बाबाजार
Nimish Navneet Sonar Updated: 15 April 2021 07:30 IST

बाबाजार

एक अंतर्मुख करणारी आणि विचार करायला लावणारी कथा!

 

शनिवार संध्याकाळ. कामावरुन घरी परत येत होतो. बसमध्ये भयंकर गर्दी. मला सुरुवातीपासून बसायला जागा मिळाली नव्हती. थोडा प्रवास झाल्यानंतर बसमध्ये एके ठीकाणी बसायला जागा मिळाली. सकाळी विकत घेतलेले वर्तमानपत्र तसेच घडी केलेले बॅगमध्ये होते. सकाळी उभ्या उभ्या प्रवास केल्याने ते वाचायला मिळालेच नव्हते. बसल्यावर वाचायला घेतले. पण गर्दीमुळे नीट वाचता येईना. फक्त मुखपृष्ठावरच्या बातम्यांचे मथळे वाचून झाले आणि पेपर तसाच ठेवून दिला.

"अमुक राजकारण्याचे पितळ उघड" ,

"अमुक ठीकाणी पैशांचा गैरव्यवहार, आयकर विभागाचे छापे",

"महिलांवर अत्याचार",

"महागाई विरोधात विरोधी पक्षाचे आंदोलन, सत्ताधारी पक्षाचा लाठीमार".,

"महागाई भडकली, जनताही भडकली",

"अमुक आश्रमातल्या बाबांनी घेतला महिलेचा गैरफायदा. पोलिस त्याच्या शोधात",

"दप्तराच्या ओझ्यांखाली दबले बालपण" असे मथळे होते.

मनाला उमेद वाटेल आणि काहीतरी सकारात्मक घडते आहे असे वाटणारे त्यात काहीही नव्हते. कदाचीत संपादकीय पानावर अध्यात्म सदरात काहितरी प्रेरणादायी असेलही. पण त्या पानापर्यंत पोहोचू शकलो नाही.

बसमधले अबाल-वृद्धांचे चेहेरे काळजीने काळवंडलेले. कुणाच्याही चेहेर्‍यावर हास्याची लकेर नाही. समाधानाची सावली नाही. प्रत्येकाच्या मनात काळजी. घरी लवकर पोहोचण्याची! कंडक्टर सतत बसमध्ये चढणार्‍यांवर ओरडत होता. संध्याकाळ होती तरीही सुट्ट्या पैशांपायी होणारी भांडणं. प्रत्येकाच्या मनात काही ना काही चिंता, काळजी, ताण. रोजच्या जीवनातली माणुसकी, सौजन्य कधीच हरवलेले. एक मात्र नक्की की रोजच्या जगण्यात आपण माणुसकी, हास्यविनोद हे विसरलो आहोत. मनःशांती हरवून बसलो आहोत. स्टॉप आल्यावर उतरतांना अचानक दिसलेले दोन तीन ओळखीचे वयोवॄद्ध चेहेरे अ, ब आणि क यांच्याकडे बघून स्मितहास्य करून उतरलो.

रात्री टीव्ही वर त्याच त्या पेपरातल्या बातम्या. नंतर घरी सौ सोबत झालेल्या चर्चेत मी उद्या सकाळी लवकर उठून सहा वाजता आठवड्याच्या भाजीबाजारात जायचे असे ठरले.

रविवार सकाळ.थोड्या झोपाळलेल्या अवस्थेत पायी चालत बाजारात पोहेचलो. बाजारत पाकीट मागच्या खिशात न घेता, फक्त पैसे शर्टाच्या खिशात ठेवलेले. गर्दीत पाकीटमारही असतात.

उजवीकडे कांदे, लसूण यांचे मोठमोठाले पोते, नेहेमीचा वास ....

डावीकडे एकदम ताज्या भेंडींचा पर्वत!

एकजण ओरडत होता, "फ्लावर दहा रुप्प्ये! फ्लावर ध्धा रुप्प्ये!"

दुसरा, "एक्क्दम फ्रेश, फ्लावर, नौ रुप्प्ये, नौ रउप्प्ये!"

तर तिसरा, "कांदे, बट्टाट्टे, दहा रुपये किल्लो......"

"मेथी जुडी तीन रुपये" "आमचेकडे पाच रुपये"

"आंबे सातशे रुपये डझन" आंब्यांकडे गर्दी कमी.

एके ठीकाणचा संवादः "एक रुपाया सुट्टा द्या", "नाहियेत मावशी", "सुट्टॅ नाहीत. द्या त्या भाज्या इकडे. येतात सकाळी सकाळी कोठून कोठून शंभराच्या नोटा घेवून. फुकटात आमचा टाइम खातात"

एकजण सर्वात शेवटी बसला होता. त्याचेकडे भाज्यांचा दर्जा चांगला होता. पण त्याचेकडे गर्दी कमी दिसत होती. का? कुणास ठावूक?

धूळ, गोंधळ. दुचाकीवाल्यांचा पायी चालणार्‍यांवर अत्याचार. सगळीकडे गोंधळ, आवाज. प्रत्येक भाजीपला-व्यापार्‍याला लवकरात लवकर माल विकून जाण्याची घाई. रविवार ची सुट्टीची सकाळ असूनही ती प्रसन्न नव्हती. प्रत्येकाच्या मनात काही ना काही चिंता, काळजी, ताण. माणुसकी, सौजन्य कधीच हरवलेले. म्हटलं ना, रोजच्या जगण्यात आपण माणुसकी, हास्यविनोद हे विसरलो आहोत. मनःशांती हरवून बसलो आहोत.

घरी आल्यावर सौ ने दुध तापवायला घेतले होते. वर्तमानपत्र अजून आले नव्हते. टीव्ही लावला.

"त्तेरे लीये, घुमू दिवाना बन्के त्त्त्तेरे लिये..." विवेक हरवल्यासारखा तो ओबेरॉय बेंबीच्या देठापासून ओरडत होता. नंतर लक्षात आले की ते एक गाणे आहे.

"....आज ना उद्या आपण म्हातारे होणार. कधी ना कधी आयुष्य संपणार. पण आपले कर्म नेहेमी लोक लक्षात ठेवणार...." असे एका चॅनेलवर एक बाबा सांगत होते. "बाबांचा आश्रम-क्लबचे सदस्य व्हा. पाच हजार रु महीना"

"भीती ला दूर करा. भीती हा एक राक्षस आहे.... तो तुमच्या मानगुटीवर बसतो कारण तुम्ही त्याला बसू देता......" हे दुसर्‍या एका चॅनेलवर हे सुरू होते. कार्यक्रम संपल्यावर त्या बाबांची एक सीडी, पुस्तक असा संच एक हजार रुपयात घरपोच मिळणार होता. तशी जाहिरात येत होती.

".... स्त्री! एक शक्ती. पण आज तीच्यावर होणारे अत्याचार पाहाता....आज तीने संघटीत होवून अन्यायाला प्रतिकार करणाची गरज आहे...." माता करुणामयी सांगत होत्या......

"तुम्हाला जीवनातील करुणा दूर करायची असेल तर, हे पुस्तक घ्या " करूणामयी मला सांगत होती. सकाळ होती पण अंधार होता. तीच्या समोरच्या टोपलीत काही पुस्तके, सीडी, पडल्या होत्या. मी इकडे तिकडे पाहीले. आणि विविध बाबांनी मांडलेल्या बाजारात मी एकटाच होतो... सुन्न्न करणारा अंधार. ....आणि प्रत्येक ठीकाणी वेगवेगळे बाबा डोळे रोखून माझ्याकडे पाहात होते. ते डोळे मला बोलावत होते. ठीकठीकाणी पाट्या लावलेल्या होत्या,

"मनःशांती मिळवण्याचा हमखास उपाय आमचेकडे. आमचा कोर्स जॉईन करा."

"हास्य विनोदाने करा परिहार आपल्या चिंतेचा... रोजच्या समस्येवरचा एकच उपाय- हास्योपचार!"

सर्व बाबा दाढीवाले होते. गळ्यात माळा. हातात कमंडलू. काही बाबा ब्रशवर पेस्ट टाकून अजून दात घासत होते. काही कमंडलू च्या पाण्यातून गुळण्या करत होते. मला आश्चर्य वाटले ते या गोष्टीचे की, ती पेस्ट कोणत्या भारतीय जडी बुटी पासून बनवलेली नव्हती, तर ती होती इम्पोर्टेड....

मी त्याचेकडे बघताच त्याने ती पेस्ट लपवली आणि एक पेस्ट चे पोते बाहेर काढले. ती आयुर्वेदीक पेस्ट होती. म्हणाले,"ही पेस्ट वापरा. दुर्मिळ अशा पन्नास जडी बुटी एकत्र करून त्याचे चूर्ण करून बनवलीय. याने दात घासत जा....."

मी फक्त हसलो अन पुढे निघून गेलो.

एक बाबा दिसले. ते फक्त हसत होते. त्यांचे नाव लिहिलेले होते. हास्य बाबा.

"अहो या... मिळवा पन्नास रुपयात हास्य. हास्य विनोद... पन्नास रुप्प्ये... पन्नास रुप्पे"

दुसरे एक बाबा- त्यांचे नांव- भन्नाट बाबा - ते सांगत होते - "फक्त पंचविस रुपये... सुविचारांची एक जुडी .... "

"बाबा, पंचविस रुपयात फक्त एकच जुडी...? जरा जास्त किंमत होते ... बरं, एका जुडीत किती सुविचार आहेत?"

"पन्नास सुविचार! तुम्हाला एका रुपयात दोन सुविचार मिळताहेत... फक्त पन्नास पैशाला एक सुविचार पडतोय तुम्हाला..."

"ती सुविचारांची जुडी घेण्याचा अविचार करू नका साहेब", मागून एका साधूचा विचार त्याच्या मुखातून माझ्या कानापर्यंत धडकला....

मी मागे वळून पाहिले, "तो साधू खोट बोलतो साहेब. ते सगळे शीळे सुविचार आहेत. माझे कडे ताजे सुचिचार आहेत. ते घ्या..."

"ए माझं गिर्‍हाईक का पळवतोस?"

तेथेही वादावादी सुरु झाली... मी पुढे गेलो.

तेथे मला काल बसमध्ये भेटलेले व्यक्ती अ दिसले.

मी म्हणालो - "नमस्कार! आज एवढ्या सकाळी सकाळी इकडे? "

अ म्हणाले- "काय करणार? आमच्या घरात वितंडवाद सुरु आहेत! संपत्तीवरून! मनः शांती हरवलीय! तीच्या शोधात आलोय येथे. या दुकानात एक संगीत मिळते असे ऐकले होते. ते ऐकले की आपल्या मनातले विचार शून्य होवून जातात म्हणे... पण सीडी फार महाग आहे हो! पंधराशे रुपयाला एक्.. हास्य क्लबमध्ये जात होतो...पण. हसू येतच नाही हो..."

पलीकडे ब सुद्धा होते. तेही एका आजाराला कंटाळून येथे आले होते. त्या दुकानात म्हणे फक्त एका गुप्त जादुई मंत्राद्वारे आजार बरा केला जात होता.

क सुद्धा असेच तणावमुक्ती साठी योग्य बाबांच्या शोधान होते.

उजाडायला लागले तसे बाजारात दप्तरांच्या आणि अपेक्षांचा ओझ्यांखाली लादली गेलेली मुले मुली तसेच मोठमोठ्या कंपन्यांचे मालक, अभिनेते, नेते, अभिनेत्री सुद्धा कारमधुन शांती, सुख मिळवण्यासाठी येवू लागले.

म्हणजे सगळ्यांचीच मनःशांती हरवलीय तर!

मग विविध दुकानांवरचे आवाज वाढायला लागले.

"सुवासिक फ्लावर दहा रुप्पे.. दहा रुप्पे... वास घ्या ... कुविचारांना दूर लोटा"

"हा घ्या भोपळा. अहो, हा काही साधासूधा भोपळा नाही. भ्रमाचा भोपळा आहे. तो विकत घ्या. मंतरलेला आहे. तो घरी जावून फोडा. त्यामुळे तुमचा या मायावी संसाराचा डोळ्यासमोर साचलेला भ्रम दूर होईल अन मोक्ष मिळेल."

"ही आहे आत्मघात विरोधी टोपी. डोक्यात घाला अन सकारात्मक विचार मिळवा."

"वर्गणी भरा आणि या आश्रमातून रोज तुम्हाला एक एस. एम. एस. येईल. सकारात्मक टीप मिळेल..."

कोपर्‍यात दूरवर एक मंदिर होते. पण तेथे गर्दी कमी दिसत होती. का? कुणास ठावूक?
तेथे जावून बसलो. तेथे थोडावेळ ध्यानधारणा केली, नामस्मरण केले आणि लक्षात आले, की मला येथे बसल्यावर हवी ती तणावमुक्ती मिळते आहे.
देव मला म्हणाले, "माझे कडे माणसं सरळ सरळ न येता सगळेजण इतर अनेक उपाय करतात पण त्यांना तणाव मुक्ती मिळत नाही. पण मी म्हणतो माझे कडे येवून थोडावेळ अंतर्मुख होवून विचार केला, माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला जगण्याचे बळ मिळेल. पण, अनेकदा असे घडत नाही...माणसे अनेकदा स्वतःला देव म्हणणार्‍या इतर माणसांकडे जावून स्वतःची मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करतात पण ती मिळत नाही..."

देवाचे म्हणणे पटले. तेव्हा समोरून एक बाबा धावत आला, म्हणाला, "माझेकडच्या तिखट मिरच्या घ्या, यात मिक्सरमध्ये टाकून त्याची जी पूड मिळेल ती पूड रोजच्या विचारांमध्ये टाका... त्यामुळे तुम्हाला कळेल जीवनातले कटू सत्य, जीवनातले कठोर वास्तव...."

मी पळायला लागलो. म्हणालो, ""मला नको तिखट विचार, नको तिखट मिरची..."

तेथे एक पोलिसांची गाडी आली ... आम्हाला येथे एक भोंदु बाबांचा शोध घ्यायचा आहे. कोणी जागचे हलू नका...गुन्हा करुन तो बाबा पळाला आहे...."

सगळीकडे पळापळ सुरु झाली. मी पळायला लागलो. तो मिरची वाला तिखट सत्य सांगणारा बाबा माझे मागे पळू लागला.

मी ओरडायला लागलो, "वाचवा, वाचवा... मला नको मिरची... नको नको"

सुविचारांच्या जुड्या पायदळी तुदवल्या गेल्या. शब्द इकडे तिकडे झाले. मी जमेल तितके शब्द वेचून वाचवण्याचा प्रयत्न केला...पिशवीत भरले.

"नको, नको ... तिखट मिरची नको..."

समोर वाफ दिसली. त्या वाफेखाली एक कप होता. त्या कपात चहा होता अन तो कप घेवून माझी बायको माझ्या समोर उभी होती आणि मला म्हणत होती,

"अहो, कोणती मिरची? काय ओरडताय तुम्ही? हातात रिमोट ठेवून तसेच खुर्चीवर झोपून गेलात? काय स्वप्न बीप्न पडले की काय?"

तेव्हा मी भानावर आलो. समोर टीव्हीवर एव्हाना प्रवचन संपून बातम्या सुरु झाल्या होत्या.

मी म्हणालो, "हा ... धन्यवाद चहाबद्दल! आणि हो, थोडे स्वप्नासारखेच समज. मला स्वप्नासारखाच एक अनुभव आला..."

समोर ब्रेकींग न्यूज होती: " त्या भोंदू बाबाला शेवटी सकाळी चार वाजता पोलिसांनी केली अटक!"

आणि वर एक ज्योतिषी माझ्या राशीचे भविष्य सांगत होता: "आज तुम्हाला दिव्य अनुभूती येईल"

मी मनातल्या मनात हसलो. सौ मला चहा देवून स्वयंपाक घरात निघून गेली होती. मी टीव्ही बंद केला आणि वर्तमानपत्र वाचायला लागलो.....

सोमवारी सकाळी बसमध्ये त्याच तणावग्रस्त चेहेर्‍याने तीघे अ, ब आणि क भेटले.

मी म्हणालो, "काय कसे आहात?"

अ म्हणाले- "काय करणार? आमच्या घरात वितंडवाद सुरु आहेत! संपत्तीवरून! मनः शांती हरवलीय! काय करावे कळत नाही. हास्य क्लबमध्ये जात होतो...पण. हसू येतच नाही हो..."
... समाप्त...

. . .