिद्धीत गुंतून पडण्याइतके नाथ कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांनी अखंड समाधित राहून परमानंद प्राप्त करून घ्यावा व आत्मस्वरूपाच्या प्रकाशात तृप्त व्हावे हाच ध्यास घेतला होता. साधना पूर्ण झाली होती. असेच एकदा सोहिरोबानाथ तीर्थनासाठी संचार करीत असता त्यांना उज्जयिनीच्या परिसरात एक शिवालय दिसले. निर्जन व एकांतात नाथ केव्हाच समाधी अवस्थेत गेले. एकांतवास हा अशा पुण्यकर्माबरोबरच पापकर्मालाही पोषक असतो. अशाच पापाचरणासाठी विठ्ठलपंत व चंपा अशा दोन व्यक्तींनी तेथे प्रवेश केला. कामक्रीडेला अगदी सुयोग्य असे स्थान पाहुन त्या जोडप्याला भानच राहिले नाही. कामचेष्टांना प्रारंभ झाला. चंपेचे लक्ष धर्मशाळेच्या कोपर्‍यात बसलेल्या नाथांकडे गेले. ‘कामातुराणां न भय न लज्जा|’ ते दोघे नाथांजवळ आले व त्यांना जवळच्या आडात फेकून दिले व कामसुखात दंग झाले. सकाळ उजाडली. शिवदर्शनासाठी भाविक येऊ लागले. पण जो तो आश्‍चर्यभरीत होऊ लागला. कारण विहिरीतून भजनाचे सुर ऐकू येऊ लागले. सर्वजण आत पाहतात तर सोहिरोबानाथ पाण्यावरच आसनमांडी घालून आनंदाने भजन गात आहेत. लोकांनी त्यांना विहिरीबाहेर काढले. विठ्ठलपंताने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. उदारहृदय नाथांनी त्यांना क्षमा केली. एवढेच नव्हे तर पाच पदांतून उपदेश केला. विठ्ठलपंताने चंपा संबंध टाकला. तो शुद्धचरित होऊन नाथांचा परमशिष्य बनला. वर वर्णिलेला जलतरणाचा प्रसंग उज्जयिनीच्या आजूबाजूलाही विदित होऊन सोहिरोबांचे नाव सर्वत्र होण्यास कारणीभूत झाला. कोणी कोकणचा साधू आपल्या राज्यात आला आहे असे सरदार महादजी शिंदे यांचे सेनापती जिवबादादा बक्षी केरकर यांचे कानी आले. त्यांची व नाथांची भेट झाली. जिवबादादांनी नाथांना शिंदे सरकारांच्या दरबारी यावे असा आग्रह धरला. अत्याग्रहपूर्वक पालखी पाठवून जिवबांनी नाथांना दरबारात आणविले. त्यांचे दरबारात आगमन होताच सर्वांनी त्यांना उत्थापन दिले व आसनावर बसवून त्यांच्यासमोर सोन्यारूप्याची तबके ठेवून त्यांचा सत्कार केला. महादजी जसे समरशेरजंग म्हणून रणांगणावर प्रसिद्ध होते तसेच काव्यरसादिकातही रस घेणारे होते. जिबवांनी महाराजांनी लिहिलेली काव्यरचना नाथांच्या हाती दिली. नाथांनी त्यांच्या कवितेवरून नजर फिरविली. नाथ म्हणाले, ‘‘अरे, ही कसली भिकारडी कविता, यात ईश्‍वराचे नावही नाही,’’ असे म्हणून त्यांनी वही भिरकावून दिली. त्याबरोबर समशेर उगारून महाराज नाथांना मारावयास गेले. पण नि:स्पृह नाथांना त्यांची भीती वाटली नाही. उलट समोरच्या त्या तबकांवर लाथ मारून नाथ म्हणाले, ‘‘अवधूत, नही गरज तेरी हम बेपर्वा फकीरी| सोना चांदी हमको नही चाहिए| हम अलख भुवन के बासी|’’ नाथांची नि:स्पृह वृत्ती पाहून महादजींची ऐहिक वैभवाची अहंता दूर झाली. पुढे तर त्यांनी नाथांना आपल्या राज्यातील उज्जयिनी क्षेत्रात क्षिप्रा नदीच्या तीरावर एक मठही बांधून दिला. ‘श्रीनाथ’ अशी राजमुद्राही बनविली. या हिंदी प्रांतात वास्तव्य झाल्यानंतर नाथांच्या मुखातून हिंदी काव्यही निर्माण झाले. गुरुकृपेमुळे भाषांची बंधनेही दूर होतात ती अशी. सोहिरोबांच्या उज्जयिनी येथील मठात सगुण निर्गुण भक्तीचा मिलाप झाला होता. एकदा रामनवमीचा उत्सव होता. दुपारी रामजन्माचा सोहळा झाला. पुष्पेगुलाल उधळून श्रीराम जन्म झाला. उत्सवाची वर्दळ संपली. शिष्यवर्ग झोपी गेला. नाथांनी नित्याप्रमाणे ध्यान धारणा सुरू केली. ‘या निशा सर्वभूतानां’ या उक्तीप्रमाणे अखंड जागृती नाथ भोगत होते. एकाएकी नाथांच्या खोलीत लख्ख प्रकाश दिसला. लगेच तीन आकृत्याही दिसू लागल्या; मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंदरनाथ! नाथत्रयांनी सोहिरोबांना साक्षात दर्शन देऊन आदेश दिला. ‘तुझे येथील कार्य संपले आहे. आमच्या समवेत चल.’ या आदेशाने नाथ निर्वाणास सिद्ध झाले. नाथचतुष्टय सदेह चालू लागले. गमन ग्रामाचा पत्ता नव्हता. अंतिम निर्गुणात स्वरूपे हरवू लागली. दुसरे दिवशी शोधाशोध, धावाधाव सुरू झाली. मठात नाथ नव्हते. सर्वत्र शोध करूनही ते सापडले नाहीत. मात्र नाथांच्या अंथरूणाखाली एक पद सापडले. ‘दिसणे हे सरले…’ अशा प्रकारे नाथ इ. स. १७९२ च्या रामनवमी दिवशी सदेश अर्ंतधान पावले. येत्या गुरुप्रतिपदेपासून ते पुढील वर्षीच्या गुरुप्रतिपदेपर्यंत त्रिशताब्दी वर्ष विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरे करावयाचे आहे. नाथांच्या पादुकांची प्रतिष्ठापना, बांदा, इन्सुली तसेच सावंतवाडी येथे नाथांच्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा, तसेच भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, पारायण, वक्तृत्व स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रम करण्याचा मानस आहे. १५ फेब्रुवारीचा जयंती उत्सव पालये, पेडणे येथे होणार आहे. - प्रसाद गजानन आंबिये, नाथवंशज, बांदा (सिंधुदुर्ग,सावंतवाडी)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.

Books related to शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha


जिन्न

आयेशा आणि हमीद चा ब्रेकअप हमीद साठी फार वेदनादायक ठरतो. पुण्यातून मुंबईत येताना हमीद च्या बॅग ची काही तर गडबड होते आणि हमीद इरफान आणि आयेशा ह्या तिघा मित्रांचे आयुष्य बदलून जाते. हि एक भयकथा आहे.

एक वाडा झपाटलेला

झपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इतिहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.

हॅलोविन

जॉन हा अमेरिकेच्या अनिस नावाच्या छोट्याशा खेड्यात राहत असे. असे म्हणत कि पूर्वी त्या भागात राहणाऱ्या संत अनिसच्या नावावरून या गावाला हे नाव दिले. त्या गावच्या चर्चमध्ये त्याचा मोठा फोटो होता. चर्चमधले फादर सगळ्यांना अंनिसला नमन करायला सांगायचे. पण गावातले जुने लोक अंनिसला सैतान मानायचे.

मॄत्योर्माअमॄतं गमय

"मॄत्योर्माअमॄतं गमय" is a thriller based in Goa of modern times.

रूम नंबर 9

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

प्लॅन्चेट

आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.

मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...

या सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही

क्रिष्णा आणि एक झपाटलेल रिसोर्ट

हासीम नागराळ लिखित कथा. Mobile no- 9960726559

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट : थरारकथा

कोणतंही स्पष्टीकरण न मिळणार्‍या अनेक चमत्कारीक घटना यापैकी प्रत्येक महासागरात घडतात. अनेक जहाजं आणि विमानं कोणताही मागमूस न ठेवता अनाकलनिय रित्या गायब होतात. प्रत्येक महासागराचा इतिहास अशा चमत्कृतीपूर्ण आणि गूढ प्रकारांनी भरलेला आहे! पाचही महासागरांतील सर्वात गूढ महासागर नेमका कुठला हे ठरवणं तसं कठीण असलं, तरी आर्क्टीक महासागरचा यात बराच वरचा क्रमांक लागेल हे निश्चित!

नारायण धारप Narayan Dharap

नारायण धारप हे मराठीतील एक अतिशय नामवंत भयकथा लेखक आहेत. ह्या पुस्तकांत आम्ही त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेऊ. Narayan Dharap is one of the most popular marathi horror story writer. This book is a detailed biography of Narayan Dharap, giving you insights about his writing style, his achievements and the works that inspired him.

दिल्लीतील १० भयावह जागा

आता आपण माहिती करून घेऊयात दिल्लीतील त्या १० जागांबद्दल, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते कि तिथे आजही भूत, आत्मा, किंवा काही अदृश्य शक्तींचा वास आहे. या ठिकाणांवर रात्रीच्या वेळी जाण्याची हिम्मत फार कमी लोक करू शकतात.