रूम नंबर 9
Nimish Navneet Sonar Updated: 15 April 2021 07:30 IST

रूम नंबर 9 : रूम नंबर- 9 (गूढकथा)

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये? (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

 

आसावरी सहा महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जातांना तिच्या मनात कालच्या "लाईफ वेलनेस सेमिनार" चा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता –

"तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून! "

"हे सगळे आचरणात आणायला कठीण आहे, पण रोज त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला काय हरकत आहे?" आसावरीने विचार केला. अजून काही दिवस ती काम करणार होती मग सुटी घेणार होती. कधी शक्य झाल्यास तिचा नवरा तिला ऑफिसमध्ये सोडायला यायचा तर कधी कार चालवायचा कंटाळा आल्यास ती प्रायव्हेट कॅब करून जायची. आज ती स्वत: कार घेऊन आली होती.

गाडी मेन गेट मध्ये शिरल्यावर गेट उघडणाऱ्या सिक्युरिटी गार्डला तिने आज प्रथमच स्मितहास्य करून धन्यवाद म्हटले. त्याला बरे वाटले. अशा रीतीने वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. आपल्या कामाची दाखल घेतली गेल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता...

***

रात्री ऑफिसमधून निघायला आसावरीला जरा उशीर झाला. दहा वाजले होते. ऑफिसच्या कामाचा आज खूप ताण आला होता. आजच्या मीटिंगमधल्या कस्टमरच्या खूप लवकर प्रॉडक्ट डिलिवरी करण्यासाठीच्या अवाजवी दबावाचा तिला आणि तिच्या टीमला खूप ताण आला होता. तिच्या डोक्यात सतत तेच विचार घोळत होते. मग अचानक तिला कालचा सेमिनार आठवला. आज तिने सिक्युरिटी गार्डचे केलेले कौतुक तिला आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद आठवून तिलाही बरे वाटले आणि तिच्या मनावरचा ऑफिसचा ताणही थोडा हलका झाला.

आता ती कमी रहदारीच्या रस्त्यावर होती. सहजच खिडकीतून तिने उजवीकडे पहिले असता तिला एका स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने गाडी थांबवली आणि पहिले तर जवळच एक रिक्षा थांबली होती. त्यातून एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज येत होता. त्यातून एक पुरुष उतरला जो खूप काळजीत दिसत होता. तिने कार थोडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि रिक्षेकडे गेली.

"कालच्या सेमिनारचा दुसऱ्यांदा उपयोग करण्याची वेळ आता पुन्हा आली वाटते!" असा विचार करून तिने रिक्षाचालक आणि त्या पुरुषाला विचारले," काय झाले?"

तेवढ्यात तिला रिक्षेत एक गर्भवती स्त्री दिसली.

रिक्षा चालक म्हणाला, "रिक्षा अचानक खराब झाली मॅडम! काहीही केले तरी चालूच होत नाही आणि या बाईच्या प्रसूती कळा वाढल्यात. त्यांना लवकरच हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक आहे!"

क्षणाचाही विचार न करता रिक्षात बसलेल्या दांपत्याला आसावरी म्हणाली, "चला तुम्ही दोघे बसा माझ्या गाडीत!"

आसावरीने रिक्षावाल्याला पैसे देऊन मोकळे केले आणि त्या स्त्रीला आधार देऊन तिला आणि तिच्या पतीला गाडीत बसवले आणि त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये जायचे होते तेथे नेऊन सोडले. पूर्ण प्रवासात ती बाई कळा असह्य होऊन खूप ओरडत होती. तिचे नाव होते – कमला! आणि योगायोगाने ते तेच हॉस्पिटल होते जेथे आसावरी सुद्धा चेकिंगला यायची.

तेथील डॉक्टर म्हणाल्या, "अगदी वेळेवर तुम्ही यांना आणलं कारण यांची केस खूप गुंतागुंतीची होण्याची शक्यता होती पण आता धोका नेहमीपेक्षा कमी झाला आहे. धन्यवाद!"

आसावरीला मनापासून धन्यवाद देऊन त्या दांपत्याने तिला निरोप दिला. त्या शहरात त्या दोघांना कुणी नव्हते आणि वेळेआधी वेदना सुरू झाल्याने अचानक ते दोघे कुणालाही बोलावू शकले नव्हते म्हणून घाईघाईने रिक्षा करून चालले होते. पण रिक्षा खराब झाली, तथापि असावारीच्या मदतीने त्यांना वेळेवर देवमाणूस भेटल्यासारखे झाले.

हॉस्पिटलमध्ये कमलाला कळा असह्य होत होत्या, पुढे काय होईल माहीत नव्हते, तिचा पती धीर देत होता, सगळं व्यवस्थित होईल असे सांगत होता...

आसावरी घरी जातांना ऑफिसच्या कामाचा ताण विसरली होती आणि कस्टमरला उद्या आपण समर्थपणे तोंड देऊ असा एक आत्मविश्वासपूर्ण विचार तिच्या मनाला शिवून गेला. घरी आल्यावर ती आपल्या पती आणि चार वर्षांच्या मुलीला चर्चेतून माहिती पडल्यानंतर त्यांच्या दिवसभरातील चांगल्या गोष्टींबद्दल धन्यवाद द्यायला विसरली नाही...

***

दुसऱ्या दिवशी सहजपणे तिने वेळ मिळाल्यानंतर पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा तिला दिसले की त्या कालच्या बाईचा नवरा रडत होता. तिने त्याला विचारल्यानंतर कळले की केस खूप गुंतागुंतीची झाल्याने ती स्त्री दगावली होती पण बाळाला वाचवण्यात यश आले होते. तेथील डॉक्टर म्हणाले की जर आणखी उशीर झाला असता तर बाळ आणि बाळाची आई दोघांचेही प्राण गेले असते.

आसावरीला ती घटना ऐकून खूप वाईट वाटले पण कमीत कमी आपल्या मदतीमुळे बाळ तरी वाचले याचा आनंद तिला झाला. मग ती परत जायला निघाली.

कमला अॅडमिट होती ती रूम हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर होती. रूम नंबर नऊ. त्या रूमचे एक वेगळेपण होते. त्या रुमच्या बाहेर कॉरिडॉरमधल्या भिंतींवर दोन्ही बाजूंनी विविध राशींची चिन्हे चितारलेली होती. एकूण बारा राशींचे बारा गोल आणि त्यात त्या त्या राशींचे चिन्ह!

रूममधून चौकशी करून बाहेर जातांना असावारीला वाटले की मीन राशीचे मासे जणू काही भिंतीवरून उडी मारून तलावात पोहायला जाण्यासाठी तडफडत होते तर सिंह राशीचा सिंह जणू काही कॉरिडॉरमधल्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर झेप घेण्यासाठी टपून बसला आहे. आपल्या कल्पनेवर ती मनाशीच हसली आणि तेथून निघून गेली.

कमलाचा मृत्यू होताना तिने मनोमन एक तीव्र भावनांनी युक्त अशी चांगली शपथ घेतली होती याची मात्र कुणालाच कल्पना नव्हती... भिंतीवरची राशी चिन्हे त्या शपथेनंतर सुखावल्याचे जाणवत होते...

काही दिवसांनी कामाच्या रगाड्यात ही घटना आसावरी विसरली...

***

दरम्यान त्या हॉस्पिटलमध्ये आणखी एक घटना घडली...

एक गाडी हॉस्पिटलसमोर येऊन थांबली...

गाडीतून एक प्रसूती कळा येत असलेली स्त्री हॉस्पिटलमध्ये आली जिचे नाव होते – शांता!

तिच्या सोबत एक वयस्क स्त्री आणि दोन पुरुष होते. त्या स्त्रीला एका रूममध्ये ऍडमिट करण्यात आले, ज्या रूममध्ये पूर्वी कमला ऍडमिट होती...तिसऱ्या मजल्यावरची रूम नंबर 9!!

त्या रुमच्या थोडी पुढे जवळच लेबर रूम होती. दोन पुरुषातील एकजण आडोशाला जाऊन डॉक्टरांशी काहीतरी संशयास्पद बोलत होता...

दरम्यान शांताला लेबर रुममध्ये नेण्यात आले आणि ते डॉक्टर सुद्धा थोड्या वेळाकरता लेबर रूममध्ये गेले.

मग शांताच्या त्या रूम नंबर नऊ मध्ये आधीच येऊन बसलेली ती वयस्क स्त्री आणि तो पुरुष बराच वेळ बोलत बसले, एकमेकांशी छद्मीपणाने हसले आणि मग ती वयस्क स्त्री लेबर रूम मध्ये निघून गेली...

मग ते डॉक्टर नर्सला काहीतरी सांगू लागले आणि लेबर रूम मध्ये गेले.

रूम नंबर 9 च्या बाहेरच्या भिंतीवर चितारलेले ती विविध राशी चिन्हे सध्या स्तब्ध होऊन ही सगळी जा-ये बघत होते.

लेबर रुममध्ये प्रसूतीच्या कळा येत असताना त्या स्त्रीला म्हणजे शांताला प्रकर्षाने आठवत होते की काही दिवसांपूर्वी तिच्यावर तिच्या सासू आणि पतीने तिच्या मर्जीविरुद्ध गर्भलिंगनिदान करून मुलीचा गर्भ असल्याचे लक्षात येताच तिच्या नकळत तिचा गर्भपात करण्याचा एकदा प्रयत्न केला पण तिच्या ते वेळेवर लक्षात आले आणि तिने कडाडून विरोध केला आणि तिच्या भावाला सांगितले. त्यामुळे सासू आणि पतीवर नकळत दबाव आला आणि अनेक भांडणे होऊन सासू आणि पतीने माघार घेतल्याचा आणि पश्चात्ताप झाल्याचा दावा आणि नाटक केले...

तरीही शांता सावध होतीच आणि शेवटी आज बाळाला जन्म देण्याची वेळ येऊन ठेपली होती म्हणजेच अर्थातच तिच्या मनाप्रमाणे होणार होते. ती एका मुलीची आई होणार होती!!

वेळ आली. तिला अतिशय वेदना सुरू झाल्यात. प्रसव वेदना!

बाळ पुढे सरकल्याची जाणीव होत होती. बाळ झाले.

बाळ समोर डॉक्टरच्या हातात तिला दिसले तेव्हा ते बिलकुल रडत नव्हते, तेव्हा नर्स म्हणाली, "बाळ मृत जन्मले आहे!"

तशाही अवस्थेत शांताने समोर बसलेल्या सासूकडे पहिले. सासू चेहऱ्यावरचा आनंद लपवू शकत नसल्याने एक आनंदाची झाक शांताला तिच्या चेहऱ्यावर दिसली आणि आपला घात झाल्याचे तिच्या लक्षात आले...

नर्स सुद्धा अर्थपूर्ण नजरेने सासूकडे बघत असल्याचे तिच्या लक्षात आले. डॉक्टरांशी संगनमत करून नक्की यांनी डाव साधला. आधी पश्चात्ताप करायचे नाटक करून शेवटी त्यांनी जे करायचे तेच केले. शांता हा धक्का सहन करू शकली नाही आणि या धक्क्याने तिचे प्राण गेले...

मृत्यू होताना शांताने तीव्र भावनेने मनात एक भयंकर शपथ घेतली ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. मात्र त्या शपथेच्या तीव्रतेने भिंतीवरच्या काही राशी चिन्हांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत होते....

***

काही दिवसांनी शांताची सासू आणि पती हे त्याच्या दुसऱ्या लग्नाची बोलणी करून रात्री घरी आल्यानंतर रात्री एका विंचवाने पायाला चावून घरात त्यांचा प्राण घेतला. सकाळी इतर कोणालाही कोणत्याही प्राण्याच्या तिथे असण्याचे कोणतेच चिन्ह दिसले नाही पण त्या दोघांचा मृत्यू दंशाने झालेला मात्र दिसत होता. त्या दोघांचा मृत्यू होत होता त्या वेळेस हॉस्पिटलमध्ये रूम नंबर 9 च्या बाहेरील भिंतीवरचे वृश्चिक राशीचे चिन्ह रिकामे होते.

***

कालांतराने स्त्री भ्रूणहत्येसारख्या अक्षम्य पापात सामील असलेली ती नर्स आणि तो डॉक्टर यांनी हॉस्पिटलमध्ये एकदा उशिरा रात्री जेवणाचे पार्सल मागवले. त्याचे एकमेकांशी अफेअर होते. ते आता दोघे एका कोर्नरच्या रूममध्ये एकटेच होते...

नर्सने पार्सल उघडताच त्यातून एका खेकड्याने उडी मारली आणि तिच्या अंगावर जखमा केल्या. ती अचानकपणे झालेल्या हल्ल्याने भांबावली आणि पाळायला लागली. त्याच दरम्यान डॉक्टरने पार्सल उघडले असता त्यातून दोन जिवंत मासे निघाले आणि त्यांनी त्यांच्या तीक्ष्ण दातांनी डॉक्टरच्या ओठांना आणी जिभेला करकचून चावा घेतला तसेच चेहऱ्यावर वार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे तोही इकडेतिकडे सैरावैरा पाळायला लागला...

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये मात्र दिसत होते की पार्सलमध्ये पोळी भाजी आणि भात बघितल्यावर अचानक डॉक्टर आणि नर्स घाबरले आणि जेवण तसेच टाकून पळायला लागले. पळता पळता ते एवढे घाबरले होते की रुमच्या खिडकीच्या काचेतून त्या दोघांनी उडी टाकली आणि खाली पडताच त्यांचा प्राण गेला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली. कॅमेरामध्ये कुठेच कोणताच प्राणी दिसत नव्हता. त्या दोघांचा मृत्यू होत होता त्या वेळेस हॉस्पिटलमध्ये रूम नंबर 9 च्या बाहेरील भिंतीवरचे कर्क आणि मीन राशीचे चिन्ह रिकामे होते.

रूम नंबर 9 जवळचे कॉरिडॉर संपल्यानंतर कॉर्नरलाच एक मोठे डेस्क होते. तेथे रात्री दोन्ही तिन्ही रात्रपाळीच्या नर्स समोरच्या कॉम्प्युटर जवळ झोपाळलेल्या अवस्थेत बसल्या होत्या. त्यांची नेमून दिलेली कामं करत होत्या. वरच्या बाजूला एक गोल टोपीच्या आकाराचे कव्हर असलेला एक लँप होता. असे अनेक लँप कॉरिडॉरच्या मध्यभागी थोड्या थोड्या अंतरावर लावलेले होते.

त्या नर्स पैकी एकीचे लक्ष दूरवर भिंतीवर गेले तेव्हा तिला अस्पष्टसे जाणवले तेव्हा ती बाजूच्या नर्सला म्हणालीसुद्धा, "अगं, तो तिथला खेकडा आणि मासे कुठे गेले, काही दिसतच नाहीत!"

दुसरी नर्स भिंतीकडे न बघता कॉम्प्युटरवर काम करता करता तिची टर उडवत म्हणाली, " अगं बाई, झोपेच्या धुंदीत काहीही नको बोलूस!! असं कर कॉफी मशीन मधून कॉफी आण आपल्या दोघांसाठी. मस्त फ्रेश वाटेल, झोप उडेल आणि कामात मन सुद्धा लागेल!"

ती कॉफी आणायला गेली तेव्हा खेकडा आणि दोन मासे जागेवर होते.

"मला भास झाला असेल नक्की!" असे म्हणून ती कॉफी आणायला मशिनकडे निघून गेली.

***

आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा. एक दोनदा तिने नवऱ्याकडे बोलून दाखवले पण त्याने समजूत काढून तिला धीर दिला आणि सारख्या बाळाच्या विचारांमुळे एखादेवेळेस तसे होत असेल असे त्याने सांगितले.

ती सोनोग्राफी रूम मधून निघून गेल्यानंतरही रूममध्ये कुणीही नसताना तिथे सोनोग्राफी मशीन आपोआप सुरू होऊन त्याची हालचाल व्हायची. एवढेच नाही तर इतर काही स्त्रियांच्या वेळेस सुद्धा असे व्हायला लागले. पण ती हालचाल बारीक असल्याने सीसीटीव्ही चोवीस तास मॉनिटर करणाऱ्या गार्डसच्या नजरेत आली नाही.

***

आणि तो दिवस उजाडला...

आसावरीला प्रसव वेदना सुरू झाल्या नव्हत्या पण दिलेल्या तारखेप्रमाणे ती दवाखान्यात आली तेव्हा फक्त तिसऱ्या मजल्यावरची रूम नंबर 9 रिकामी होती त्यात तिला ऍडमिट केले गेले. आसावारीचा नवरा रमेश, मुलगी मिताली आणि सोबत आसावरीची बहीण, सासू, नणंद आणि आई हे सगळे आले होते. रात्री तीन वाजता तिला वेदना सुरू झाल्या. तिला लेबर रूममध्ये नेण्याची लगबग सुरू झाली...

इकडे त्या नर्स जेथे बसायच्या त्या कॉर्नरवरील डेस्कच्या वर पण थोड्या अंतरावर पुढे जेथे लँप होता त्याजवळ छतावर उलट्या लटकलेल्या दोन पांढऱ्या साडीतील केस मोकळे सोडलेल्या आणि भेसूर काळसर चेहरा असलेल्या दोन स्त्रिया एकमेकींशी तावातावाने भांडत होत्या...

शांताचा आत्मा आसावरीला मारण्यासाठी रूम नंबर 9 कडे त्वेषाने जात होता. छताला उलटे लटकून! मग भिंतीवरून रूममध्ये शिरायचा बेत होता तिचा. पण दुसरी स्त्री म्हणजे कमलाचा आत्मा तिचा मार्ग रोखून धरत होता...

"सोड माझा रस्ता मूर्ख स्त्री. मी गेल्या काही महिन्यात सोनोग्राफी मशिनच्या मदतीने एक गोष्ट शिकले आहे आणि मला माहीत आहे की आसावरीला मुलगा होणार! आणि ज्या कुणा स्त्रीला मुलगा होणार असेल तिला मी मारून टाकणार! माझी मुलगी मारली माझ्या पतीने आणि सासूने! डॉक्टरने आणि नर्सने! मग मी त्यांना मारलं!! आता अशी प्रत्येक स्त्री जी या रूम नंबर 9 मध्ये येणार आणि जिला मुलगा होणार असेल तिला मी मारणार! माझा बदला घेणार! घेतच राहणार!"

"खबरदार, पुढे आलीस तर! माझ्याशी गाठ आहे. आज माझं बाळ या रूम नंबर 9 मधल्या स्त्रीमुळे जिवंत आहे. मी तिला काहीही होऊ देणार नाही!" असे म्हणून तिने शांताचे मोकळे केस धरले आणि तिला वेगाने ओढून तिची छतावरची पायाची पकड ढिली करण्याचा प्रयत्न केला. तशी शांता चवताळली आणि तिने लँपचा आधार घेऊन लँपला हाताने पकडले. या ओढाओढीत लँप हेलकावे खाऊ लागला....

डेस्कवरील बसलेली नर्स, लँपच्या हेलकाव्यामुळे दचकून वर बघून म्हणाली, "ए वर बघ गं! त्या दोन पाली कशा जोराजोरात भांडता आहेत. किती मोठ्या पाली आहेत त्या! बापरे! जणू काही मिनी डायनॉसॉर आहेत."

दुसऱ्या नर्सने वर पहिले, आणि म्हणाली, " शी बाई! मला पालींची खूप भीती वाटते. आणि या दोन्ही पाली आकाराने किती मोठ्या आहेत बापरे! जाऊदे आपलं काम कर!"

दोन्ही शक्तिशाली आत्म्यांची जुगलबंदी बघून कर्केचा खेकडा, मेषेचा मेंढा, वृषभेचा बैल, मीनेचे मासे, सिंह हे सगळे जागृत झाले आणि आश्चर्याने वर छताकडे पाहू लागले. लँप घड्याळाच्या लोलकासारखा हेलकावे खात होता.

कमलाने जोरात ओढूनही शांताची छतावरची पायाची आणि लँपवरची हाताची पकड ढिली होत नव्हती. कमला तिला अधिकाधिक जोर लावून ओढायला लागली. शांताला ओढून दूरवर असलेल्या खिडकीतून खाली फेकून द्यायचा बेत होता कमलाचा!!

"शांता, शांत बैस! प्लीज. तुझ्यासोबत जे झालं ते झालं, त्याची शिक्षा इतर कुणाला कशाला देतेस? तुझा बदला तू सासू, पती, नर्स आणि डॉक्टर यांना मारून घेतलास ना! मग आता निरपराधाला त्रास का देतेस?"

"मी मृत्यूपूर्वी शपथ घेतली आहे की रूम नंबर 9 मधील ज्या कुणा स्त्रीला मुलगा होणार असेल आणि हे मला जेव्हा माहिती पडेल त्या स्त्रीला आणि पोटातल्या मुलाला मी मारणार! तुला माहिती आहे ना की मृत्युपूर्वी मनापासून घेतलेली शपथ ही खरी होतेच! कितीही अडथळे आलेत तरी!"

"अगं! अकलेची अर्धवट! तू जशी शपथ घेतलीस तशी मी सुद्धा शपथ घेतली आहे मृत्यूपूर्वी! या आसावरीची आणि या रूम नंबर 9 मधील प्रत्येक स्त्रीची प्रसूती सुखरूपच व्हायला हवी अशी! काहीही झालं तरीही! बघूया आता! कुणाची शपथ जास्त शक्तिशाली आहे ते?"

शांता भेसूर हसू लागली. कानठळ्या बसवणारे मोठमोठे आवाज तोंडातून काढू लागली...

डेस्कवरील नर्स म्हणाली, "शी! काय बाई या पालींनी उच्छाद मांडलाय? किती मोठ्ठ्याने चुकचुकते आहे ती पाल! अगदी कानठळ्या बसत आहेत आणि भीती वाटते आहे त्या आवाजाची! अगदी अभद्र आवाज!"

दुसऱ्या नर्सने पण कानावर हात ठेवले..

शांता कमलावर कडाडली, "आता बघच! तुला त्या समोरच्या विंचवाची ताकद दाखवते, तो माझ्या आज्ञेत आहे!"

मग शांताने एक अघोरी मंत्र म्हणून वृश्चिक राशीच्या चिन्हातील विंचवाकडे डोळे स्थिर केले.

विंचू हलू लागला...

त्याचे मोठे जाड काळे पाय वळवळू लागले...

तो चित्रातील सर्कलमधून निघून भिंतीवरून चालू लागला. मग छतावर उलटा चिटकून कमलाकडे येऊ लागला आणि त्याने कमलावर जोरात झेप घेतली तशी कमला पटकन बाजूला झाली. तिची छातावरची पकड ढिली होऊन ती खाली पडता पडता वाचली कारण तिने बाजूच्या भिंतीचा पटकन आधार घेतला.

या गडबडीत लँपच खाली पडला, फुटला आणि तेवढ्या भागात अंधार झाला. नर्सेसनी पटकन वॉर्डबॉयला बोलावून काच झाडायला लावले. त्यांना छतावर दोन भांडणाऱ्या पालीशिवाय काहीच दिसले नव्हते आणि आता अर्धवट अंधारात तर काहीच नीट दिसत नव्हते.

एव्हाना सगळेजण आसावरीला घेऊन लेबर रूमकडे जायला निघाले होते. शांता छतावर उलटी लटकत त्या दिशेने जायला निघाली. कमला विंचूशी झगडत होती. विंचू खूपच चिवट होता. त्याच्या पायाची पकड अतिशय घटत होती. त्याला छतावरून ओढून काढून खाली भिरकावणे सोपे नव्हते...

शेवटी कमलाने आपल्या शक्तीची परिक्षा घ्यायचे ठरवले. कमलाने एका विशिष्ट अघोरी संमोहन मंत्राचा जप केला आणि डोळे भिंतीवरच्या सिंहावर स्थिर केले. तिला नक्की नव्हते की या मंत्राचा उपयोग यशस्वी होईल किंवा नाही ते!

पण सिंह संमोहित होऊन तिच्या नजरेशी बांधला गेला आणि भिंतीवरून चालत, उलटा लटकत चालत आला. कमलाच्या आज्ञेनुसार त्याने विंचवावर लांब झेप घेऊन त्याला मटकन खाऊन टाकले आणि मग शांताचा पाठलाग करू लागला.

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये मात्र दिसत होते की, एक अतिशय वेगळाच दिसणारा किडा छताला चिकटून अतिशय वेगाने लेबर रूमकडे जाणाऱ्या पालीचा पाठलाग करतो आहे...

शांता भिंतीवरून लेबर रुमच्या दरवाजातून आत शिरण्याचा प्रयत्न करत असतांनाच सिंहाने शांताच्या अंगावर झेप घेतली आणि तिचा फडशा पडला. शांता आसावरीच्या पोटावर पालीच्या रूपात झेप घेणारच होती तेवढ्यात सिंहाने डाव साधला होता. या सर्व प्रकारांत सीसीटीव्ही मध्ये भांडणाऱ्या पालीव्यतिरिक्त काहीच रेकॉर्ड झाले नाही. विंचू आणि सिंह हे सुद्धा फक्त दोन वेगळे किडे म्हणून त्यात दिसून येत होते!

आसावरीला हे जे काय चालले होते त्याची जराशीही कल्पना नव्हती पण तिचे रक्षण आपोआप झाले होते!

दुसऱ्या दिवशी भिंतीवर सगळे राशींचे चिन्ह जसेच्या तसे होते...

आसावरी आपल्या मुलाशी आणि मिताली आपल्या भावासोबत आनंदाने त्या रूम नंबर 9 मध्ये खेळत होती. रुमच्या छतावर उलटी लटकलेली पांढऱ्या साडीतली कमला हे दृश्य बघून आनंदाने रडत होती...

(समाप्त)

लेखक - निमिष सोनार , पुणे

(कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)

. . .